गुरुवार, १४ मार्च, २०१९

आता मागतो विरक्ती




दिले सुंदर जीवन
आता मागतो विरक्ती  
तीही तशीच श्रीदत्ता  
तुझी घडतांना भक्ती

दिली जिवलग सखी
मातृपितृ ही देवता
भ्राता भगिनी निर्मळ
सुख भरूनिया हाता

दिले आजोळचे सुख
कन्या पुत्र नम्र शांत
बरे पोटाला साधन
नाही गरिबीची खंत

सुख संतृप्त जीवन
उगाचच दु:ख थोडे
केला इहलोक भला
आता न्यावे पलीकडे

जन्म जगलो प्रसन्न 
तया तुझे अधिष्ठान
आत तळमळ परी
तुझ्या दर्शनावाचून  

हेतू हाची एक आता
दत्ता भरून राहिला
येई देई भेटीलागी
करी विक्रांत मोकळा

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, १३ मार्च, २०१९

दत्ताचे वारकरी




दत्ताचे वारकरी
***********

म्ही दत्ताचे  
नित्य वारकरी 
तया गिरनारी  
जावू सदा 

पाहुनी पदाला
निवतात डोळे 
चढू प्रेमबळे
म्हणुनिया  

या पावलांची 
ओढ या जीवास
चैन या मनास
पडेचि ना 


सरो देह तिथे
सोने व्हावे त्याचे    
जावो अस्तित्वाचे
भान वाटे 


होईल पदाचा
कण मी तयाचा 
अनंत काळाचा
क्षण नित्य 

वेध हे लागले   
वेड हो जन्माचे
विक्रांत मनाचे
दत्तात्रेया 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, १२ मार्च, २०१९

विराजित दत्त




विराजित दत्त
माझ्या हृदयात
सदा निरखत
माझे मला

सावध सतत
करितो मोजणी
सांगे क्षणोक्षणी
काळ गेला

करी ना आग्रह
ठेवी ना डांबून
अस्तित्वाची धुन
पण गाजे

पाप पुण्य माझे
दावी मी ही तया
त्याची त्यास माया
घेरे म्हणे

तुझा तू मोकळा
कर्म करण्यास
साक्षी मी तयास  
सांगे तो ही

केले करणे ते
तयास अर्पूनी
विक्रांत सुखानी
वर्ततसे

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




सोमवार, ११ मार्च, २०१९

दत्त प्रभूच्या भेटीला




दत्त प्रभूच्या भेटीला
जाई गाणगापूरला
चित्त हरवो तयात
मन प्राण संगमाला

तिथे नांदतो कैवारी
मु निर्गुणी सजूनी
खेळ बाहुल्यांचा तोही
जरा घे रे  पाहुनी

घाल साद रे तयाला
सार्‍या सोडून भयाला
बाहृदया मधला
असे बाहेर बैसला

तुच पाहण्या तुजला
जणू दर्पण ठेविला
मूर्त लोभस आतली
दिसे ऊन उजेडाला

दत्त विक्रांता मधला
पाहू जाता रे कळला
देत थाप नि म्हणाला
थांब इथेच सदाला

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, १० मार्च, २०१९

गिरनारी बंधू




गिरनारी बंधू
*********

गिरनारी बंधू होई
सखा साथी जीवनात
मागतो हेच तुजला 
फक्त देई तव हात


या नशिबी नाही का रे 
पौर्णिमेची ती रात
पुण्य तुझी अनुभूती
खरकट्या काळजात

मरणाचे भय नाही
दयाघना जीवनात
तुझ्याविना जगतो हे
शल्य ले हृदयात

काकुळती व्यर्थ का रे 
पुसे तुजला विक्रांत
तडफड शांत करी  
मागतो हे दिनरात

वागवितो चिंध्या अश्या 
लाज वाटे अंतरात  
वस्त्र माझे उसवले
जळो दत्ता क्षणार्धात  
  
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



शनिवार, ९ मार्च, २०१९

रानोमाळ हाका माझ्या




रानोमाळ हाका माझ्या
रानोमाळी साद रे
जन म्हणे पिसा झाला
ऐसा लागे नाद रे

पाहतो मी धन्य झाले
गुरूमार्गी भक्त रे
फाटके नशीब माझे
कसे अस्ताव्यस्त रे

येई बापा दिगंबरा 
हृदयात जारे 
करुणेचा ओघ लोटी 
करी प्रतिपारे

विटले हे मन माझे
विश्व चाकोरीत रे
सुख दुःख तीच रोज
अर्थहीन ही बात रे

पांगुळला देह आता
थकले हे चित रे
आक्रंदन कणोकणी
कुठे आहे दत्त रे

जगण्याचा भार झाला
जगतोय विक्रांत रे
भेटुनिया जाई देवा
एकदाच फक्त रे  
****

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

जीवना


जीवना (on my birthday)
*****
पंख लावून काळाचे
स्वप्न तरंगत आहे
जीवना तुझे वाहणे
किती आनंदात आहे ||
भोवताली जमलेला
जिवलगांचा हा मेळा
मैत्री प्रीतीत सजला
ऋतु सुखावत आहे ||
प्रत्येक फुलात येथे
श्वास उमलत आहे
प्रत्येक पक्ष्यास डोळे
पाहता चकित आहे ||
हे आकाश निळे गर्द
मी प्रकाश होत आहे
वाहतोय मुक्त वात
उर्मी वोसंडत आहे ||
जीवना मी ऋणी तुझा
मम स्वामी दत्त आहे
इहपर सुखात मी 
बघ नित्य तृप्त आहे ||

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...