रविवार, १ जून, २०२५

ज्ञानदेव म्हणता

ज्ञानदेव म्हणता
************

मुखे ज्ञानदेव म्हणता म्हणता
 मन झाली वार्ता नसण्याची ॥१

हरवला ध्वनी कैवल्य स्पंदन 
आनंद कंपण उरलेले ॥२

काळवेळ कुणी मारले गाठीला 
अस्तित्व चोरीला गेले काय ॥३

पण भय चिंता नव्हती किंचित 
स्वयंप्रकाशात आत्मतत्व ॥४

विक्रांत सरला स्वर शब्द भाव 
दशा ज्ञानदेव येणे नाव ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ३१ मे, २०२५

विजय नाईक (श्रद्धांजली)

 
विजय नाईक (एसी ऑपरेटर ) श्रद्धांजली
***********************
तशी रूढ अर्थाने ही कविता
श्रद्धांजलीपर नाही म्हणता येणार .
तर हे विजयचं अचानक अकाली जाण्यावर
केलेले चिंतन आहे असे म्हणता येईल.

तसा विजय नाईक 
कुठल्याही प्रशासनाला आवडणारी 
व्यक्ती कधीच नव्हता. 
पण विजयला सांभाळणे 
हा त्यांचा नाईलाज होता. 
महानगरपालिकेत काही 
असेही विभाग आहेत 
येथे खरोखरच काहीच काम नसते 
तरीही तेथे माणसाला नेमावे लागते. 
त्यापैकीच एक विभाग म्हणजे 
एसी डिपारमेंट. 
माफक काम आणि एसी चालू बंद करणे 
एवढेच त्यांचे  मुख्य कर्तव्य.
त्यामुळे हाताशी असलेला 
प्रचंड रिकामा वेळ 
आणि ड्युटी वरती काय करायचे
हा पडलेला प्रश्न ..१
त्यामुळे त्या डिपार्टमेंटची 
बहुसंख्य कामगार हे दुर्दैवाने 
व्यसनाधीनतेकडे वाहत जातात. 
किंवा हाताशी वेळ असल्याने
कामगार संघटना सारख्या 
उपद्व्यापच्या मागे लागतात.
कामगार संघटने मधून त्यांना 
एक प्रकारचं मोठेपणा 
एक वलय प्राप्त होतो 
बऱ्याच वेळा त्यात 
दादागिरीचाही भाग असतो. 
अन् इतरही अवाच्य फायदे असतात
तसेच ड्युटीवरील केलेली  व्यसनाधिनता 
त्यामुळे लपवता येते लपली जाते

विजय जर कामगार संघटनेमध्ये नसता 
आणि व्यसनी नसता 
तर माझा अतिशय आवडता 
कामगार झाला असता. 
त्याचे व्यक्तिमत्व 
त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन 
व्यवहार ज्ञान 
विषयाचा आवाका समजायची बुद्धिमत्ता 
आणि चौफेर  ज्ञान
त्याची कौटुंबिक बांधिलकी ..२
कुटुंबावर असलेले प्रेम 
हे गुण मला अतिशय आवडायचे.
पण जठार आग्रे व विजय हे त्रिगुण 
एकत्र समोर येवू नये असेच वाटायचे .

मी विजयला भेटलो तेव्हा 
फारसा ओळखत नव्हतो.
पण जेव्हा ओळखू लागलो 
तेव्हा लक्षात आलं 
या माणसाला 
सुधारवता येणे शक्य नाही.
मग त्या भानगडीत 
मी कधीच पडलो नाही  
त्यामुळे आमच्या मध्ये 
कधीही कटूता आली नाही 
माझ्या हॉस्पिटलमधील काळात 
त्याने मला कधीही कुठलाही 
उपद्रव दिला नाही 
हेही एवढे सत्य आहे

विजय निवृत्त झाला आणि 
काही महिन्यांनीच 
त्याच्या प्रिय पत्नीचे निधन झालं.
हा आघात त्याच्यासाठी फार मोठा होता 
अन हा धिप्पाड देहाचा वटवृक्ष 
आतून खचला गेला..३
त्याची लाडकी लेक ही 
परदेशात शिकायला गेली 
बांधलेलं प्रचंड मोठं घर 
आणि घरात एकटा विजय
मग ते त्याचे पिणे वाढत गेलं 
आयुष्यातील वीस वर्ष तरी 
 त्यांनी स्वतःच्या हाताने 
पुसून टाकली असावीत .

