सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

वीणेकरी

वीणेकरी
*******
अपार भरल्या गर्दीत राउळी 
उभा वीणेकरी नाद लयी ॥

कुणी पायावरी ठेवीतसे माथा 
कुणी काढे वाटा बाजूने तो ॥

त्यास मोजमाप नव्हते कुणाचे 
नाव विठोबाचे मुखी फक्त ॥

मज गमे चित्त तेच विणेकरी 
विचारी विकारी गर्दीतले ॥

तैसा तया ठायी देता मी तो नाद
सरले संवाद  विसंवादी ॥

झंकारली वीणा लयी गेले मन 
गर्दीत संपूर्ण निरंजन ॥

विचारी राहून विचारा वाचून 
उगवून मौन शांत झालो ॥

कृपा ज्ञानदेवी भरून राहिली 
विक्रांत हरली सुधबुध ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

महफ़िल



महफ़िल 
*******

यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।

 महफ़िलों के रंग अब सूने हो रहे हैं ।

तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो? 

चार पाँच पल बचे हैं मुफ्त गँवा रहे हो।

सोने से पहले, विक्रांत! थोड़ा-सा जाग लो।

वह चाँदनी ढूँढो अंदर और उसे गले लगा लो।

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 



शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

कृपा कल्लोळ

कृपा कल्लोळ 
*******
काय माझी गती अन् काय मती 
तुज दयानिधी भेटू शके

काय माझी श्रद्धा काय ते साधन 
तुज बोलावून घेऊ शके 

अवघा देहाचा भटक्या मनाचा 
वाहिला जगाचा भार मनी 

संसारी राबलो प्रपंची गुंतलो 
जरी दारी आलो देवा तुझ्या 

जाणतो मी न्यून माझे हे अपार 
कृपेचा सागर परी तू रे

घडते घडणे अवघे तुझ्याने 
म्हणून मागणे मनी ये रे 

कृपेचा कल्लोळी भिजव मजला 
प्रवास उरला पूर्ण करी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद
*********
जळताच झाड मन विद्ध होते 
तोडताच झाड मन कळवळते 
एकेक झाडात लक्षावधी जीव 
राहतात प्रेमाने करुनिया गाव 
किती ते कीटक आणि पक्षीगण
घरटे कुणाचे रे विश्रांतीचे क्षण 
जीवन रसाचे गीत मंद मौन
खोडात वाहते एक संजीवन
कुणाशी ना वैर आप पर भाव 
खोलवर ओल दाता त्याचे नाव 
का रे बाबा वैर करशी तयाशी 
नको रे होऊस उगा पाप राशी 
खांडववन शापे पार्थ वंश गेला 
सवे यादवाचा सर्व नाश झाला 
इतका समोर आहे रे इतिहास 
जागा होई मित्रा पालट दिवस

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

दारी आलो

दारी आलो
*******
केली खटपट आणि दारी आलो 
तुजला भेटलो कृपा तुझी 

जरी अट्टाहास देवा माझा वेडा 
अदृश्याचा खोडा होता मागे 

किती अडकलो कितीदा थांबलो 
थकुनिया गेलो तनमने 

काय देवा तुझी असेही परीक्षा 
किंवा काही शिक्षा कळेचिना 

कळेना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण 
कळल्या वाचून रमलो मी 

पास नापासची चिंता नसे मला 
परी तुझी शाळा बुडू नये

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

दत्त पथ दावतो

पथ दावतो 
********
दत्त पथ दावतो 
संकटात धावतो 
आणुनि सुखरूप 
अंगणात सोडतो 

दत्त चित्त चोरतो 
भवताप हारतो
बंधमुक्त जीवनाचे 
स्वप्न मला दावतो 

दत्त मनी नांदतो 
गीती अर्थ होतो 
माझ्यातून तोच तो 
बोध मला सांगतो

दत्त पाश तोडतो 
दत्त मैत्र जोडतो 
माझे पण हरवून 
विश्व सारे होतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

झाडे मरतात .

 

 
झाडे मरतात 
**********
असे कसे हे 
रे असे कसे
जिकडे तिकडे 
भरतात खिसे .
 
तोडता भरती खिसे 
लावता भरती खिसे 
खिशात पैशाचे 
जणू की झाड असे .
 
काल होता तो 
गुटगुटीत कर 
आज आला तो 
नवा टी शर्ट कर .
 
नाव रूप वेगळे 
तंत्र यंत्र आगळे 
तेच परी ते रे
कर्तृत्व असे काळे .
 
कधी हातात हात 
कधी फुल हातात
असो कुणीही पण
बिचारी झाडे मरतात .
 
झाडास नाही पक्ष
झाडास  नाही रक्षक
हिरवे मांस जणू  ते
सारेच इथे भक्षक.
 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...