बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

असणे सकळ





असणे सकळ
*************

माझा रंग मला
तुझा रंग तुला
आहे का वेगळा
दत्तात्रेया

माझे हरवले
तुज सापडले
तू ना वेचियले
बरे तर

नको वाटाघाटी
नको आटाआटी
पडू दे सोंगटी
खेळाविना

मनाचा पिंपळ 
आकांक्षा हिंदोळ
व्यर्थ सळसळ
करी ना का !

तू तर केवळ
असणे सकळ
कुणा कैसे बळ
फुटायाचे

विक्रांत लुटला
शुन्यात बुडाला
मेला की वाचला
कुणा ठाव

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

भ्रष्ट इया वाटा




भ्रष्ट इया वाटा
जाती दूरवर
तया अंतपार
नाही काही

अमर ती वेल
तिला न मरण
घडते पोषण
परजीवी

अधिकाची हाव
रुतलेली खोल
फक्त हात ओल
कळे तया

कोण भरडतो
कुणा त्रास होतो
मुळी ना पाहतो
घेणारा तो

कुणी ते निडर
वाण घेत करी
गडद अंधारी
दीप होती

तेच दीपस्तंभ
विक्रांता आशेचे
वादळ वा-याचे
साथी खरे

मिळावे तयास 
उदंड आयुष्य
दत्त परमेश
कृपा करी

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**-

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

तुझे वेध



तुझे वेध
******
पुन्हा तुझे वेध
लागले मनाला
पुन्हा प्राण झाला
वेडापिसा ॥

तुझ्या पुनवेच्या
ओघी दाटलेला
एक मी इवला
कण व्हावा ॥

जरी रित्या हाती
विझलेल्या गात्री
परतोन यात्री
येवो घरा ॥

पुन्हा एक घाव
हातोड्याचा तव 
सोसुनियां जीव
सुखी व्हावा ॥

पाहू नको वाट
फिरव वा पाठ
अट्टाहास दाट
परी माझा ॥

पडो देह माझा
पहिल्या पायरी
प्रभू गिरनारी
हवा तर ॥

परी तुझे प्रेम
राहू दे उदंड
व्हावी बडबड
सार्थ काही ॥

विक्रांत उपाशी
तुझिया दाराशी
वेढून सुखासी
मरू पाहे ॥

**************
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २ डिसेंबर, २०१९

दत्त आठव





दत्त आठव  
********

दत्ता आठव  
नेत्री साठव  
दुर पाठव  
काम क्रोध  

होई वेंधळा
घाली गोंधळा
दत्त सांभाळा
परि चित्ती  

सुटो चाकरी
लुटो भाकरी
मिटो लाचारी
जगण्याची  

तोच केवळ
करी सांभाळ
चित्त निर्मळ
भक्ती प्रेमे  

बैसे विक्रांत
तया ध्यानात
दत्त कानात
गुज सांगे  

देह सुटला
शेषी उरला
प्राण धरला
हाती आता  
****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.
com

त्या मेल्या उंदरास( आज मर्ढेकरांचा स्मृती दिन आहे म्हणून )


त्या मेल्या उंदरास
( आज मर्ढेकरांचा स्मृती दिन आहे म्हणून )

************
मेल्या उंदरांचा डोळा
गेला खाऊनी कावळा
पापपुण्य मोजायला
जग अजूनही गोळा ॥

कुणी विचारतो जाब
कुणी शोधे कारणाला
घंटा घणाणे पुराण
पडे प्रश्न देवळाला ॥

मेला पिपा का बुडून
कुणी कासाविस झाला
झाले रामायण त्याचे
किडा मनात बसला ॥

होता जीवनाचा गुंता
काय होती तडफड
त्याच्या वेदनांची वही
करे उरी फडफड ॥

का रे आणली अक्षरे
सुख भरल्या घराला
अर्थ टाळता टाळता
झालो बहिरा आंधळा ॥

**************
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १ डिसेंबर, २०१९

सोनेरी मासोळी




सोनेरी मासोळी
 *************

सोनेरी पाण्यात
सोनेरी मासोळी
सोनेरी झळाळी
डोळीयात

सोनेरी जिण्यात
सोनेरी गाण्यात
सोनेरी लेण्यात
मिरवती

तरी का तहान
दाटते कंठात
आकाश डोळ्यात
उतरते

जडावती पर
हरवते भान
किनाऱ्यात मन
अडकते

का ग बाई अशी 

येते काकुळती 
वैराग्याची वस्ती 
शोधू जाशी

विक्रांत मासोळी
धावे वृक्षातळी
दत्त नरहरी
असे तिथे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**

भेट होत नाही (ऋतू)




ऋतू
***
लाख ऋतू गेले तरी
ऋतू  का तो येत नाही
फुटून कणकण हा
का रे फुले होत नाही

पांघरले देहावरी
तेज लाख तारकांचे
पेटून जाणिवा जन्म
का हा दीप होत नाही

मावळतो दिन माझा
रोज रात्रीत नाहतो
थांबून क्षण काळ हा
तव भेट होत नाही

येवो आभाळ खालती
जग थांबणार नाही
निरर्थ जाणून सारे
शोधणे थांबत नाही

जगी त्रांगडे असे हे
हवे ते मिळत नाही
पाणी जातसे वाहून
पाहणे थांबत नाही

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...