शनिवार, २८ जानेवारी, २०१७

अखेरचा श्वास माझा




अखेरचा श्वास माझा
सहजी ओंकार व्हावा
प्राण देहाने स्वत:च
हळू मोकळा करावा

सांडून साचले सारे
चित्त रिक्त मुक्त व्हावे
मी माझेपण बांधले
याद काही न राहावे

मिटताच डोळे आत
जग तत्क्षणी तुटावे
जाणीवेच्या सरीतेने
सागरात लीन व्हावे

असो गोड किंवा कटू
बीज मागे न उरावे
मरणाच्या आधी इथे
मी मृत्यूस पांघरावे  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २१ जानेवारी, २०१७

भिऊ नको कधी





साखर फुटाने
मावा पेढा राशी
फुलांच्या ढिगात
मन माझे साक्षी

अवघा गोंधळ
धनाचा कल्लोळ
राग लोभ परी
मिटला समूळ

वदे माझे मन
हळूच आतून  
किंवा देवराय
तया संकल्पातून

जळो जन रीत
वृत्तीचा व्यापार
साठव अंतरी
चैतन्य अपार

दोनच दिसाचे
जगणे जगाचे
नाते तुझे माझे
हे जन्मो जन्मीचे

इथे मीच आहे
तिथेही असेन
भिऊ नको कधी
पाठीसी ठाकेन

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


आयुष्य





आयुष्य तुसडा
दु:खाचा तुकडा
भिंतीत उगाच
पडला पोपडा

आयुष्य उत्सुक
सुखाचा सोहळा
होळीत उडाला 
गुलाल धुरळा

आयुष्य विरक्त
मनाचा एकांत
गाभारी पेटली
शांत एक ज्योत

आयुष्य अमाप
विचारांचा कल्ला
लोकल गर्दीत
बुडाला चेहरा

आयुष्य उजाड
जळलेले पान
कोळसा राखेचे 
भेसूर गाणं

आयुष्य आशेचा
इवला अंकुर
काट्यात फुलले 
जीवन सुंदर

आयुष्य आरसा
हरेक मनाचा
बिंब विसरल्या
त्या प्रतिबिंबाचा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

ज्ञानदेवा बापा..




पुढचे ते पाठ
मागचे सपाट
ऐसा आहे थाट
अभ्यासाचा ||

ओळखले शब्द
ठेवले लिहून
मनात अजून
अर्थ नाही ||

नऊशे सहस्त्र
पेटवल्या ज्योती
माझिया वाती
स्पर्श नाही ||

ज्ञानदेवा बापा
करी रे करुणा
अर्थाचा उगाणा
दावी मज ||

पूर्वेच्या राऊळी
होई नारायण
हरू दे अज्ञान
तुझ्यादारी ||

विक्रांत पाषाणा
स्पर्श तो घडावा
जन्म उजळावा
आकलनी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने




बुधवार, १८ जानेवारी, २०१७

दत्ताचा ढोल




करतो वल्गना
भक्तीच्या वाचाळ
रिता मी पोकळ
ढोल जगी ||

दुमदुमे जगी
बसे कानठळ्या
आवेशी आरोळ्या
घुमे स्वरी ||

कळतोय आत
चामड्याचा थाट
वेगळाच हात
सारे करी ||

रोज पिटतोय
रोज वाजतोय
फुटण्याचे भय
सांभाळून ||

वाजता वाजता
झालो दत्तमय
अन्य मागू काय
दिगंबरा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

चंद्र गोंदलेला होता



सांजवेळी अंगणात
शब्द हरवला होता
आभाळाच्या भाळावरी
चंद्र गोंदलेला होता 

पक्षी सारे घरट्यात 
वृक्ष स्तब्ध आपल्यात
मंद वाहणारा वात 
गंध भिनलेला होता 

धूसर त्या प्रकाशात
चंद्र प्रभा नयनात
देवलोकातील सखी 
जीव भारावला होता 

दूरवर ध्यान तिचे
भान जणू शून्य होते 
मृण्मयी आभा बिलोरी
देह चंद्र झाला होता 

दूर कुठे घंटा नाद
दीप मंद कुण्या द्वारी 
नाद ओंकार अजपी
माझिया भिनला होता 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

रविवार, १५ जानेवारी, २०१७

नवल मनाचे



मी
****

चपळ मनाचे चपळ वळण
चपळ चलन 
अनिर्बंध ॥ १
मनात गुंगले जीवन गुंडले
कधी न कळले 
कुणासही ॥२
सुजाण सज्जन जाणती हे मन
भ्रांतीचे कारण 
म्हणूनिया ॥३
जपाच्या माळेत श्वासाच्या लयीत
स्वराच्या नादात 
अडवती  ॥ ४
नियम करिती धारणा धरती  
परंतु हरती 
क्षणोक्षणी ॥५
नवल मनाचे बंधाशी खेळते
यत्नची ठरते 
पळवाट ॥६
परंतु पाहता मनाचे जनन
विचारामधून 
होत असे ॥७
'मी' चे ते स्फुरण येताच घडून
आधार घेवून 
जग सृजे ॥७
अस्ताचली रवी किरणे ओढून
जातसे निघून 
आल्यावाटे ॥८
तया त्या ‘मी’ चे ठेवीता “मी” भान
नवल घडून 
येते पुन्हा ॥९
तेव्हा ‘मी’ मधून निघाले विचार
परत ‘मी’ वर 
जमा होती ॥१०
मग “मी” माझ्यात होवून वेगळा
पाहतो चालला 
खेळ सारा ॥११
मज वेटाळून “मी” पण राहते
एकले उरते
माझ्याहून ॥१२
पुढचे काय ते सांगू मी आता
दिसतील वाटा 
चालणाऱ्या ॥१३
विक्रांत नावाचे अस्तिव पोकळ
कळो मृगजळ 
आले काही ॥१४

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

पुणे शहर

पुणे शहर ******* सरले मिटले काल पुजियले  माथी मिरवले मातब्बर ॥ जुनाट वाड्यांच्या काल झाल्या चाळी  इमारत ओळी आज उभ्या ॥ नाव गाव ग...