मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

वसंतागमन



वसंतागमन
*********

झाडावरती
नवी पालवी
वसंतातली
मोहरली

रहदारीचे
भान न तिला
जागा टिचभर
कुठे उरलेली

कोमल कोवळ
जीर्ण जिण्यावर
हळूच उमटली
जीवन मोहर

मीच असे रे
माझ्यानंतर
भान तरळले
अस्तित्वावर

आणि नितळ
नभात वरती
रंग फिकटसा
काही निळसर

झोत बोचरे
हवे हवेसे
आले लंघून
दिशा उत्तर

अणू रेणुने
स्वागत केले
कणो कणी
गाणे गुंजले


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

दत्त स्तुती




जगदाधारा श्रीदत्ता
भक्तवत्सला श्रीदत्ता
दीनदयाळा श्रीदत्ता
कृपाकटाक्षा श्रीदत्ता

अघतमखंडा श्रीदत्ता
विघ्नविनाशक श्रीदत्ता
कलीमलभंजक श्रीदत्ता
शरण्य रक्षक श्रीदत्ता

अनादिसिद्धा श्रीदत्ता
सगुणसाध्या श्रीदत्ता
ब्रह्मस्वरूपा श्रीदत्ता
हृदयी स्थित श्रीदत्ता


कोटी सूर्यसम श्रीदत्ता
नवांकुरागत श्रीदत्ता
मनागम्य श्रीदत्ता
विग्रहसुंदर श्रीदत्ता

कणकण स्थि श्रीदत्ता
मनमन मित श्रीदत्ता
क्षणक्षण रिक्त श्रीदत्ता
विक्रांत वरदा श्रीदत्ता

नित्य निरंजन श्रीदत्ता
सत्य संजीवन श्रीदत्ता
जगजीव वंदन श्रीदत्ता
भवभयहरण श्रीदत्ता
अनसूयानंदा श्रीदत्ता
अत्रेयनंदना श्रीदत्ता
दुर्वासानुजा श्रीदत्ता
शशिकरप्रिया श्रीदत्ता

गिरनारी तप श्रीदत्ता
काशीपुरी जप श्रीदत्ता
कोल्हापुरी क्षुब्ध श्रीदत्ता
माहुरी निद्रिस्त श्रीदत्ता

सदा स्मृतगामी श्रीदत्ता
वदा भक्तकामी श्रीदत्ता
सर्व वृतीधारी श्रीदत्ता
जयजय जय श्रीदत्ता
**

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, १० फेब्रुवारी, २०१९

सुनामी



सुनामी

तू आलीस अचानक
एक सुनामी होऊन
अन् एक कहाणी
गेलीस समोर ठेवून

मी तर बसलो होतो
नुकता
सारे आवरून
फुललेल्या
वसंताच्या स्मृती
साऱ्याच पुसून

चालत होतो
रोज रोज
त्याच पथी
चाकोरीतील जीवन

वाहत अकारण
देह मन
गेलो गेलो होतो
स्वतःस विसरून

येताच तू मी ऐकले
हे ह्रदयाचे  धडधडणे
गात्रागात्रातील थरार
अन् मनाचे झंकारणे .

कऴले अचानक
अरे जीवन बाकी आहे अजून 

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

रे मी एक दत्त


रे मी एक दत्त
***********


रे मी एक दत्त
नि तू एक दत्त
करू नको खंत
कशाचीही  ॥१॥

नको धावू असा
राही उगा उगा
फोडूनिया फुगा
अहंचा या  ॥२

करी पारायण
दत्त नारायण
दिसेल चरण
अंतर्यामी ॥३

सगुण साकार
प्रेमाचा आकार
घेऊन आधार
सनातन ॥४

कळेल रे अर्थ
निर्गुण ते तीर्थ
प्रयाग कूटस्थ
त्रिकुटीत ॥५

अत्रीचा प्रेमळ
सांगतो कृपाळ
विक्रांता सरळ
गुज गूढ ॥

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


संचिताचा खेळ खुळा





संचिताचा खेळ खुळा
तुझ्या माझ्या नात्यातला
मांडीयला त्या कळेना
अंत काय द्यावा याला

द्यावी फरफट उगा
की अर्थ काही सजला
साकळले व्रण किंवा  
हात हळू फिरणारा

मागण्या वाचून आले
दान हाती जे या करी
स्वागताला सज्ज सदा
झेलून त्या घेतो उरी

सुख दु:ख भरलेले
जीवनाचे वाहे पाणी
भेट होता तुझी गेलो   
सांज रंगात रंगुनी

तेच क्षण मागतो रे
मी तया पुन्हा पुन्हा
वाहण्याचा धर्म दे रे
जीवनात जगतांना

लेख लिहलेले भाळी
सटवीचे असो काही
पाहतो मी तुला असे  
भाग्य हे ही कमी नाही

म्हणती प्रारब्ध कुणी
जाणे इथेच भोगूनी
म्हणतो मी भाग्य त्यास
घेतो आणि आलिंगूनी


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

दत्ताची गाणी





दत्ताची गाणी
***************

दत्ताची ही गाणी
येतात रुजूनी
मनी पाझरूनी
आपोआप ॥१॥

म्हणतो मी माझी
घेतो मिरवूनी
लिहविता धनी
वेगळाची॥२॥

दत्त कृपामुर्ती
एकेक करूनी
देतसे वेचूनी
शब्द मला॥३॥

प्रकाशी प्रकाश
मांडली आरास
उषेच्या घरास
सुर्यदेव॥४॥

जलाने जलास
पुजियले खास
अर्ध्य सागरास 
देवूनिया॥५॥

भाग्य ओंजळीचे
जुळल्या करांचे
रित्या विक्रांतचे
उदयले॥६॥

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

दत्त पदावर





दत्त पदावरी
मन माझे जाते
आणिक वळते
न माघारी ॥१॥

दत्ताच्या प्रेमात

असे हरवते
नच की रमते
अन्य कुठे   ॥२॥

दत्ता वाटेवरी

मला राहू दे रे.
सदा गावू दे रे
गीत तुझे ॥३॥

तुझे गोड रूप

डोळा पाहू दे रे .
खरा होवू दे रे
तुझा भक्त॥४॥

विक्रांत बसला

दत्ताच्या दारात
जगणे पाहत
दत्त लीले ॥५॥
*****************

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...