गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

दत्त प्रभावळ


दत्त प्रभावळ
+******


निवले हे डोळे 
शांत झाले मन 
श्री दत्त चरण 
पाहूनिया ॥१॥

रम्य प्रभावळ
सद्बक्ती प्रेमळ
सुखची केवळ
मांडलेले ॥२॥

केले देवराये
किती हे कौतुक 
मिरवि एकेक 
अलंकारे ॥३॥

भक्तिला निमित्त
सारे उपचार
दत्त अंगिकार 
होईस्तो रे॥४॥

मग देव भक्त  
आणिक देव्हारा 
उरे व्यवहारा 
कुणा दुज्या ॥५॥

विक्रांत दत्ताचा 
विनवि दत्ताला 
दावि रे आतला 
भाव शुद्ध॥६॥ 

*********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

दत्ताचे घर

दत्ताचे घर
*******::
फार फार दूरवर
दत्ता तुझे घर आहे 
थकलेले पाय माझे 
डोळ्यात काहूर आहे ॥

येशील का नेशील का 
मन चिंतातुर आहे 
विझलेले त्राण सारे
गालावर पूर आहे ॥

सगुणाचे गीत गाण्या
जीवन आतुर आहे 
निर्गुणात हरविण्या
जीवी हुरहुर आहे॥

घेतलास भार माझा
फक्त तू आधार आहे
तुझे प्रेम हेच सार
बाकीचा व्यापार आहे॥

तू म्हटले तर देवा
मी इथे गाणार आहे
येऊनिया परी कधी 
कानी सांगणार आहे ॥

मान्य आहे तशी काही 
माझी मोठी भक्ती नाही 
शब्दांचा हा जोड धंदा 
फारसा बाजार नाही ॥

खरे खोटे शब्द जरी
तुच तो दातार आहे 
लिहण्याची आटआटी
तुझा कारभार आहे

रोज पाहे रांग जरी
आलो कुठवर आहे
पहीलीच पायरी नि
शेवटी नंबर आहे ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

डॉ.मंगेश प्रभुळकर

(हे चित्र स्केच डॉ.संजय कदम यांनी काढलेले आहे)
डॉ.मंगेश प्रभुळकर 
***********
मी मंगेशला पाहिले 
अपना हॉस्टेलमधील 
आमच्या बॅचच्या 
सर्वात ऍक्टिव्ह ग्रुप मध्ये 
हा उंच व शिडशिडित व हसरा मुलगा 
मराठीचा अन त्यातही काव्यप्रेमी असेल 
तसेच
एखादा ऋषी असेल किंवा  होईल 
असे मला तेव्हा वाटत नव्हते 

मंगेशला मी खरतर 
फेसबुक आणि व्हाट्सअप वर 
जास्त ओळखू लागलो 
त्याची माझ्या मनातील ही प्रतिमा 
केवळ आभासी नाही 
हे माझेच मला 
हळूहळू पटतही गेले

मंगेश हा निसर्ग व पक्षी 
यात रमणारा माणूस 
आणि निसर्गाचा 
सर्वात मोठा गुणधर्म आहे 
तो म्हणजे अकृत्रिमता 
हा विलक्षण गुण 
मला मंगेश मध्ये सदैव दिसतो 

अंतर्बाह्य  मोकळेपणा 
आपलेपणा मित्रता 
हे त्याच्यामध्ये भरलेले गुण 
त्याच्या पोस्टमधे सदैव दिसून येतात 

पक्षी निरीक्षण करता करता 
मन एकाग्र होते 
आसन स्थिर होते 
आणि सूक्ष्म रंग-तरंग व
हालचाली टिपता टिपता 
एकतानता धारणेच्या पायरीवर 
कधी जाते कळत नाही 

तसे आसन व धारणा 
निसर्गाच्या कुशीत 
सहज साध्य झाल्यावर 
ध्यानाचे व ज्ञानाचे दरवाजे 
केवळ उघडणेच बाकी असते 

ही अवस्था ऋषीची असते 
म्हणूनच मी मंगेशला वनऋषी म्हणतो.
आणि अशा ऋषीला माझे लाखो सलाम  
मंगेश hats off to you .

