रविवार, २० जानेवारी, २०१९

म्हसोबा




किती तरी वर्ष  म्हसोबा 
उघड्यावरच बसलेला होता 
बाजेवर उघडबंब बसणाऱ्या 
सोनबा आजोबांसारखा 

रस्त्याच्या टोकाला 
त्यांच्या तिठ्यावरती 
जणू तिथून तो सगळ्या  
गल्लीवर नजर ठेवत होता  

दरवर्षी भेटायचो  मी त्याला 
मे महिन्यात सुट्टीत 
आजोळचा माझ्या तो 
एक अविभाज्य भाग होता 

रणरणत्या उन्हात 
तापून निघायचा 
धुवांधार पावसात 
चिंब भिजायचा 
नेहमीच तरतरीत 
अन् तेज तर्रार दिसायचा 

नाही म्हटलं तरी 
त्याची थोडी भीती वाटायची 
लाल शेंदरी रंग फासलेला 
नाक डोळे नसलेला 
भला थोरला देव होता तो 

कधी कधी दिसायचे 
त्याच्याभोवती लिंबू कापलेले 
कुंकवात भरलेले 
कधी ताजे पिवळे जर्द 
अख्खे बाजारातून आणलेले 
 पण कुणीही त्याला 
हात लावायचा नाही 

तर कधी असे नैवेद्य 
गव्हाची दामटी  
वर भातवरण असलेली 
संध्याकाळी दिवा अन् 
दिसे उदबत्ती पेटलेली 

रात्रीच्या अंधारात 
कधी कसाई वाड्याच्या 
रस्त्यावरून यावे लागले की
दुरूनच म्हसोबा दिसायचा 
किती धीर वाटायचा
जणू म्हणायचा 
"जा रे बिनधास्त मी आहे"! 

म्हसोबाच्या गोष्टी 
पराक्रम पुराणकथा 
कधीच कुणी सांगितल्या नाही
पण तरीही म्हसोबाला
 नमस्कार माझा कधी चुकला नाही 

अलीकडेच खूप वर्षांनी गेलो होतो 
आजोळच्या त्या जुनाट गल्लीत 
खूप काही बदलले होते 
आजी आजोबा दोन्ही मामा 
काळाच्याआड गेले होते 
डौलात उभी असलेली 
समोरील बिल्डिंग
आणि ते मोठे वाडे 
धुळीत मिळू पाहत होते 

जाता जाता कोपऱ्यावर 
पुन्हा म्हसोबा मला भेटला 
कुणीतरी म्हसोबावर 
छप्पर बांधले होते 
अचानक म्हसोबा मला 
खूप केविलवाणा वाटू लागला 
त्याचे ते आकाशाचे छत
जणू काही  हिरावून घेतले होते 
त्यांची ती उन्हाची वस्त्र प्रावरण 
अंगावरची कुणी काढून घेतली होती 
आकाशा एवढा म्हसोबा 
अचानक दोन फूट झाला होता 

क्षणभर थबकलो 
उगाच उभा राहिलो 
ओळखीच्या त्या शिळेमधून 
मला एक  परिचित स्मित जाणवले 
जुने आपले कुणीतरी भेटले असे वाटले 
त्या त्याच्या ओळखीने 
मग मीही मस्तक खाली झुकवले 

त्याक्षणी तिथे 
आजीने आजारपणात केलेले 
अन फेडलेले अनेक नवस 
तिच्या आशीर्वादा सकट 
माझ्या डोक्यावरून 
हात फिरवून गेले 
जणू माझे आजोळ 
त्या म्हसोबा मधून  
माझ्यासमोर प्रगट झाले  
ते क्षण बालपणाचे  
तिथेच कुणीतरी  
होते कोरून ठेवले

अन म्हसोबा असे पर्यंत
ते तिथेच राहणार होते 



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...