रविवार, १७ मार्च, २०१९

अवधूत प्रभा



वधूत प्रभा
*************

जाय खोलवर
कळल्या वाचून
मनाची सोडून
निरगाठ ॥
कळू कळू आले
शब्द वेचलेले
दिसते अडले
काय कुठे ॥
मनाला मरण
ठेवले वाढून
देहाला लावून
प्रारब्धाला ॥
विक्रांत चालतो
त्याच त्या पथात
परी पावुलात
जाग नवी ॥
अवधूत प्रभा
सर्वांगा वेढली
अन उतरली
अंतरात ॥
जगणे मरणे
होईल जाईल
उजेडी राहील
सदा तया ॥
🚩🚩🚩
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १६ मार्च, २०१९

दत्ताची वाट 2




दत्ताची वाट
जाते
गंगातीरी
चढे 
गिरणारी

दत्ताची वाट
घुमे 
कोल्हापुरी
थांबे

गाणगापुरी

दत्ताची वाट 
खेळे 
वरदपुरी 
निजे 
श्री माहुरी

दत्ताची वाट
शिरे
खोल उरी 
उरे
भक्तांतरी

दत्तची दिसे
सदा
घरीदारी
उभा
वाटेवरी

दत्ताची वाट
कळे
संता घरी 
वळे
भक्ता दारी

विक्रांत उभा
लीन
जन्मभरी
मनी
दत्त स्मरी

दत्तची होई
स्वये
वाट पुरी
दावी  
रुपे सारी 


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

ती म्हणजे

ती म्हणजे
***

युगोनयुगे तो शिरत आहे
तिच्या कुशीत
अन मग  तिच्या मिठीत
तिच्या नजरेतील वात्सल्यात 
कृतकृत्य होत
तिच्या प्रेमाने उमलत
आश्वस्त होत

ती कधी असते दासी
कधी महाराणी
कधी वारांगनाही
कधी कधी ती त्याच्या
भाषेचीही नसते
वर्णाची नसते
धर्माची ही नसते
पण शब्दाविना सारे
समजून घेते
डोळ्यांची भाषा तिला
किती सहज कळते

कधी ती आई कधी आजी
कधी ती बहीण कधी मैत्रीण
कधी अर्धांगिनी
तर कधी ती मुलगी असते
त्यांच्या सर्व वेदनांचे उत्तर
त्याला तिच्या शब्दात
अन स्पर्शात मिळते

आणि नजरेच्या त्या बळावर
तो झेलू शकतो अनंत जन्म
मरणातूनआलेले
त्यांचा ठाम विश्वास असतो
तिचा शक्तीवर
मांगल्यावर
अन कारुण्यावर

त्याला कधीच प्रश्न पडत नाही
तिच्या शिवाय
त्याचे कसे होणार याचा
कारण ती त्याचाच भाग असते 
सदैव सनातन अविभाज्य
तिच्या शिवाय तो 
कल्पनाही करू शकत नाही
जीवनाची अस्तित्वाची
किंबहुना तीच
त्याचा जीवनाधार असते
अवनींच्या गाभ्यापर्यंत गेलेल्या
मुळासारखी
त्याच अस्तित्व टिकवणारी
त्याचे पोषण करणारी
ती म्हणजे तोच असते

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

पूल पडतो




पूल पडतो

पाच जीव निष्पाप तरुण 
जातांना घरी कामावरून 
मरतात पूल पडून 
भ्रष्ट कुणाच्या अदृष्य हातून

कॉन्ट्रॅक्टर म्हणतो
हात वर करून 
मेंटेनन्स नाही झाला म्हणून 
इंजिनिअर म्हणतो 
की तक्रार आली नाही म्हणून
तर  रेल्वे प्रशासन
 आमचा संबंधच नाही म्हणून

 म्हणजे मग मेले ते
 काय त्यांच्या कर्मांनं?
 की जन्मजन्मांच्या पापानं?

निर्ढावलेले भ्रष्ट राजकारणी
इंजिनिअर अन कॉन्ट्रक्टर 
असेच राहतील सर्वदूर
बसलेले गाडलेल्या प्रेतांच्या
राबिटच्या ढिगांवर

 त्यांना वाचवणारी यंत्रणा
 नेहमीप्रमाणे चौकशी लावून
 जाईल मोकळी होऊन

 हे थांबेल असे वाटत नाही

मेलेल्या आयांच्या पोरांचा टाहो
काही दिवसातच
विस्मृतीत जाईल
मीडियाही निवडणुकीच्या
बातम्यात मग्न होईल
चौकशीतून भ्रष्टाचारी
सुटलेले असतील
त्या आयांची पोरेही
मोठे झालेले असतील

अन निव्वळ एक
दुर्दैवी अपघात म्हणून 
ती फाईल दफ्तरी बांधली जाईल
पुन्हा एक ब्रिज पडे पर्यन्त !


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १४ मार्च, २०१९

आता मागतो विरक्ती




दिले सुंदर जीवन
आता मागतो विरक्ती  
तीही तशीच श्रीदत्ता  
तुझी घडतांना भक्ती

दिली जिवलग सखी
मातृपितृ ही देवता
भ्राता भगिनी निर्मळ
सुख भरूनिया हाता

दिले आजोळचे सुख
कन्या पुत्र नम्र शांत
बरे पोटाला साधन
नाही गरिबीची खंत

सुख संतृप्त जीवन
उगाचच दु:ख थोडे
केला इहलोक भला
आता न्यावे पलीकडे

जन्म जगलो प्रसन्न 
तया तुझे अधिष्ठान
आत तळमळ परी
तुझ्या दर्शनावाचून  

हेतू हाची एक आता
दत्ता भरून राहिला
येई देई भेटीलागी
करी विक्रांत मोकळा

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, १३ मार्च, २०१९

दत्ताचे वारकरी




दत्ताचे वारकरी
***********

म्ही दत्ताचे  
नित्य वारकरी 
तया गिरनारी  
जावू सदा 

पाहुनी पदाला
निवतात डोळे 
चढू प्रेमबळे
म्हणुनिया  

या पावलांची 
ओढ या जीवास
चैन या मनास
पडेचि ना 


सरो देह तिथे
सोने व्हावे त्याचे    
जावो अस्तित्वाचे
भान वाटे 


होईल पदाचा
कण मी तयाचा 
अनंत काळाचा
क्षण नित्य 

वेध हे लागले   
वेड हो जन्माचे
विक्रांत मनाचे
दत्तात्रेया 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, १२ मार्च, २०१९

विराजित दत्त




विराजित दत्त
माझ्या हृदयात
सदा निरखत
माझे मला

सावध सतत
करितो मोजणी
सांगे क्षणोक्षणी
काळ गेला

करी ना आग्रह
ठेवी ना डांबून
अस्तित्वाची धुन
पण गाजे

पाप पुण्य माझे
दावी मी ही तया
त्याची त्यास माया
घेरे म्हणे

तुझा तू मोकळा
कर्म करण्यास
साक्षी मी तयास  
सांगे तो ही

केले करणे ते
तयास अर्पूनी
विक्रांत सुखानी
वर्ततसे

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...