******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

वसुंधरा

वसुंधरा
*******

ही वसुंधरा कोणाची ..?
आपल्या  गोर्‍या कातडीचा
गर्व करणार्‍या
युरोपियन लोकांची
का काळ्या शरीराच्या 
गुलामीचा अपमान साहीलेल्या
आफ्रिकन जीवाची?

पित वर्णाच्या बारीक डोळ्यांच्या 
जगावर हुकुमत करू इच्छणार्‍या
चिनी जपानी कोरिअन लोकांची 
की त्या ताम्रपर्णी गडद डोळ्यांच्या 
गुढ गंभीर आत्ममग्न
मध्य आशियन लोकांची .?

वा कधीही ही आपले बेट 
सोडून न गेलेल्या 
अंदमान निकोबार मधील 
त्या आदिवासींची अन
ऑस्ट्रेलियामधील मूळ जीवांची 
घनदाट जंगलात वा
सुदूर वाळवंटात 
राहणाऱ्या कष्टमय जीवन जगणाऱ्या 
आणि येथेच संपून जाणाऱ्या 
त्या अनाम वंशाची.?

ही वसुंधरा कोणाची . .?
शिस्ती मध्ये जाऊन 
नीट नेटके बसून 
मोठमोठ्या चर्चमध्ये 
प्रार्थना करणाऱ्या ख्रिश्चन लोकांची 
का तांड्या तांड्या मध्ये जमून 
भर रस्त्यामध्ये  आसन घालून
रांगा लावून नमाज पढणाऱ्या 
धर्मवेड्या मुसलमानांची 
वा मोठमोठ्याने टाळमृदुंगाच्या नादात 
स्वतःला हरवून जाणाऱ्या हिंदूंची 
का हातामध्ये मेणबत्ती आणि उदबत्ती घेऊन 
शांतमूर्ती गौतम बुद्धापुढे 
नतमस्तक होणाऱ्या बौद्धांची .
अथवा धर्माला अफूची गोळी म्हणून 
धर्म नाकारणार्‍या आणि 
माणुसकीलाच देव मानणाऱ्या  
पण सत्तेवर स्थापन होताच 
त्याच माणसांना 
सहजच मारून टाकणार्‍या 
साम्यवाद्यांची  ?

हि वसुंधरा कोणाची ?
मोठमोठ्या इमारती 
सुंदर महाल 
देखण्या हवेल्या बांधून 
सुख संपन्नतेने  जगणाऱ्या 
सारे उपभोग घेत राहणाऱ्या 
धनिकांची 
का बकाल अस्ताव्यस्त पसरलेल्या 
झोपडपट्ट्यातील 
केवळ निद्रेसाठी
वितभर जागेत मुरकुंडी करून 
पडणाऱ्या गरीबाची.?

ही वसुंधरा कुणाची ?
हिरव्यागार वृक्षावर बसणार्‍या 
आणि आकाशात स्वछंद विहार करणाऱ्या गोजीरवाण्या पाखरांची  
हिरव्या कुरणावर फिरणार्‍या चरणार्‍या हरणांची  
गाईंची मेढ्यांची बकर्‍यांची 
अन भेदक डोळे आणि अस्तित्व म्हणजेच जरब असणार्‍या वाघांची सिंहाची  ?

ही वसुंधरा कुणाची 
तीन चतुर्थांश पणें व्यापलेल्या पाण्याची 
त्यात असलेल्या अजस्त्र जलचराची 
शार्क डॉल्फिन देवमाशांची 
की इवलाल्या जेलीफिश झिंगे कालव्यांची खेकड्यांची.
की त्या अजस्त्र जहाजे व विशाल जाळ्यांनी 
त्यांच्यावर आक्रमण करत त्यांना पकडत
टण टणाने मासेमारी करणाऱ्या 
श्रीमंत मासेमारी कंपन्यांची?

ही वसुंधरा कोणाची ?
जागा मिळेल तेथेच रुजू पाहणार्‍या 
पाणी मिळेल तेथे वाढणाऱ्या 
झाडांची झुडपांची वृक्षांची 
फुलणाऱ्या सजवणाऱ्या सुगंध देणाऱ्या 
वेलींची 
का या सार्‍यांची अमानुषपणे 
कत्तल करून येथे 
मोठी शहरी उभाणाऱ्या बिल्डरची
त्यात राहणार्‍या माणसाची  ?