असे अनेक विजय महानगरपालिकेत 
आजही आहेत .
ज्यांना महानगरपालिका सांभाळत आहे 
आणि संघटना पाठबळ देत आहेत. 
या विजयच्या आत्म्यास सद्गती लाभो 
अशी परमेश्वरास मनापासून प्रार्थना. 
आणि इतर विजयां च्या वाट्याला 
अशी वेळ येऊ नये 
ही सुद्धा परमात्म्याजवळ प्रार्थना.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, ३० मे, २०२५

वेडे गीत

वेडे गीत
********
एक वेडे गीत माझे 
मी तुला देणार होते
मेघ ओंजळीत घेत 
सवे  भिजणार होते

त्या तुझ्या स्वरात मंद 
झोका झुलणार होते 
वेचून एकेक चांदणी 
माळ तुला देणार होते 

होय होते स्वप्न वेडे 
हाती धरवत नव्हते 
लाख ओघ पावसांचे 
मिठीत मावत नव्हते 

आणि गेला ओलांडून 
ऋतु तो कळल्यावाचून 
मी क्षितिजा वरी त्या 
अजून आहे रेंगाळून

तू असे कुण्या दिशेला 
कोण व्यापारात अजून 
तेही मज ठाव नाही 
स्मृती साऱ्या विखरून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २९ मे, २०२५

लव्ह , लॅब आणि रिपोर्ट

लव्ह , लॅब आणि रिपोर्ट
*******************

रक्त माझे आज तुझ्या लॅबमध्ये येणार आहे 
बघ निरखून त्यात नाव  तुझे असणार आहे ॥

पाहील्याविना कुठले कुणाचे हे नमुने आहे
माहीत मला काम तू भराभर करणार आहे ॥

जर कदाचित विसरशील तू नाव ते बघणे 
हरेक पेशी तरीही तुला ओळखणार आहे॥

बघत आहेस तू ते त्यांनाही कळणार आहे 
पाहता तू त्याकडे रंग त्यांचा बदलणार आहे ॥

दाखव जरा ओळख त्या भेट तर घडणार आहे
चुकू दे मान्य मला रिपोर्ट तुझा चुकणार आहे ॥

होय ग नक्कीच रोग भलता दिसणार आहे
पण मी कधी काय केली तुझी तक्रार आहे ॥

हवा कुणाला उपचार इथे प्रेम आजार आहे
बरा न व्हावा कधीही जीवनाचे उपकार आहे. ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २७ मे, २०२५

लास्ट स्टेज कॅन्सर


लास्ट स्टेज कॅन्सर 
*************************
आस जगण्याची सुटता सुटेना
झिजतोय देह मन स्वीकारेना 

अडकला जीव पुन्हा प्रतिबिंबी
तडकली काच  आकळेना बिंबी

सोड बाई आता फाटलेली खोळ 
सोसते का दुःख पाहवेना हाल 

असतो का दुष्ट देव मरणाचा 
वेदनेचा डोह किंवा प्राक्तनाचा 

फाटलेला खिसा बेजार लाचार 
निरोप देण्यास उत्सुक अपार 

तया प्रेम नाही असे मुळी नाही
मागे उरणाऱ्या हिशोबाची वही 

मृत्यूहून अशी प्रतीक्षा मृत्यूची
पाहणे ही जणू सजा स्वकीयांची
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २६ मे, २०२५

पाऊस

पाऊस
*******
घेवून आभाळ डोक्यावर
वारा भणाणत येत आहे
घालीत सडा जगभर 
रानोमाळ उधळत आहे ॥

चिरपरिचित तरीही नुतन
धून कानी पडत आहे 
मातीवरती पाय ओले 
झिम्मा फुगडी खेळत आहे ॥

माझ्या मिठीत स्वप्न तुझे 
पुन्हा पुन्हा अंकुरत आहे 
कणाकणातील  गूढ ऊर्जेत 
घट सुगंधी फुटत आहे ॥

ते विजेचे नृत्य नव्हे गं 
जणू माझेच मनोगत आहे 
तुझ्या कुरळ्या केसात गर्द
श्वास होवून उधळत आहे ॥

झरे फुटले कातळातले
साद जीवनास देत आहे 
वृक्ष जुना तो पुरातन मी
अश्वस्थासम हिंदोळत आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २४ मे, २०२५

उंबरा

उंबरा 
*****
क्रमप्राप्त आहे आता उंबरे तुटणे 
सहाजिकच झाले आहे 
आता घराला उंबरे नसणे ही
लिव्ह इन रिलेशन चा जमाना जात आहे 
लिव्ह इन रिलेशन बेंचिंग मागे पडत आहे
लिविंग अपार्ट टुगेदर चा जमाना येत आहे
काळाची ही गरज आहे का ?
स्वार्था ची परिसीमा आहे का ?
स्वैराचाराच उत्कर्ष आहे का हा?
कळत नाही पण 
सारेच विवादाचे विषय आहेत 
स्त्री पुरुषाला एकमेकांची गरज असणे 
आणि एकमेकांवरती वर्चस्व ही नसणे
एकमेकांपासून मिळणारे सुख हवे असणे 
पण त्या सोबत राहण्यामुळे 
येणाऱ्या जबाबदाऱ्या नको असणे
अशा विचित्र मानसिक अवस्थेमध्ये 
ही पिढी जात आहे.
आणि आमची पिढी अजूनही 
उंबऱ्याच्या आठवणी उगाळत आहे.
कदाचित एखाद अर्धी पिढी अजून 
पण त्या नंतर.?
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...