शनिवार, ३० जून, २०१८

भरोसा



भरोसा


साऱ्या वाटा सुटल्या आहेत 
साऱ्या दिशा मिटल्या आहेत
आता फक्त तुझाच भरोसा 
काही आशा उरल्या आहेत 

पायाखालती आधार नाही 
सोबतीस या संसार नाही 
प्राण ठेविले पायी तुझिया
काय तरी तू येणार नाही 

प्रीती  वाचुनी भक्ती जळते 
आरंभा विना कर्म मरते 
आणि तरी खुळचट आशा 
तेच मनस्वी स्वप्न मागते 

ये तू देही म्हणते जीवन 
सर्वस्व मी करीन अर्पण
पण कुणाच्या चाहुली विन
सांज तमी जाते  हरवून  

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 

भार



भार
***

जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा
भार होतो कुणालाही
अगदी जाणून बुजून
अथवा कळत नकळतही
तेव्हा याचा अर्थ
असाच निघतो की
तुम्ही खरोखर लायक नाही
निखळ मानव्याची
प्रांजळ बिरुदावली मिरवण्यासाठी !

सत्तेचा दंड हातात आल्यावर
येणारी कठोरता
अपरिहार्य असेलही
कधीकाळी केंव्हातरी
पण लोकांनी तुमचा
आदर करायचा सोडून
द्वेष करावे असे वर्तन
घडते तुमच्या हातून
तेव्हा नक्कीच समजा
तुम्हाला माणूस व्हायचे
बाकी आहे अजून

आयुष्यात दुःख अपमान
पराभव अन्याय येतो
साऱ्यांच्याच वाट्याला
गरज नाही मधुरता मिळेल
हाती आलेल्या प्रत्येक फळाला

त्या न जिरलेल्या दुःखाची वाफ
भाजवत असेल तुम्हाला
त्या ठसठसणाऱ्या अपमानाच्या
असह्य वेदना डसत असेल
तुमच्या काळजाला
त्या जळलेल्या सुखाच्या धुराने
अंधत्व आले असेल डोळ्याला

अन् या नको त्या गोष्टी घेऊन
वावरत असाल तुम्ही
तर खरंच सांगतोय
या जगाच्या पाठीवर
तुमच्या एवढे दुर्दैवी कोणीच नाही

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २८ जून, २०१८

दत्त माउली



दत्त माउली  

माऊलीची दृष्टी 
सदा बाळाकडे 
तैसे मजकडे 
पाही दत्ता 

संकटी पडता 
येई गे धावून 
नेई सांभाळून 
निजधामा 

मोही अडकता 
पडता पडता 
फिरवून रस्ता 
धाडी मागे 

जाता वाहवत  
मायेच्या लोंढ्यात 
काळाच्या धारेत 
वाचवी गे 

विक्रांत शरण 
हात उभारून 
घेई उचलून  
माउली  ये 

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २५ जून, २०१८

रीत मनावर




रीत मनावर 


तू शब्द आठवत 
नजर झुकवत 
डोळे मिटत 
बोलतेस 

तव बोल लाघट 
स्वर अनवट 
मन होत गंधीत
दरवळते

मी जीर्ण पिंपळ 
करतो सळसळ 
झेलत वादळ 
एक नवे 

मी पुन्हा बहरतो 
आकाश भरतो 
तुजला पाहतो 
पानोपानी 

तू येत येत 
पण जाते हरवत 
मी वाट पाहात 
ग्रीष्म होतो

तू किती दूरवर 
जन्मांचे अंतर 
मी रीत मनावर 
पांघरतो 


डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २४ जून, २०१८

दत्त शोध




दत्त शोध

शोधतो मंदिरी
शोधतो अंतरी
साधू दरबारी
दत्ता तुला ॥

सापडून खुणा
दत्त सापडेना
आर्तीही मिटेना
काळजाची ॥

दत्त दत्त दत्त
लावूनिया रट
शून्य प्रतिसाद
कारे प्रभू ॥

स्मर्तृगामी प्रभू
तुज लागे बट्टा
देवा गुरुदत्ता
बरा नव्हे ॥

दत्ता विना रिक्त
म्हणवितो भक्त
व्यर्थ गेले उक्त
नाम तुझे ॥

विक्रांत उदास
चर काळजात
वेदना जपत
पदी राही ॥


डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २२ जून, २०१८

धाव घेई दत्ता

धाव घेई दत्ता 

********

आता लवकरी 
धाव घेई दत्ता 
अनाथांच्या नाथा 
अवधूता 

येता तुझ्याकडे
लोटू नको दूर 
देई पायावर 
ठाव मला 

संपले जीवन 
क्षीण झाले प्राण 
परी तुजविण 
थारा नाही 

नाही भरवसा 
पुढल्या क्षणाचा 
लोभ जगताचा 
व्यर्थ वाटे 

पोखरला वृक्ष 
काळ कीटकांनी 
गेला ओसरूनी 
बहरही 

चार श्वासांची या
सुमने शिणली 
तुझ्या पाऊली 
वाहू देरे 

विक्रांत शरण 
भावभक्ती विना 
पडून चरणा 
राहू दे रे 


 डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २१ जून, २०१८

मंजूर मजला

मंजूर मजला

*********
तुज काय देऊ
मज ना कळते
तुज काय बोलू
मज ना वळते

या खुळ्या मनाचे
उनाड पाखरू
सदैव तुलाच
केवळ स्मरते

छंद तुझा मज
बंध तुझे मज
रे खेचून नेती
मुळी ना ऐकती

तुजसाठी पुन:
जनन घडावे
या अवनीतच
सतत रुजावे

मंजूर मजला
बंधन इथले
संग हवा तव
मीपण नसले

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...