खरेच कुणाची आहे हि वसुंधरा?
तुम्ही मला सांगाल
ही वसुंधरा दोघांचीही आहे !
पण असे म्हणणे म्हणजे 
प्रश्न टाळणे नाही काय ?

होय ही गोष्ट खरी आहे की 
प्रत्येकाला ही वसुंधरा 
आपलीच आहे असे वाटते  
पण जर ही वसुंधरा सर्वांचीच असेल
तर मग 
इथे हा भेदभाव हा विरोधाभास 
हा संघर्ष  हे असहाय जीवनमरण 
हि युद्ध हे मृत्यूचे तांडव  
हे दैन्य हे शोषण  हि पराधिनता 
का आहे ?

एक जीव दुसऱ्या जीवाला का गांजतो ?
एक जण दुसर्‍याला का लुबाडतो  ?
एक मासा दुसर्‍या माशाला का खातो ?

ती असामान्य  सूक्ष्म तरल 
विश्व निर्माण करणारी प्रज्ञा 
तिला काय गरज होती 
हे असे विश्व निर्माण करायची  ?

कदाचित हे असेही नसेल का?
कि ही वसुंधरा कुणाचीच नसेल !
लाखो वर्ष या पृथ्वीतलावर 
राहणार्‍या डायनोसॉरलाही वाटत असेल की वसुंधरा त्याचीच आहे !
तसेच  काही कदाचित  
आपल्या बाबतही होत नसेल काय  ?
*******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

डॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली

डॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली
***************************

 खूप मित्र मिळवतो 
आपण आपल्या जीवनात
काही मित्र असतात 
सतत किंवा बराच काळ 
आपल्या अवतीभवती वावरत
आपण त्यांच्यात मिसळतो 
हसतो खेळतो बोलतो 
पण काही कारणाने 
अचानक ते मित्र दूर जातात 
पुढे कधी कधी महिने अन महिने 
वर्ष अन वर्ष त्यांची भेट होत नाही 
कधीकधी  उडत-उडत 
खबर येतात त्यांच्याबद्दल 
कुणी बोलतो 
त्याचे असं झालं तसं झालं रब
त्याला मुलगा झाला 
त्याला मुलगी झाली 
त्याच्या मुलाचे लग्न झाले 
आता तर नातू झाला आहे 
वगैरे वगैरे . . 

जरी तो आपल्या जीवनात  
या क्षणी नसला तरी 
तो कुठेतरी आहे आणि सुखात आहे 
आनंदात आहे 
एवढे आपल्याला पुरेसे असते

पण अचानक एखादी बातमी येते 
आणि आपल्याला कळते 
तो मित्र आपल्यात राहिला नाही 
तेव्हा ही खबर 
एखाद्या बाणासारखी हृदयात 
खोलवर रुतत जाते

आज सकाळी 
अशीच एक बातमी आली 
डॉक्टर राजू गायकवाड गेला 
अविश्वसनीय बातमी होती 
खरी वाटत नव्हती
मग खात्री करून घेतली 
मन विषादाने आणि दुःखाने भरून गेले 
सदैव हसतमुख असलेला 
आपल्या जगात 
आणि आपल्या सुखात 
रंगलेला हा मित्र 
त्याने विचारपुर्वक ठरवलेल्या 
जगण्याच्या चाकोरीतच जगत होता 
एक आखीव-रेखीव नेटके जीवन 
सुखी समाधानी जीवन 

त्याचे घर त्याची नोकरी 
त्याचा दवाखाना त्याचा संसार 
सुखाने राहत होता तो
दृष्ट लागू नये असे त्याचे जीवन  

आणि कोरोनाच्या 
या लाटेत या तडाख्यात 
ध्यानीमनी नसताना तो सापडला 
तसा तर तो योद्धाच होता 
व्हेंटिलेटरवर जाऊन जिंकून
परत आला होता पण 
ते घाव खूप खोलवर गेले होते 
अन त्या घावांमध्येच 
त्याचे श्वास हरवुन गेले .

