बुधवार, ८ जुलै, २०२०

बळी

बळी 
**
धारधार शस्त्र 
चाले मानेवर 
देह धरेवर 
मग पडे ॥

फिरलेले डोळे 
श्वासाचे फुत्कार 
प्राणाचा आधार 
सुटू जाय ॥

होय तडफड 
जगण्या देहाची 
अडल्या श्वासाची 
फडफड ॥

चार दांडगट 
चार पायावर 
भार डोईवर 
देती घट्ट ॥

होय आक्रंदन 
मल विसर्जन 
थरथरे तन
शांत होय ॥

रक्ताचे थारोळे 
चिकट गरम 
जातसे गोठून 
मिनिटात ॥
ऊर्जेचे भांडार 
क्षणांचे सजीव 
होऊन निर्जीव 
पडे सुन्न ॥

मग खाटकाची 
घाई सोलण्याची 
उभ्या लाईनची 
गर्दी मोठी ॥

कुणास कमर 
कोणास तो सीना 
कलिजा नि खिमा 
घेतो कोण ॥

जाय दाही दिशी 
देह अवयव 
मारतात ताव 
कोण कुठे ॥

माणसा पोटात 
किती रे कबरी 
अतृप्त चित्कारी 
भरलेल्या ॥

कोण जन्मा आले 
कोण कुठे मेले 
कशास जगले 
कळेचिना ॥

विक्रांत हत्तेची 
होते भरपाई  
जाणुनिया होई
कासावीस॥

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, ७ जुलै, २०२०

गुरूदक्षिणा

गुरूदक्षिणा 
******
मागितले दान 
मज गुरुदेवे 
दोष सारे द्यावे 
सकळ ते ॥

भूत भविष्याला  
टाक रे झोळीत 
वर्तमानी स्थित
मग रहा ॥

भूतकाळातून 
भविष्यात जाई 
सदा चित्त पाही   
ऐसे असे ॥

जैसा की लंबक  
हालतो डोलतो 
वृत्तीचा तोच तो 
स्वभाव रे 

सदा ध्यानी ठेव 
तूच तुझे चैतन्य  
मागणे न अन्य 
मग पडे 

विक्रांत वाहीला 
श्री गुरू पदाला
मी पण सुटला 
कष्टविना .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, ६ जुलै, २०२०

ओळख

ओळख
*************
माझ्या मनाच्या अंगणी 
स्निग्ध प्रकाश सौख्याचा 
दत्त हृदय आकाशी  
करी वर्षाव कृपेचा  ।।

स्मृति पाचूच्या हिरव्या 
चमचमती तेजात
कुण्या मागील जन्माच्या 
स्मृती दिसती क्षणात ॥

भस्म लावूनी देहाला 
होतो ध्यानस्थ पर्वत 
शांत निरव एकांत 
म्हणे शब्द दत्त दत्त ॥

साऱ्या मिटतात वाटा 
मिटे सारा कोलाहाल 
जीणे कृत्रिम कोरडे 
स्थिरावते हालचाल ॥

रव रातीचे गुढसे 
माझ्या गुंजतात कानी 
कणकणात स्पंदन 
जणू अवधूत गाणी ॥

पूर तेजात अलोट 
म्हणे विक्रांत अलख 
नाथ हसतो गोरख 
देई आदेश ओळख ॥

***"
 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे.
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

हिंसा

हिंसा
*****
नवरा जो 
बायकोस मारतो 
तो काय नवरा असतो 
रानटी पुरुषत्वाच्या 
जंगलातील 
तो तर फक्त 
एक नर असतो.
त्याच्याकडे  शक्ती आहे 
स्नायुची
ताकत आहे 
पैशाची 
बळ आहे 
सामजिक श्रेष्ठत्वाचे
म्हणून तो मारतो. 

