शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

कळू यावे


कळू यावे
*******
इथे तिथे कुठे शोधू शोधू जाता 
नच येतो हाता अर्थ काही ॥१

अंतरी बाहेरी कळू येते वार्ता 
घट असे रिता सर्वकाळ ॥२

देऊळी शोधतो तीर्थ धुंडाळतो 
परि ना दिसतो मार्ग काही ॥३

मिटूनिया डोळे ध्यानात नामात 
प्रभूला शब्दात आळवतो ॥४

जरा कळू यावे कुण्या पाऊलात 
अर्थ जगण्यात काय असे ॥५

देवा दत्तात्रेया ऐसे त्वा करावे
गिळूनिया घ्यावे अस्तित्व हे ॥६

भक्ती ज्ञानाविना जरी मी उंडारे 
बांधूनिया घे रे पदी नाथा ॥ ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

आठवण

आठवण
********
तुटलेला धागा अजूनही जागा 
काळजात उगा हळहळ ॥
उगवतो दिन मावळतो दिन 
निखारे अजून पायाखाली ॥
कारे कासावीस डोळ्यांची पाखरे
घरट्यांची दारे गच्च बंद ॥
मन झाले ओझे जगणे रोजचे 
चालणे विश्वाचे अर्थहीन ॥
चढते खपली पडते खपली 
जखम ती ओली भरते ना ॥
तुटूनिया फांदी वृक्ष जगतोच 
नित्य फुलतोच ऋतू गात्री ॥
वठला विषण्ण परी रुते व्रण 
रिते ते अजून अवकाश ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

ओंजळ

ओंजळ
*******
रात्र पांघरून साधू निजला 
जरा उजाडता निघून गेला

त्याने मोजली एकेक चांदणी 
प्रकाश लेवूनी गेली विरूनी ॥

गवत इवले किंचित दबले 
उभे राहिले दवात भिजले ॥

भल्या पहाटे  तेथे उठले 
तुफान नच कुणास दिसले ॥

मिटता आकार ध्वनि अनाहत
पडला नाही कुठल्या कानात ॥

कणोकणी त्या होते स्पंदन 
अवतरलेले जणू शून्यातून ॥

मग त्या रानी मौन दाटले 
अक्षय पूर्ण ओंजळ भरले ॥

मागीतल्याविन त्या हाती पडले
तेथे कुणी जे अवचित आले ॥

🌾🌾🌾 .
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


रविवार, १ डिसेंबर, २०२४

रमेश बद्रीके

रमेश बद्रिके एक लाडका बार्बर
*********
म्हटले तर तो बार्बर होता 
म्हटले तर तो ड्रेसरही होता 
सर्वांसाठी धावणारा 
माणुसकी जपणारा .
कर्तव्यात रमणारा 
महानगरपालिकेचा 
तो एक प्रामाणिक नोकर होता 
सावळा वर्ण घनदाट केस भरगच्च मिशा 
नाकावर सरकणारा मोठ्या फ्रेमचा चष्मा 
आणि गालावर आलेला तंबाखूचा उंचवटा 
कधीही हजर हाकेच्या अंतरावर 
किंबहुना हाक मारायची नसायची गरज 
त्याची नजर बसलेली 
प्रत्येक जखम जोखाणारी 
रुग्णाची मानसिकता 
अचूक हाताळणारी 
त्याचे असणे असायचे 
बोनस जणू ड्युटीवर 
एक निश्चिती प्रसन्नता 
पसरायची मनावर 
तसा तो झाला होता रिटायर 
आठ वर्ष गेलेले उलटून 
पण भेटायचा अधून मधून '
त्याचे तेच प्रसन्न असणे 
विनम्र बोलणे आपुलकीने वागणे 
द्यायचे मला तोच संतोष 
अन स्मरायचे ते कॅज्युल्टीचे दिवस 
आणि कळले अचानक 
गेला तो हार्ट अटॅक येऊन 
परवा तेरवाच गेलेला सर्वांना भेटून
अठ्ठावण अधिक आठ म्हणजे 
सहासष्ठ वर्ष तसे काही फार नाहीत 
आणि तेही आजारपण नसतांना 
छानपैकी हिंडताना फिरताना 
पण जीवनाचा हिशोब कळतो काय कुणा
एक प्रेमळ मित्र जाण्याचे दुःख झाले जीवाला 
जीवनातून आणखीन एक तारा निखळला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४

त्या रात्री


ती एक रात्र
****
ती एक रात्र चिंब भिजली 
धुंद रेशमी मजला भेटली ॥१
होता जरी तो पथ डांबरी 
प्रकाश धूसर रंग विजेरी ॥२
टपटपणारे थेंब बोचरे 
लिहीत होते गीत साजरे ॥३
सळसळणारी कुठली पाने 
म्हणत होते सुरेल गाणे ॥४
स्तब्ध निवांत गूढ एकांत 
श्वास गुंजत होते कानात ॥५
कालातीत त्या तिच्या मिठीत 
हरवलो मी शून्य गतीत ॥६
खोल खोल ती अथांग शांती 
मन डोळ्यांच्या मिटल्या पाती ॥७
कोण असे मी इथे कशाला 
नाही उरला प्रश्न कसला ॥८
अस्तित्वातून अस्तित्वाला 
अर्थ एक जणू नवा मिळाला ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

स्वप्न


स्वप्न
****
आता आठवांना गंध येत नाही 
पुष्प मिटलेली दुःख देत नाही 

चाळवते जाग सत्य कळू येते 
बदलते कुस स्वप्न विझू जाते 

पण जीवनाचे गूढ असे कोडे 
कळूनही कधी रडू कोसळते 

हरवणे खोटे रडणे ही खोटे 
मनी रचलेले राज्य असे खोटे 

बजावून पुन्हा निद्रा वेढू घेते
नव्या स्वप्नी परी मन धूंद होते

द्यावी म्हणते मी नदीत सोडून 
स्वप्न बेवारस डोळे चूकवून 

कवच कुंडले तयाची दिसती 
जाणे ठाकणार समोर ती कधी 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

गुरू

अध्यात्मामध्ये प्रत्येकाची वाट 
वेगळी असते युनिक असते. 
एकाने असं केले म्हणून जर 
दुसरा तसेच करायला गेला तर 
तसे कधी होत नाही .
ज्याप्रमाणे आपले गुणसूत्रे 
आपला चेहरा आणि हाताचे ठसे 
सदैव वेगळे असतात, 
तसेच हे मार्ग असतात.
एक सर्वसाधारण रुपरेषा
समान असू शकते जसे की, 
सूर्योदय पाहायला जायचे 
तर पूर्वेकडे जायचे 
उंचावर जायचे वगैरे वगैरे
तद्वत भगवंताजवळ पोहोचायचे 
तर सत्वगुण अंगी बाणून 
घ्यायचा प्रयत्न करणे .
स्वतःतील अवगुण जमेल 
तसे हळूहळू कमी करणे 
जमत नसेल तर प्रार्थना करणे,
 शरणागती पत्करणे .
नामस्मरण करणे. ध्यानाला बसणे.
एवढेच हाती असते 
अंती केवळ कृपाच काम करते.
 🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...