सोमवार, ३१ जुलै, २०२३

प्रेम काय असते

प्रेम काय असते
************
शब्दां वाचून शब्दांनी
बोलणे प्रेम असते
पाहिल्यापासून डोळ्यांनी 
पाहणे प्रेम असते ॥
असू देत क्षणभर 
असू देत कणभर 
परिस स्पर्श जीवनाला 
अरे तो होणे असते ॥
ते कुठे काय मागते 
नि कुठे काय देते 
आकाशच जलाशयी
उमटणे ते असते ॥
प्रेम भेटणे जीवनात 
जीवनाचे ऋण असते 
या मनाने त्या मनाची 
आरती करणे असते ॥
भाज्य भजन भाजक 
हे द्वैत तिथे नसते 
आपल्या वाचून आपले
अस्तित्व एक ते असते ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

रविवार, ३० जुलै, २०२३

मज तारियले

मज तारतसे
********
माझं तारतसे पुन्हा पुन्हा स्वामी 
येवसे धावुनी 
हरघडी ॥

आठवता तया  ठाके होत दत्त 
कडेवर घेत 
नेई पार ॥

कुठली पुण्याई मज ना आठवते 
मन हे भरते 
तया कृपे ॥
 
करतो स्मरण हीच त्यांची सेवा 
स्वीकारली देवा 
झालो धन्य ॥

राहू दे ऋणात तुझ्या सदोदित 
वसा हृदयात 
प्रेम भरे ॥

विक्रांत जगात अंध हा चालतो
परी सांभाळतो 
स्वामी राया ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शनिवार, २९ जुलै, २०२३

श्रावण

श्रावण
*****
मनातला ओला श्रावण 
पंख्या खाली गेला वाळत
किती टाळले भिजायचे 
वितभर छत्री डोई पकडत 

फुटपाथवर पाणी चढले
कुठल्या कुठल्या नाल्यातले 
सारे वेणी फुले हारवाले
कधीचेच ते गायब झाले 

कधी कुठली ट्रेन भेटणार 
मस्टरला वा खाडा पडणार
तो तिचा अन् डबा कुठला 
चढण्याचीच जर मारामार 

रंग गंध अरे भान कसले  
ओले दमट श्वास कोंडले 
डोळ्या मधले चित्र तिचे
धावपळीत जणू ओघळले 

स्वप्नांचेच हे परी असे शहर
स्वप्न जगते मुठीत घेवून 
दिसता ती थकली भिजली
वादळ झेलतो वादळ होवून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘









दत्त दत्त शब्द


दत्त दत्त शब्द 
**********
दत्त दत्त शब्द आहे निनादत
कडे कपारीत 
सह्याद्रीच्या ॥
दत्त दत्त शब्द वदे भीमा कृष्णा 
पंचगंगा वेणा 
या भूमीत ॥
 दत्त दत्त शब्द गुंजे गिरनारी
वाडी औदुंबरी
गाणगापूरी ॥
दत्त पाखरतो अवघा हा देश 
देऊन आदेश 
नाथपंथी ॥
दत्त दत्त शब्द असे याओठात 
धुन दत्त दत्त 
अंतरात ॥
दत्त जाणिवेत हरावा विक्रांत
होवुनिया सार्थ 
जन्म सारा ॥
.🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

दत्ता राही

दत्ता राही
+*+*+

दत्ता राहि रे माझिया मनात 
कृपा बरसत रात्रंदिन ॥
दत्ता वस रे तू माझीया ओठात 
असता वाहत देहराशी ॥
दत्ता ठस रे माझिया चित्तात 
जागृत स्वप्नात सुषूप्तीत ॥
दत्ता देई रे तू हातात हात 
सर्व संकटात अहर्निशी ॥
 दत्ता राही रे तू सदा जीवनात 
सुखात  दुःखात क्षणोक्षणी ॥
दत्ता होई रे तू सर्वस्वच माझे
काज जगण्याचे जगतात ॥
दत्ता मागू काय तुजलागी आता
देई रे विक्रांता नाव तुझे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

गुरुवार, २७ जुलै, २०२३

सुमन

सुमन 
****
जीवन सुमन दत्ताला वाहिले 
काही न उरले माझे आता ॥

सुमन कुठल्या असो रानातले 
केवळ फुलले तयासाठी ॥

स्वीकारा दयाळा जरी कोमेजले. 
कृमीं टोकरले असो तया ॥

उन वारीयास साहत राहिले
डोळे लागलेले तया वाटे॥

आता ओघळेल तरुच्या तळाला 
नेई रे कृपाळा तेव्हा तरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

बुधवार, २६ जुलै, २०२३

बाहुला


बाहुला
*****

पायरी पातलो दत्ता तुझी आता 
नाही भय चिंता 
जगताची ॥
बाप कनवाळू झाला अनिवार 
नेले मनापार 
धरूनिया ॥
ठेविले मज देह मनातील 
वस्त्र दाखवीत 
जणू काही ॥
पांघरतो मन देही कधी जरी 
गाठी झाल्या दुरी 
बांधलेल्या ॥
परी वठवतो भूमिका ती छान
दत्त प्रयोजन 
समजून ॥
अंतरी बाहेरी करी तो ची लीला 
अरे मी बाहुला 
तयाधीन ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...