सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

जगणे

 
जगणे
*****
जन्म झाला पथ सारा 
भान तया मुळी नाही
कुठली खंत वैषम्य 
जाग जगण्याला नाही.

येतात गाड्या जातात 
हात भीक मागतात.
सजे लाचारी डोळ्यात 
सल नाही काळजात 

किती सोपे आहे जिणे
देह उगाच वाहणे
पोट भरता सुखाने 
फूटपाथी त्या निजणे 

लाख भय जरी तिथे 
महाभय परी नाही 
जगणे माणसा कधी
उगा मरू देत नाही

दान पुण्याचा हिशोब 
कधी कुणा सुख देई 
भय शहारा वा कुणा
रुपयाचे दान येई 

चाले जीवन वाहत
इथे असे तसे काही 
घेवून पाणी नाल्याचे
सागर लाजत नाही 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .



रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

सरे लाघव


सरे लाघव सजले 
मरे आर्जव दाटले 
हत वेड्या होते का रे
नाते अंतरी विणले 

सारे सुखाचे सोहळे
पीक मोसमी काढले
मग राहू दे रे रान 
ऊन खात हे जळले

होता पाऊस खरा नी
पीक दवात भिजले 
हिरव्या पानांचे सुख 
रानी बहरून आले

हे तो असेच घडते 
पीक मुडात भरते
बुजगावणे बाहुले
काळया मातीत पडते 

याद कशाला ती आता 
पाण्यातल्या पावूलांची 
प्रतिबिंब जपणाऱ्या
खोल भरल्या डोहाची

 ऋतू नित्यचि हा येतो
गाणे जीवनाचे गातो 
गाणे सरता नभात
पुन्हा हरवुन जातो 

तुझे तृणाचे डोलणे
ठेव मातीत पुरून
जन्म येईल रे नवा 
तेव्हा पुन्हा ये फुलून 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .






शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

जीवन स्वीकार

जीवन स्वीकार
******

वितळणाऱ्या धुक्यागत 
जीवन हळूहळू सरत आले आहे 
या जगण्यातील आकार 
भ्रम हळूहळू विरघळत आहेत 
आणि आपण  कोणी नाही 
काही नाही 
याचे दर्शन हळूहळू स्पष्ट होत आहे
तसे म्हटले तर भय नाही 
या देहात अन मनात 
पण खंत जरूर आहे 
निसटून गेलेल्या क्षणांची 
विसरून गेलेल्या माणसांची 
मित्रांची  सग्या सोयर्‍यांची
त्या प्रिय जनांची
तसेच हुकलेल्या संधीची
ज्याचे झाले असते सोने
कदाचित.

मी आकाश आहे 
असे उंच उंच उडणाऱ्या 
झाडाच्या पानाला 
गवताच्या काडीला 
किंवा कणभर धुळीला 
वाटत असते
आणि ते खरेही असते
त्या क्षणी 
कुठल्यातरी नशिबाची हवा 
प्रसंगाची वावटळ 
घेऊन जाते माणसाला 
उंच अस्मानात 
आणि दाखवते 
एक विस्मित करणारे दृश्य 
त्या जगाच्या 
त्या आश्चर्यकारक देखाव्यात 
तो विसरून जातो 
स्वतःचे अस्तित्व 
आपलेअसलेपण 
आणि ते असीम दृश्य
पाहता-पाहता समजून जातो 
की मीच आकाश आहे 
पण थांबते ती हवा 
थांबते ते वादळ जेव्हा 
 लहरत पुन्हा येऊन पडतात 
ती अस्तित्व धरतीच्या कुशीत 
माती होऊन 

 पण ते माती होऊन पडणे
असते स्वरूपात मिळून जाणे
आपण जे काही असतो 
तिथे परतणे
आणि आणि ते घडते
प्रत्येकाच्याच बाबतीत 
अपरिहार्यपणे.

त्याच्या या संपूर्ण स्वीकारात 
किती अथांग अपार शांती असते 
किती सौख्य असते 
हे त्या स्वीकारावरतीच अवलंबून असते.
जीवनाच्या शेवटाचा
अंताचा स्वीकार 
हाच खरोखर 
जीवनाचा स्वीकार असतो  


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

नृसिंहवाडी


नृसिंहवाडी
********

वाडीच्या व्यापका 
कृपेच्या कारका 
जगत चालका 
नृसिंह देवा ॥

करुणा अलोटा 
उगा मी चालता 
भाग्याचिया वाटा 
आलो सुखे॥

तुझिया कृपेने
घडले दर्शन 
मनी विराजून 
भक्ताचिया ॥

मनाचे मालिन्य
गेले हरवून 
जागले चैतन्य 
दर्शनाने ॥

जाहलो तिथला 
असून इथला 
दर्शनी मिटला 
काळवेळ ॥

कालची पुनव 
मनी उगवली 
पुन्हा रे जाहली 
कोजागिरी ॥

विक्रांत रूप ते
साठवी  नेत्रात
जाहले क्षणात 
लक्ष कोटी ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

भोगवी


भोगवी
*****
का रे भोगवी वेदना 
मज दत्त दयाघना ॥

पाप इतुके का झाले 
भोग वाट्यास हे आले ॥

आता टाकावा म्हणतो 
देह जड हा वाटतो ॥

पुन्हा भोगायची भीती 
आहे ठेवली संगती ॥

तूच मुद्दलही देतो 
व्याज माथ्याला मारतो ॥

चक्रवाढी सावकार 
तुझा कळेना व्यापार ॥

विक्रांत चक्रात फिरे 
जन्म मृत्यू गरगरे ॥

दुःख वेदना साहतो 
त्यात प्रारब्ध पाहतो ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

जीवीचे जिव्हार

जीवीचे जिव्हार
***********

जीवीचे जिव्हार 
माझा ज्ञानदेव 
स्वानंदाची ठेव 
मुर्त पुढे ॥१

शब्द रत्नाकर 
पाऊलांसी रत 
असे सदोदित 
तया ठायी ॥२

नव सहस्त्र त्या 
ओव्या सवंगडी 
नेती पैलथडी 
हसतच ॥३

तिथे असे काय 
बुडायाची मात 
एकटीची साथ 
पुरी होय॥४

विक्रांत धरतो 
तयाला अंतरी 
शब्द शब्दांतरी
माय माझी ॥५

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मनीचे आकाश


मनीचे आकाश
****
मोह रंगल्या पाखरा
खुले  आकाश दिसेना 
फांदी सावली सुखाचे
हवे पण रे सुटेना  

क्षितिजाला अंत नाही 
मन सांगे पुन्हा मना
भय गोठलेले पंख 
वारा कवेत घेईना

वृक्ष पायतळी दिसे
लाख पंख पिसलेले 
हिरव्या झाडीत असे 
डोळे हिरवे रोखले

उड उड रे पाखरा 
फांदी सोड आता जरा 
तुझ्या मनीचे आकाश 
जावो आकाशाच्या घरा.

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...