सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

दरी


दरी
****

लाल डोंगराच्या खाली
असे अंधार साचला
नसे वाटकरी कुणी
खाली गेला तो संपला

हा हा खेचतो उतार
वारा घेतसे ओढून
कुणी फेकल्या देहाचे
भान असे का अजून ?

युगे लोटली संपली
मौन संन्यस्त पत्थर
कुण्या मितीचे हे जीव
इथे करिती वावर ?

इथे असेल पुरले
सोने चांदी लुटलेले
कुणी केल्या कत्तलीचे
हात उजेडी धुतले

खाली कोसळे धबाबा
जग जिवंत हे सांगे
कुण्या वेड्या पावुलांची
आस कुणास का लागे ?


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

स्वानंद



स्वानंद

माझ्या मी पणात
प्रकाशाची ज्योत
राहते तेवत
स्वानंदाची ।।

मायेचे ओढाळ
मोहाचे वादळ
असून खळाळ
दुःखाचा ही ।।

तिला नसे वात
तेलाची वा साथ
तरी दिन रात
तेजाळली ।।

तिच्या प्रकाशात
जगण्याची वाट
राहते वाहत
अहो रात्र ।।

प्रभू गिरनारी
दावीयली युक्ती
स्थिरावली दृष्टी
अंतरात ।।

पाहता पाहणे
प्रकाश हे झाले
कुणी न उरले
पहावया

उसिटा विक्रांत
ठसा हा अस्पष्ट
श्रुतींच्या देशात
मौन झाला ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

तिचे चिडणे



तिचे चिडणे
*******

ते तिचे चिडणे
किती लोभस होते
फुलबाजीचे जणू
तडतडणे होते

जाळही होता त्यात
लोभही होता त्यात
रंगांची ती आरास
संतोष होता त्यात

काही क्षणांचे ते
होते तडीती येणे
दीपवून तनमन
पुन्हा विरून जाणे

म्हटले तर होते ते
कधी जीव जाणे
म्हटले तर होते
आयुष्य ओवळणे

प्रेमा तुझा रंग हा
किती दाहक सुंदर
जीव अधिक जडतो
तुझ्यामुळे प्रियेवर


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in






गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

भक्ती बंबाळ



भक्ती बंबाळ.
********

चालला कल्लोळ
भक्तीचा बंबाळ
करी रे सांभाळ
देवराया

देव नि भक्तात
युगांचे अंतर
भरते उदर
अन्य कोणी

मोठाल्या नोटेला
मोठाला आशिष
अन् चिल्लरीस
भाव नाही

चालला विक्रय
श्रद्धेचा उभय
असे निरुपाय
काय तुझा

विक्रांत गर्दीत
चालला वाहत
घडणे पाहात
क्षणोक्षणी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८

स्वर्ग बाजार



स्वर्ग बाजार
********

अहो देवांचे ते खास
तया हात लावू नका
होय म्हणती तोवर
पाने फुले वाहू नका

शब्द तयांचे प्रचंड
देवा लावती कामाला
न्याय मिळतो कधी का
कुणा विना रे वकीला

आधी नमन तयाला
मग भेटा रे देवाला
पैका आहे ना गाठीला
ना तो लागा रे वाटेला

भय आहे ना तुम्हाला
स्थैर्य हवे ना उद्याला
तर मग चला चला
देवा लावाया वशिला
----
देवा मागता तयाला
खुळा विक्रांत फसला
तया टाळून बैसता
देव आत सापडला 

कर्मकांडाचा पसारा
धैर्ये चुकवला सारा
खोटा तुटता पिंजरा
आले आकाश आकारा

आत पाहिले पाहिले
डोळे अंधारा फुटले
ज्योत जाणिवेची स्थिर 
स्वर्ग बाजार मिटले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

तुला पाहताच



तुला पाहताच

तुला पाहताच सखी
माझे मी पण सरते
व्यापून माझे अस्तित्व
फक्त तूच ती उरते

तुला डोळ्यात साठवू
जरी म्हणतो कितीदा 
परी माझे पाहणे तू
होऊन जातेस सदा

तुझे हसणे बोलणे
मोहफुली मोहरणे
देहातल्या कणाेकणी
उमलतात सुमने

तू हसता खेळाळून
ये चांदणे ओघळून
स्वर कंपणी देहाची
जाते सतार होऊन

धवल शुभ्र पौर्णिमा
तुझे  भोवतीअसणे
स्पर्श देही रुजणारे
कोजागिरीचे चांदणे



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

चकरा



चकरा

मार मारून चकरा 
गीत पायात सजेना
तुझे प्रकाशाचे दान
माझ्या प्राणांत गुंजेना 

काया पडू दे तुटून 
मन जाऊ दे भंगून 
उगा वाहिलेले ओझे  
क्षणी जाऊ दे संपून

उगा चालला आक्रोश 
पडे काळजात शोष 
नको होऊ रे पाषाण
घडो संजीवन स्पर्श 

तुझी ऐकयली कीर्ती 
आशा धरियेली मोठी 
परी निघालो माघारी 
बहू होऊनी हिंपुटी 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...