अन ती मार खाते 
कारण ती दुबळी असते 
त्याच्या संरक्षणाखाली 
जगत असते
त्याचं दास्यत्व 
करत असते.
अन ते मनोमन 
स्विकारत असते
युगोन युगे 
प्राक्तन म्हणून.

मतभेद असतात 
होतात 
पण म्हणून 
मतभेदाच्या टोकावर 
अन उद्रेकाच्या शिखरावर 
आपले माणूसपण हरवून 
पशू होणे हे 
कुठल्या उत्क्रांतीचे
किती शहाणपणाचे 
लक्षण आहे ?

हिंसेचे हे इतकं 
कुटिल कुरूप 
आणि विद्रुप रूप 
क्वचितच कुठले असेल.!
****
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, २ जुलै, २०२०

गुरुदेव

गुरूदेव
******
ऊर्जेचे वहन 
घडे ज्या देहातून 
वदती तयास 
गुरुदेव म्हणून ॥

सत्याचे अवतरण 
घडे ज्या वाणीतून 
वंदती तयाच 
गुरुदेव म्हणून ॥

चैतन्य स्पंदनं 
अवतरे कृपेतून
नमिती तयास 
गुरुदेव म्हणून ॥

देह काळ ओघी 
जाय की निघून
उरे ते चैतन्य 
गुरुदेव म्हणून ॥

दिप दिपा पेटवी 
प्रकाश होऊन 
स्मरती तयास 
गुरुदेव म्हणून ॥

पेटविल्या विण 
न ये चि घडून
भेटते तत्व 
गुरुदेव म्हणून ॥

विक्रांत पडून 
पद रज होऊन 
जाहला पावन  
गुरुदेव भजून ॥

*****-
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, १ जुलै, २०२०

ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी)

ज्ञानदेवी (ज्ञानेश्वरी )
*************
देवे बांधियला 
सुंदर महाल 
रत्नांनी केवळ 
अद्भुतसा ॥

किती काय पाहू 
डोळ्यात मावेना 
ह्रदय भरे ना 
काही केल्या ॥

डोळीयात गोडी 
कानाला ही गोडी 
सर्वांगी दुधडी 
भरुनिया ॥

अक्षरे म्हणू की 
सोनियाच्या लडी 
चैतन्यात बुडी 
दिलेल्या त्या  ॥

अर्थाचे चांदणे 
मृदुल मवाळ 
होय अळुमाळ
अंतरंग ॥

नक्षत्र कुसरी
मांडीयला  पट 
बहु अनवट 
अद्भुतसा ॥

हाती धरू जाता  
कळतो ना पोत
परी काठोकाठ 
उब आत ॥

घेता पांघरून 
जातो हरवून
देह आणि मन 
आपोआप ॥

धन्य मी जाहलो 
तव पदी आलो
कृपेचा लाभलो 
वारसा हा
++
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २९ जून, २०२०

माती



माती
***********
मातीतून जन्म
मातीत मरण
देहाचे सुमन
कौतुकाला ॥

मातीचं सजते
मातीचं धजते
मातीचं हसते
फुलातून ॥

माती महामाय
सृजना आधार
जीवना आकार
देत असे ॥

मातीची पणती
मातीची घागर
मातीचे आकार
लक्ष कोटी ॥

अनंत आकारी
तोच कणकण
असतो व्यापून
सर्वाठाई ॥

सजीव-निर्जीव
मातीच केवळ
श्रीदत्त प्रेमळ
दावी मज॥

आणि या मातीत
असते खेळत
चैतन्य अद्भूत
सर्वकाळ ॥

मातीला पाहता
विरक्ती दाटला
भाव देहातला
मावळला ॥

मातीचा विक्रांत
नमितो मातीला
लावितो भाळाला
नम्रतेने ॥

घडविले माय
म्हणून मी झालो
चैत्यन्यी नांदलो
दत्ताचिया ॥
*****
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने.
https://kavitesathikavita.blogspot.com

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...