मला खरंतर काहीच माहिती नव्हती 
हे सगळे घडले तरीही 
आणि कळली ती फक्त 
शेवटची बातमी 

राजुला एक सवय होती 
दुसऱ्याला अंदाज करायला लावायची 
अन अचानक रहस्य उद्घाटन करून 
त्याला चकित करायची
दुसऱ्याचे आश्चर्याचे भाव टिपण्यात 
त्याला आनंद वाटायचा 
मग तो हसायचा तो मिश्कीलपणे 
अगदी मनापासून 
कधी कधी खोडकरपणे 
प्रश्नही टाकायचा समोरच्याला 

पण यावेळी त्यांने  प्रश्न टाकला नाही 
अंदाज करायला लावले नाही 
काही काहीच कळले नाही 
आजारपण नाही 
दुखणे नाही
नंतरचे भोगणे नाही 
काहीच सांगितले नाही 
एक धक्का दिला 
अविश्वसनीय 
आणि तो निघून गेला 

राजूची स्वतःचे एक तत्त्वज्ञान होते 
लो प्रोफाईल मध्ये राहायचे 
कुणाच्या डोळ्यात न येण्याचे 
आपले जीवन आनंदाने जगायचे 
आपली कर्तबगारी हुशारी 
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व 
आपले चातुर्य ओळखी 
त्याने जणू ठेवल्या होत्या 
मनाच्या आतल्या कप्प्यात 

या महानगरात 
नोकरीच्या धांदलीत 
दोन लोहमार्गाच्या भोवती असलेल्या 
दोन वेगळ्या जगात 
आम्ही पडलो होतो आणि दुरावलो 
पण कधी आठवण झाली 
तर तो हसरा मिश्किल 
चेहरा समोर यायचा 
मदतीस सदैव तत्पर असलेला 
त्याचा स्वभाव आठवायचा 
हा मित्र जिथे असेल तिथे 
नक्की सुखात असणार 
मनातून पूर्णपणे ठाऊक असायचे 
खरतर
पण सुखाला ही दृष्ट लागते 
हे माहीत  होते 
कधी पाहिले नव्हते 
ते पाहिले.
************

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

आकाशीचा बाप .

आकाशीचा बाप माझा 
प्रभू गुरुदत्त आहे 
नका देऊ बायबल 
माझ्यात मी मस्त आहे ॥

तुम्ही काय हरविले 
तुम्हाला ती जाण नाही 
बदलून देव घेणे 
हे शहाणपण नाही 

बायबली काय आहे 
अरे मी ते वाचले रे 
भक्तीच ती श्रेष्ठ आहे 
अंती हेच मांडलेले 

अद्वैताचे भान  परी 
त्याच मुळीसुद्धा नाही 
येशु मेरी विना त्यांचे 
पान ते हलत नाही 

स्वीकारले तुम्ही तया 
काही कसे करूनही 
तयामध्ये फारसा मी 
आता पडणार नाही 

ख्रिस्त कुठे प्रचाराचे 
वाचला न बोलतांना 
जाळे लावा भक्तासाठी 
असे किंवा सांगतांना ॥

आम्हासवे खेळ असा
येऊनिया खेळू नका  
फसवून धनाने त्या
धर्मभ्रष्ट करू नका ॥


गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

ज्ञानदेवी माय

 

ज्ञानदेवी माय

***********

तुज पांडुरंगा मा

गावे ते काय 

ज्ञानदेवी माय 

दिलीस तू  ॥


यया सुखा पुढे 

अवघे थोकडे 

याहून चोखडे 

जगी नाही ॥


माय सांभाळते  

माय दटावते 

माय जोजावते 

जीवनात ॥


जरी मी उनाड 

अभ्यासा वाचून  

खेळून मळून 

घरा येई ॥


 न्हावून माखून 

भक्तीच्या शब्दांत 

ज्ञानाचे अमृत 

पाजवते  ॥


विक्रांत नाठाळ 

खेळतो शब्दांत 

अर्थ तो पोटात 

उतरे ना ॥


परी भरविता 

थकत  ती नाही  

पुन्हा देतं राही 

मुखी घास  ॥


**********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...