मंगळवार, १४ जून, २०२२

डोळे

डोळे
***:
डोळ्यात सांडल्या 
प्रतिबिंबाचा
अर्थ शोधत 
येते आकाश 
अन विचारते 
मी थांबू का इथे ?
तेव्हा 
आसवांचा पूर येतो
डोळ्यातून .
अन मिटतात पापण्या
उत्तर दिल्यावाचून .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, १३ जून, २०२२

मळलेली संध्याकाळ


मळलेली संध्याकाळ
***********

मळलेली संध्याकाळ 
होती ओघळत
राक्षसी इमारतीच्या 
भिंतीवरून 
साऱ्या तावदानात 
विटलेले रूप 
आपले पाहत  

खर्रखटक खर्रखटक
चायनीजचा झारा होता
कढईवर  आपटत 
तिखट जळता 
दर्प हवेत सोडत 
फुटपाथवर टाकून
जुनाट खुर्च्या 
झाकली दारू 
होते कुणी ढोसत

अन पलिकडे 
स्वीट मार्टसमोर 
सुटलेले देह 
प्रमाणाबाहेर
एक एक करत 
ताव मारत 
पाणीपुरीवर

भरभरून वाहत 
टीएमटीचे धुड
करीत खडखडाट 
प्रत्येक स्पीड ब्रेकरवर .

रिक्षा भूक लागल्यागत 
चेव येऊन होत्या घुसत 
इकडे तिकडे
जोरात किंचाळत

माणसेच माणसे 
गवतासारखी 
उगवलेली सगळीकडे 
रस्त्यावर फुटपाथवर
दुकानात अन बाहेर
अस्ताव्यस्त अनिर्बंध 
काळाचा कण गिळत 
वा काळ त्यांना गिळत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १२ जून, २०२२

दत्त सोन्याचा

दत्त सोन्याचा
**********
दत्त सोन्याचा सोन्याचा 
लख्ख दीप्त प्रकाशाचा ॥
दत्त पाण्याचा पाण्याचा 
निळ्याशार लहरीचा ॥
दत्त चांदीचा चांदीचा 
पौर्णिमेच्या चकाकीचा ॥
दत्त मोत्याचा मोत्याचा 
चुरा सांडला ताऱ्यांचा ॥
दत्त तेजाचा तेजाचा 
लक्ष कोटी रे दिपांचा ॥
दत्त सुखाचा सुखाचा 
जणू आईच्या पान्ह्यांचा ॥
दत्त गीताचा गीताचा 
वेड्या विक्रांत शब्दांचा ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, ११ जून, २०२२

कॅनव्हास


कॅनव्हास
*********
तिचे येणे आणि जाणे 
कॅनव्हासवर रंग भरणे 
आणि पुन्हा पुसून टाकणे
ते प्रणयातूर हलके फटकारे   
ते जाणून बुजून रेखाटने 
पुन्हा पुन्हा त्याच वळणावर 
कुंचला फिरवीत राहणे
किती छटा किती विभ्रम
आणि अचानक कंटाळणे
खरडून रंग ओला
शुभ्र कुंचला उचलणे 
म्हटलं तर रंगाचा उत्सव 
जीवनाने उधळणे 
म्हटला तर खेळ घडीचा 
क्षणभर रंगात रंगणे 
कॅनव्हास 
धनी कृपेचा 
की अवकृपेचा 
न जाणे 
एक न सुटलेले कोडे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


शुक्रवार, १० जून, २०२२

ठिणग्यांची बीजे

ठिणग्यांची बीजे 
*************
आता आता जिझसही 
मला खुपू लागलाय
काय माझ्या रक्ताचा 
रंग एवढा भगवा झालाय

होय हे मन होते 
थोडे हिरवे
होय ते स्वप्न होते
शुभ्र पांढरे 
पण कोणी केलेले प्रहार 
जेव्हा कळू लागले 
वेदनांची शूळ 
जन्मापार जाऊ लागले 
कुणी लिहिल्या बखरीचे 
खोटे रंग कळू लागले  
एक अनाम दुःख माझ्या
आत भळभळू लागले 

बुरुज बांधून मन माझे 
संगीन घेऊन उभे राहिले 
मान्य मला बंधुत्व जगी
सौख्य पाहिजे नांदले 
अरे पण घर पाहिजे 
आपले आधी राखले 

आता पुन्हा नको 
ते अब्रूचे धिंडवडे 
टिचभर पोटासाठी 
उगा बाटवून घेणे 
लेकीबाळी बहिणींचे
बुरख्यात दफन होणे 
साला मै तो 
साब बन गया 
म्हणत मिरवत
भावाच्याच ढुंगणावर 
उद्दाम लाथा मारणे 
आपले नाही साधू म्हणून
क्रूरपणे ठार करणे

खरंच रंग माझा रक्ताचा 
आता बदललाय 
जळले रक्त बिंदू असंख्य 
आक्रोशाचा जाळ झालाय 

त्या लखलखित ज्वाला
मागतात आहुती  
माझ्या शब्दांची 
कळलेल्या प्रकाशाची  
ठिणग्याची बीजे 
प्रज्वलित करण्यासाठी .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, ९ जून, २०२२

रस्तावर

रस्त्यावर
*****
तेच मन. .   
तीच भणभण 
कानात कोंबलेले . .
तेच इयरफोन 
युट्युबवरती अन . .
तेच गाणं 

तोच भाजीवाला 
रस्त्यावर विकत 
चाललेला ओरडत 
न संपणाऱ्या 
भाजीला खेचत 

उभ्या सिग्नलला 
चेहरे नसलेल्या .
सुंदर श्रीमंत 
विशाल गाड्या 
थोड्या बाजूला 
रस्त्याच्या कडेला 
जळक्या काड्या 
विझल्या विड्या 

धुर झरत होता
छाती भरत होता 
वाढणारा रस्ता 
वृक्ष गिळत होता 
अन कावळा 
उरलासुरला 
कुठली गाडी 
फेकतेय पिझ्झा 
डोळा ठेवून होता 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


बुधवार, ८ जून, २०२२

आकाश

 आकाश
********
आकाश  पसरलेले 
गर्द निळे  अथांग गहन  
अंत नसलेले 
कधीचे कुणाचे कशाचे
होवून प्रश्न न सुटलेले

अन मी !
एक बुडबुडा साक्षीचा 
होऊन डोळा प्रकाशाचा 
उंच फेकला गेला गोळा 
कुण्या अज्ञात आयुष्याचा 
न जाणता कसला कशाचा 

म्हटले तर होतो .
म्हटले तर नव्हतो 
पण माझ्यावाचून 
दुजा कोण असतो 
जगताला 
जाणणारा 
आणि
जन्म देणारा
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...