रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

भक्तीची भाकर

भक्तीची भाकर
************

योग असे लेणे 
सुवर्ण सुंदर 
शोभे देहावर 
सजलेले ॥

नच भरे पोट
निवे तगमग 
लागता ती आग 
अंतरात ॥

तया तीच अट 
राहणे चालत 
वाट अनवट 
भुके पोटी॥

ज्ञान सांगे गोष्टी 
पक्वान्ने अपार 
परी हातावर 
देता कष्ट ॥

काय जमविणे 
कैसे शिजविणे 
नाहीच चुकणे 
मान्य तिथे ॥

भक्तीची भाकर 
मिळे हातावर 
मागता लेकरं
लगेचच ॥

विक्रांत हातात 
तुकडा इवला 
घेऊन चालला 
कौतुकाने


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

आभाळी

वृत्तीच्या आभाळी 
************

वृत्तीच्या आभाळी 
दत्त ओघळला 
गंध मृत्तिकेच्या 
आकाश जाहला ॥

कडाडे मौनात 
खुळी सौदामिनी 
उमटली झणी 
जीवनाची गाणी ॥

गडाडला नाद 
कपारी अंतरी 
कंपणात गिरी 
उभी रोमावळी ॥

बहरली उर्मी 
जाग पानोपानी 
अधीर जीवनी
जाण्या हरवूनी ॥

ये रे बा कृपाळा
वादळ होऊनी
तुटू दे रे  देठ
जाऊ दे वाहूनी ॥

विक्रांत उडाला
सुटला मिटला
पायाशी पडला
दत्ताचिया ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

अनाम्याच्या दारी

अनाम्याच्या दारी 
*************

अनाम्याच्या दारी 
नामाची रांगोळी 
मोतीयांच्या ओळी 
पाणीदार ॥

कुणी रेखी नाम 
राम कृष्ण हरी 
शंकर मुरारी 
कुणी नाथ ॥

स्वामी समर्थ वा
प्रभू गुरुदत्त 
कुणी ते स्मरत 
जगदंब ॥

जया जी आवडी 
ठिपके तो जोडी 
उभारी रूपडी 
शून्यातून ॥

भाव तो फळतो 
भक्त हे जाणतो 
म्हणुनी धरतो 
घट्ट त्यास ॥

अनुसंधानाचे 
गोड हे साधन 
विक्रांत जाणून 
सांभाळतो ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

आई जाते तेव्हा

आई जाते तेव्हा
***********

एक आई जाते तेव्हा 
जगच अनाथ होते 
मनोमनी तीच गाय 
पुन्हा पुन्हा हंबरते 

उमाळ्यात काळजाच्या 
दुःख घनदाट होते 
कोसळते अंर्त-बाह्य
मन आषाढाचे होते 

अनमोल त्या क्षणांचे 
आकाशात चित्र येते 
दिसतात तारे नभी 
हात सदा रिते रिते

फळ तुटे बीज रूजे 
सारे मातीचेच नाते 
होती परी ओरखाडे 
अन सल खोल रूते

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

भक्तीच्या पावुटी

भक्तीच्या पावुटी 
************

भक्तीच्या पावुटी 
चालो माझे मन 
प्रेमात न्हावून 
ज्ञानदेवा ॥

नको ऋद्धी-सिद्धी 
नको मानपान 
विषयांचे रान 
बोकाळले ॥

वाहता प्रेमात 
मज भेटू देत 
भक्तांची ती बेट 
जीवलग ॥

तया प्रेमळांची 
संत सज्जनांची 
घडो पाऊलांची 
सेवा मज ॥

तयांचे ते बोल 
ह्रदयाची ओल 
उतरून खोल 
प्रिय व्हावे॥ 

राम कृष्ण हरी 
वैखरी अंतरी 
अणुरेणू वरी 
गुंजो माझ्या ॥

येणे हा विक्रांत 
देवा सुखावेल 
देह सांभाळेल 
तुजलागी ॥
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

तप


तप
*******

देह तापून तापून 
होई पाप विमोचन 
घेई विक्रांता भोगून 
याने  प्रारब्ध सरेन 

किती कळत घडले  
काही नकळत  झाले 
चित्रगुप्ताने परि ते 
सारे लिहून ठेवले 

कर्ज घेतलेले सारे 
जाई ऋणको भुलून 
कर्म सावकार थोर 
घेई एकेक मोजून

बरे भोगतो भोगणे 
मनी दत्ताला स्मरून 
येणे येई मज बळ 
बाप करतो सांत्वन 

सुख तनाचे मनाचे 
इथे भोगून जायचे 
दु:ख वाट्यास आलेले 
भाग त्याच त्या नाण्याचे 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१

आळंदी

आळंदी
******
माझ्या आळंदीची 
काय सांगू ख्याती 
सिद्धांची वसती
तेथे नित्य॥

येतात तापसी 
कोठ कोठून ती
आणिक राहती 
लगटून ॥

जिथे उमापती
होय सिद्धेश्वर 
तेथिचा जागर 
सांगावा का ?॥

आणि ज्ञानदेव 
विष्णु भगवान 
रूप संजीवन 
घेऊनिया ॥

असे कणोकणी 
नामाचे स्फुरण
जया असे कान 
तया कळे ॥

माऊली कृपेने 
घडे येणे-जाणे 
चित्त धुवाळणे 
विक्रांत या ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...