सांजवेळी अंगणात
शब्द हरवला होता
आभाळाच्या भाळावरी
चंद्र गोंदलेला होता
पक्षी सारे घरट्यात
वृक्ष स्तब्ध आपल्यात
मंद वाहणारा वात
गंध भिनलेला होता
धूसर त्या प्रकाशात
चंद्र प्रभा नयनात
देवलोकातील सखी
जीव भारावला होता
दूरवर ध्यान तिचे
भान जणू शून्य होते
मृण्मयी आभा बिलोरी
देह चंद्र झाला होता
दूर कुठे घंटा नाद
दीप मंद कुण्या द्वारी
नाद ओंकार अजपी
माझिया भिनला होता
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा