सोमवार, १० मे, २०२१

मायबाप स्वामी

मायबाप स्वामी
************

मायबाप स्वामी माझे 
बंधू-भगिनी सोयरे 
तयार कृपा सावलीत 
आहे माझे सुख सारे ॥

फार काही सेवा जरी 
झाली नाही माझे हाती 
हेतू विन प्रेम परी 
करी माय भगवती॥

कृष्णमेघ आषाढीचा 
उदार तो सर्वा ठाई 
येता जरा अंगणात 
प्रेमी तया चिंब होई ॥

पुरविले किती हट्ट 
साथ दिली संकटात 
दत्त दत्त म्हणे वाणी 
स्वामी माझ्या हृदयात ॥

काय असे पुण्य होते 
स्वामी आले जीवनात 
विनवी विक्रांत तया 
फक्त पदी राहू द्यात.॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

लेखणी



लेखणी
******

कुणी म्हणे शस्त्र  
कुणी वा लेखणी 
धन्य खरोखर 
तियेची करणी ॥

कधी हळुवार 
होत अलवार 
ओघळते आत
होऊन पाझर ॥

कधी होते आग 
तोफ तोंडागत 
येई त्या समोर 
राहते जाळत ॥

कधी होउनिया 
मुग्ध प्रेम गीत 
देई उमलून 
हृदयी वसंत ॥

मायेच्या वात्सली 
कधी ओसंडते 
सुखाचा सागर 
उरात भरते ॥

जितुकी जे भाव 
तितुके ते रूप 
आणिक अरूप 
रूपी दाखविते ॥

विक्रांत सदैव 
तियेचा तो  ऋणी
अक्षर सृष्टीचे 
दान हे घेऊनी ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शनिवार, ८ मे, २०२१

कट्यार

कट्यार
******:

बांधुनिया कटी
बहु मिरवावे 
प्रसंगी वधावे 
अरी उर ॥

शयनी भोजनी 
विना ताटातुटी 
घडावी ती प्रीती 
ऐसे वाटे ॥

परी म्यानासह
तुज मांडलेले 
दिवाणी ठेविले 
सजवून ॥

कलाकुसरीने 
सूक्ष्म घडविले 
वाहव्वाचे झाले 
क्षेत्र जणूं ॥

रहा शोभेचीच
अस्पर्श रक्त तू 
विसर शस्त्र तू 
आहेस हे ॥

तर मग जन्म 
कशाला कट्यारी 
स्मृतीचिन्हांपरी 
मिरवाया ?॥

अवेळीच जन्म 
अकर्मीच कर्म
हरवून धर्म
जगणे हे॥

देई सोपवून 
ऐश्या कुण्या हाती 
न हो धुळ माती 
गंजुनिया ॥

आत्मरक्षणाला
वधाया रिपूला 
सज्ज हो कटिला 
भगिनींच्या॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शुक्रवार, ७ मे, २०२१

विनाकारण

एक विनाकारण कविता 
. . 
विनाकारण प्रेम होते 
ऐकले होते 
अन कुठे कुठे  वाचले होते 
तसे तर आम्हीही 
विनाकारण प्रेम केले 
विनाकारण शब्द खर्चीले 
पायावरती प्राण वाहिले 
पण तरीही कुणीही कुणीही 
विनाकारण आम्हा न पाहिले 
प्रेम घडते हृदय जडते 
नच का कधी केले जाते 
हे ही आम्हा ठाऊक होते 
ऐकुन वाचून कुठेतरी ते
पुढे विनाकारण खूप भटकलो 
अन् लग्न करूनी पुरे म्हणालो 
काही कारणे झाला संसार 
भाजी मिरची धान्य बाजार 
मुले जन्मली ती वाढविली 
शक्ती मतीने सुजाण केली 
आणिक संसार तेल मिठाचा 
जग राहटीचा केला साचा 
पण जे होते 
विनाकारण . .

विनाकारण 
मनात अजून 
अगदी अगदी 
विनाकारण,. . .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

वाट पाहीली



वाट पाहीली
*********

वाट तुझी पाहिली रे
डोळ्यात प्राण आणूनी
तारका विझूनी गेल्या
शोकात अश्मी होवूनी

भिजलेले शब्द माझे 
चिंब भिजल्या प्रार्थना 
मागण्याची लाज वाटे 
आता झिजल्या शब्दांना

पुरी झाली दत्ता आता 
तीच तडफड उरी 
पुन: पुन्हा दुःख ओझे
का रे देतोस या शिरी

चालण्याचा सोस नको
मखमली वाटेवरी 
काय मज देणे-घेणे
तुजविन आग सारी

प्रार्थना हा देह झाला 
याचना हा श्वास आता 
जगण्याच्या नाटकात 
नको ठेवूस विक्रांता


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गुरुवार, ६ मे, २०२१

शब्द



शब्द 
*********
धारदार शब्द जाती 
काळजाच्या आरपार 
रुततात तया कळे 
अवमानी काय मार 

मृदू मंद सांत्वनाचे 
शब्द देती मनाधार 
प्रिय ऋजु भावनांचे 
तरंगची जयावर 

गोड बोबड शब्दांनी
आनंदते घरदार
सौख्य असे स्वर्गीचे हे 
ओघळते अलवार 

लाडेलाडे शब्द काही 
नेती उंच झुल्यावर 
मोरपीस ह्रदयात 
जणू काही हळुवार 

शब्द कधी जाळणारे 
मनी सुड पेरणारे
जन्म सारा स्वाहाकार 
येवुनिया करणरे

तेच शब्द बाराखडी
तिच जीभ त्याच ओठी
बदलता मनोभुमी
जग सारे बदलती

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

गाढव

-----------
गाढव
******

गाढवा घरी 
गाढव जमले
गाढव कोण 
ते शोधू लागले .॥
एक म्हणाले 
कायदा गाढव 
नाही रे मिडीया 
दुसरे  वदले ॥
टोपीला बोट 
त्रयाने दाविले 
कुणी कामाला 
फुकट जुंमले ॥
वाद जाहाला 
गोंधळ उडाला 
लाथा लाथांचा 
पावुस पडला ॥
एक शहाणा 
तो कुठुन आला 
आणिक तया 
सांगु हे लागला ॥
तुम्ही सगळे 
गाढव जमले 
दुगाण्या खावून 
नाकाड फुटले ॥ 
आणि गाढवा
गाढव मिळाले
डोईस त्याच्या 
लेबल लागले ॥
विक्रांत आता 
बहू पस्तावतो 
लेबल माथा 
लाजे मिरवितो॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...