रविवार, १५ जानेवारी, २०१७

नवल मनाचे



मी
****

चपळ मनाचे चपळ वळण
चपळ चलन 
अनिर्बंध ॥ १
मनात गुंगले जीवन गुंडले
कधी न कळले 
कुणासही ॥२
सुजाण सज्जन जाणती हे मन
भ्रांतीचे कारण 
म्हणूनिया ॥३
जपाच्या माळेत श्वासाच्या लयीत
स्वराच्या नादात 
अडवती  ॥ ४
नियम करिती धारणा धरती  
परंतु हरती 
क्षणोक्षणी ॥५
नवल मनाचे बंधाशी खेळते
यत्नची ठरते 
पळवाट ॥६
परंतु पाहता मनाचे जनन
विचारामधून 
होत असे ॥७
'मी' चे ते स्फुरण येताच घडून
आधार घेवून 
जग सृजे ॥७
अस्ताचली रवी किरणे ओढून
जातसे निघून 
आल्यावाटे ॥८
तया त्या ‘मी’ चे ठेवीता “मी” भान
नवल घडून 
येते पुन्हा ॥९
तेव्हा ‘मी’ मधून निघाले विचार
परत ‘मी’ वर 
जमा होती ॥१०
मग “मी” माझ्यात होवून वेगळा
पाहतो चालला 
खेळ सारा ॥११
मज वेटाळून “मी” पण राहते
एकले उरते
माझ्याहून ॥१२
पुढचे काय ते सांगू मी आता
दिसतील वाटा 
चालणाऱ्या ॥१३
विक्रांत नावाचे अस्तिव पोकळ
कळो मृगजळ 
आले काही ॥१४

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मारूत

मारुत ******  एक रुद्र हुंकार  भेदत जातो सप्त पर्वत  पृथ्वी आप तेज वायू  सारे आकाश व्यापत  थरथरते धरती ढवळतो सागर  उ...