रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

माझेपण


माझेपण 
*******:
मी पेलू शकतो का 
हे माझे मी पण 
ईश्वरा वाचून 
प्रेषिता वाचून 
वा तशाच कुठल्याही 
संकल्पनेवाचून 

आत्म्याचे अमरत्व 
देहाचे नश्वरत्व 
वगैरे 
मनात बिंबलेल्या 
संस्कारावाचून 

पुन्हा पुन्हा वाचून 
आत ठसवुन ठेवलेल्या 
प्रमेयांची ती 
पुरातन मांडणी मोडून 
राहू शकतो का मी 
माझ्या अस्तित्वात 
निखळ असलेपण होऊन

भूतकाळाच्या विचारांची 
जळमटे झटकून
भविष्यातील कल्पनांची
दिवास्वप्ने टाकून 

जिथे काही मिळवणे नसते 
जिथे काही सोडणे नसते 
त्या तृप्त निश्चळ जाणिवेत 
नित्यनूतन जळणारा 
क्षण पांघरून
एक दिवा होऊन

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

निवांत

निवांत
*****:

पायावरी डोके 
ठेवाया मी जाता 
हरवली वार्ता 
पाऊलांची ॥

देऊळी शोधले 
तीर्थ धुंडाळले 
परी ना मिळाले 
काही केल्या ॥

मिटुनिया डोळे 
ध्याईले ध्यानात 
प्रार्थले शब्दात 
आळवून ॥

मग कळू आले 
मीच पाऊलात 
पाय ह्रदयात 
एकरूप ॥

ऐसे दत्तात्रये 
मज काही केले 
आतून गिळले 
जगत्रय ॥

आता मी निवांत 
भक्ति विसरला 
ज्ञान हरवला 
कृपा झाली ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 


गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

दत्त

दत्त 
*****

द्वैताद्वैत भेद
सारूनिया दत्त 
माझ्या ह्रदयात 
विराजित ॥

मांडुनिया ठाण 
असे सदोदित 
आहे रे मी दत्त 
म्हणतसे॥

दत्त तो सोहम 
दत्त आत्माराम 
दत्त मूळ धाम 
स्वरूपाचे ॥

नाम रूपा विन 
कोंदाटे चैतन्य 
माझे मीपण 
मावळून ॥

सरला विक्रांत 
उरला विक्रांत 
सांगण्यास बात 
शब्द नाही ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

सांज

सांज
****

सरता सरता दिन 
किती उजेड पडला 
गर्द पिवळा प्रकाश 
कणाकणात भरला 

मंद धूसर होणारे 
क्षितिज गुलाबी झाले 
किती वर्ण सुवर्णाचे 
आभाळ घेऊन आले 

घडली किमया अशी 
नकळे ही कुणामुळे 
उधळले स्वप्न माझे 
रंगी हरवून गेले 

प्रहर अर्धाच जरी 
आनंद कल्लोळ लोटे 
मिटण्याची खंत गेली 
सुखोर्मी देहात दाटे 

पेटवून लक्ष दिवे 
अनायसे गेलीस तू 
अंतरात वृक्ष परी
चैतन्याचा झालीस तू 

सांजसखी जीवनाचा
झाला असा हा सोहळा 
आता मिठी तृप्त देतो 
पुढच्या मी अंधाराला

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

शब्दाने शब्द वाढतो तेव्हा

शब्द वाढतो तेव्हा 
*******

शब्दाने शब्द वाढतो तेव्हा 
मनात जाळ पेटतो तेव्हा 
दत्त माझ्या मनात हसतो  

थोडे टोचून मजला म्हणतो 
असा कसा वेड्या वागतो
अन वर माझा भक्त म्हणवतो

अन् मग शब्द त्याच क्षणी 
जातो पुन्हा आपल्या स्थानी 
जिथुन की उगवून येतो 

तो क्रोधित अंध अहंकार 
फणा काढल्या नागाचा फुत्कार
आवेश ओसरून नाटक होतो 

चुकलो म्हणतो देवा आता 
नापास झालो परीक्षा पाहता 
पुन्हा अभ्यासाला बसतो 

पण जोवर तुम्ही आहात सोबत
मती चुकता भानावर आणत  
भाग्याचा पाईक ठरतो 

ही कृपाही कमी नाही 
जेव्हा वृती वृतीस पाही 
तुझी करुणा दत्ता जाणतो 

जाळ नुठू दे ठिणगी पडता 
भान असू दे हर क्षण जगता  
हीच प्रार्थना तुजला करतो .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

प्रार्थना

प्रार्थना
******

कुठल्यातरी विराण देवळात 
आड बाजूच्या परिसरातील 
कोणी एक पुजारी 
दिवा लावून जातो 
रोजचे एक कर्तव्य 
पार पाडून जातो 

नवे तेल नवी ज्योत 
परी दिवा तोच असतो
प्रकाश तसाच दिसतो 
तरी त्यात नवा हुंकारअसतो 

क्षणाक्षणाने सरणारे तेल 
पिवळ्या मंद प्रकाशाने 
उजळलेला गाभारा 
उग्र गंधीत शेंदरी देवता 
हलणार्‍या सावलीचा
निशब्द गूढ पसारा

काळ वाहत असतो 
म्हटला तर गोठलेला असतो 
तिथे कुणी येणार नसते 
तिथून कोणी जाणार नसते 
तरीही ती ज्योत जळत असते 
अन कधीतरी मध्यरात्री 
हळूच विझून जाते 
क्षणभर पसरतो 
जळलेल्या वातीचा तेलाचा 
एक गंध 
एक तेलकट तवंग
अन क्षणात कुठेतरी
विखरून जातो

उजेड कोणी पाहत नसतो 
अंधार कुणा दिसत नसतो 
दिवाही वाट पाहत नसतो 
उद्याच्या संध्याकाळची 
तो फक्त असतो 
देवतेसमोर 
आपल्या असण्यात 
अस्तित्वात 
प्रार्थना होऊन 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

भक्ती दे

भक्ती दे
******

आंधळी देई रे 
डोळस देई वा 
भक्ती दे रे देवा 
मजलागी॥

म्हणोत कोणी ते 
बुरसट मला 
वायाला गेला 
पाठीमागे ॥

हसु दे  टिळ्याला 
हसू दे माळेला 
हसू दे नामाला 
मुखातल्या 

राहू दे झिंगला 
मनात रंगला 
सुखात रमला 
तुझ्या दत्ता

लाव रे नामाला 
लाव रे ध्यानाला 
लाव रे कामाला 
हव्या त्या तू ॥

राहू दे परी रे 
तुझाच मजला 
हरु दे दाटला 
विश्वाभास ॥

विक्रांत भिजला
अंतरी मिटला 
सुखात बसला 
चिंब न्हात ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...