शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

आलीस तू


आलीस तू
********:
आलीस जीवनात तू
होउनिया मधु ऋतु 
किती वाणू सखी तुला 
स्वर्ग माझा झालीस तू ॥

लाखो सलाम तुजला 
सखी लाखो कुर्निसात 
देऊ धन्य वाद किती 
जीव तुझ्या पावुलात ॥

चांदण्याचे मन झाले 
श्वास सुगंधाचे रान 
ये माधुर्य आकाराला 
जीव झाला हा कुर्बान ॥

मोहरून कणकण 
जणू झालो आम्रवन 
रूप रस गंध रंग 
तृप्त झाले हे जीवन ॥

तुझ्यासाठी जन्म झाला 
तुझ्यासाठी हे जीवन 
वांछा मनी हीच यावे 
तुझ्या कुशीत मरण ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

हिरवी पानं


हिरवी पान
******
तशी तर असंख्य हिरवी पानं 
लहरत असतात 
जीवनाच्या वेलीवर 
आणि प्रत्येक पानाला
जगायचं असतं
कोवळ्या पोपटीपणातून 
कच्चं हिरवं व्हायचं असतं
ऋतुच्या सोहळ्यात 
डोलायचं असतं

तरीही ती गळून पडतात 
खाली कोमजलेल्या अंगानं 
अकाली ओघळून
आपलं हिरवेपण अंगावर पांघरून 

तेव्हा जीवनाचे तज्ञ असतात 
वाद घालत मोठमोठ्यानं
मुठी आवळत टेबलावर आपटत
आपली मत पुन्हा पुन्हा मांडत
अन
दिवाणखान्यातील कृत्रिम बागेत 
आणि गप्पा ठोकत 
संवर्धनाच्या समानतेच्या 
सुख समाधानाच्या 
हरितक्रांतीच्या 
तेव्हा वाऱ्यानं वाहून 
आलेली ती पानं
सेवेकरी असतात झटकून टाकत 
बाहेरच्या बाहेर 
निर्विकार मनानं

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

दत्त फुंकर

दत्त फुंकर
********

डोह कळला आतला सोंग संसार हा झाला 
काही भोगला टाकला खेळ मनाचा हा सारा 

होतो उगाच वाहत काळ थोडा थबकला 
होतो उगाच मरत देह खोडा जाणवला 

मन मुरले मनात काही टाकाटाकी झाली 
सृष्टी सृजली वाढली दृष्टी जडव्याळ झाली 

दीप मिटता सकळ छाया गेल्या अंधारात 
कोणी गिळले कुणास कोण मरे प्रकाशात 

शब्द लिहितो विक्रांत हाले सावली झोतात 
आले शून्यातून वर्ण अर्थ पेटले मनात

दत्त फुंकर कानात त्याचे नभी पडसाद
आले रोरांवत पानी गेले बुडून जगत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

अपेक्षा

अपेक्षा
******

अपेक्षात तातडीच्या कार्य सारे बिघडते 
मागतांना दान मोठे झोळीच फाटून जाते 

दाता मोठा दानशूर देतो डोळे मिटुनिया 
माग मागे भिकारी जो त्यास हवे हसावया 

मुठभर आले हाती जोंधळे वा रत्न काही 
लायकी वाचून कुणास काही रे मिळत नाही 

एकदाच कुणी देतो पुरे ते बघ असते 
पेटता ज्योत दिव्याने दिवाच होणे असते 

भिक झाली बहु तुज आता चुल तू पेटवी 
आत्मतृप्त ढेकरीत बोधात जीव निजवी 

सांगतो मित्रास मित्र वेळ आहे ठरलेली 
म्हणू नकोस विक्रांत मैत्री नाही निभावली

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

स्व समर्पण

स्व समर्पण
*******::

कधी जगण्याच्या सरताच वाटा
उरचि फुटतो उगाच धावता ॥

जरी ते निशान पुढे फडफडे 
परंतु सामोरी  तुटलेले कडे ॥

कळते ना कशी  वाट ती चुकली 
अन परतीची वेळ दुरावली ॥

तर मग तेव्हा एकच करावे 
तिथेच रुजावे  अन झाड व्हावे ॥

जसे स्वीकारते बीज ते इवले 
घडले तयास म्हण घडविले ॥

निळ्या नभावर अवघे सोडावे
आपण आपले निशान रे व्हावे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

काज

काज
*****

जगण्याचे काज माझे होवो दत्त
तया स्मरणात जन्म जावो ॥

नको रे पदवी नको जयकार
खोटा व्यवहार नको आता ॥

नको उठाठेव आवडी जगाची
धनाची मानाची वांच्छा नको॥

हरवता पाश आणिक पिपासा
श्री दत्त आपैसा हाती येतो ॥

संतांची वचने धरुनी या मनी
जीवनाची धुनी केली देवा ॥

जगु दे विक्रांत दत्त स्मरणात
होवो वाताहात मनाची या ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

दत्त माझा


दत्त माझा
********
दत्त माझे चित्त दत्त माझे वित्त 
दत्त माझा मित जन्मोजन्मी ॥
दत्त माझे तप दत्त माझे जप 
दत्ताचेच रूप राहो चित्ती ॥
दत्ताविन मज अन्य  कुणी नाही
व्यापुनिया  राही दत्त एक ॥
दत्त माझे काम दत्तची आराम 
जीवाचा विश्राम दत्तात्रेय 
अवघा जन्म हा दत्ताला वाहीला 
मनी न उरला किंतु काही 
दत्त पाठीराखा जीवलग सखा 
भेटला विक्रांता कृपा त्याची

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...