बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

|| धाव अवधूता ||



|| धाव अवधूता ||


कृपा करा स्वामी
दत्त दिगंबरा
सांभाळा सावरा
पतिताला ॥

मनीचा पसारा
मज आवरेना
संपता संपेना
झाडलोट ॥

अवती भवती
लाटा उसळती
तरण्यास शक्ती
नाही हाती ॥

देहाची आसक्ती
जिवलग नाती
सखे नि सोबती
सोडवेना ॥

तुजविण वृथा
धावे रानोमाळ
हृदयात जाळ
घेऊनिया ॥

धाव अवधूता
नेई तुझ्या पथा
विक्रांत नेणता
अजूनही ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

एक पाऊस



एक पाऊस


दाटलेल्या नभातून
पाणी ओघळत होते
संततधारेत विश्व
अवघे भिजत होते


भिजलेले तन सारे
पाऊस झेलत होते
आणि मनातून ओले
सुख उमलत होते


जन्म सारा जगणेही
क्षण कवळत होते
जळी जणू अस्तित्व त्या
हरवू पाहत होते


पाणीयाच्या देहातले
पाणी उसळत होते
सुख डोळे ओघळूनि
जीवना भेटत होते 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

तुझे येणे




तुझे येणे
*******

तुझ्या ओल्या मृदू केसातून
निथळत असते कृष्ण आभाळ
डोळ्यांनी मी तयास टिपतो
होवून अतृप्त उजाड माळ

तुझ्या कांतीच्या शुभ्र प्रकाशी
मन हरवते जणू चैतन्यात
अन सारे ते तुझे बोलणे  
सजवून ठेवते खोल हृदयात  

कधी माळला मधुर गजरा
द्वाडपणे ये मजला चिडवत
त्या गंधातील अणुरेणूतून  
रेंगाळतो मी तव भवती रंगत

तुझ्या पावूली किणकिणणारी  
पैंजण तुझिया ध्यानी नसती
तू येण्याआधीच दुरूनशी
रव या हृदयास ऐकू येती

येणे तुझे असते उत्सव
वसंतातील मोहर संपन्न
जाणे तुझे प्रतिभेतील या  
विरहाचे क्षितीज कोंदण

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे







शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

दुःख सोबत



दुःख सोबत


दु:खाने शहाणा व्हायची
वा शहाणपण शिकायची
सवय कधीच मी
लावली नाही स्वत:ला
चटके बसणाऱ्या वाळवंटातून
गेलो डोहात डुंबायला
अन येतांना पोळतील पाय  
म्हणून रेंगाळलो नाही
घाबरत वेदनेला
पायात किती टोचले काटे
किती उमटले देही ओरखडे
पण ती आंबट गोड बोरे
पाच पैसेच त्याचे मूल्य नव्हते

दुखणाऱ्या पायाची
ठणकणाऱ्या देहाची
जळणाऱ्या मनाची
तडफड हृदयाची
वेदना ती ही काही औरच असते
जीवनाची अन जगण्याची
त्यातून भेट होत असते  
आणि रे आपण आहोत
हे आपल्याला कळते
म्हणून हात उंच उभारत
असे स्वीकारले मी दु:खाला
जसे मिठीत घेतले सुखाला
का न कळे कसे
पण कळून चुकले होते मला
ज्या क्षणी होतील दूर दु:खे
दुरावेल जीवनही
सवे राहतील ती फक्त
सुखाची प्रेते !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

उदास वावरे




उदास वावरे
************:::
उदास वावरे
तुझ्या मंदिरात
तोच घंटानाद
रोज करी

तीच ती आरती
तीर्थ नि प्रसाद
करी मोजदाद
पुण्याची मी

नच हालचाल
नच बोलचाल
ओघळेना कौल
फुलातला

अहो विश्वंभरा
देई मज दान
कृपेचा लहान
घास मुखी

विक्रांत लाचार
कुठे रे जाणार
तुझ्या पायावर
जन्म माझा 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

जगदंब



जगदंब
******
मांडवात मंदिरात
माय उभी नटलेली
सांभाळते जगतास
शिरी धरून साऊली ॥

वेडसर लेकरांना
रात्रंदिन प्रतिपाळी
भरवते घास प्रेमी
हर दिनी भुकेवेळी ॥

थोर तिच्या करुणेला
नसे मुळी अंतपार
दया क्षमा शांती प्रेम
जगे तिच्या नावावर ॥

कृपाकण तिचा एक
हाती असा भाग्ये आला
शतजन्म ऋणी तिचा
विक्रांत हा धन्य झाला ॥

जगदंबे तुझ्या पायीं
प्राण माझे अंथरले
प्रेम प्रकाशात तुझ्या
जीणे उजळून गेले ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

देई रे दातारा



देई रे दातारा
मागतो ते मला
मग तू  वाटेला
लावा पुन्हा  ।

किती फसवसी
किती ठकविसी
येता मी दाराशी
घालविसी ।

काय मी मागतो
धनमान यश
जाणतो तो पाश
मोहमयी

करी रे विरागी
विषय मोडून
टाक रे फाडून
मनोपट

तृष्णेची इवली
जळो मुळे सारी
कर रे आंधळी
दृष्टी जगा

देह कवतुक
मनाचे लालन
अहम संगोपन
करू नको

ऐक रे विनंती
देई तव प्रीती
अविरत स्मृती
मनामाजी ।

ज्ञान भक्ति विना
येऊ नये चित्ती
विक्रांतची मती
होवो दत्त ।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogdpot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...