गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

भक्ती बंबाळ



भक्ती बंबाळ.
********

चालला कल्लोळ
भक्तीचा बंबाळ
करी रे सांभाळ
देवराया

देव नि भक्तात
युगांचे अंतर
भरते उदर
अन्य कोणी

मोठाल्या नोटेला
मोठाला आशिष
अन् चिल्लरीस
भाव नाही

चालला विक्रय
श्रद्धेचा उभय
असे निरुपाय
काय तुझा

विक्रांत गर्दीत
चालला वाहत
घडणे पाहात
क्षणोक्षणी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८

स्वर्ग बाजार



स्वर्ग बाजार
********

अहो देवांचे ते खास
तया हात लावू नका
होय म्हणती तोवर
पाने फुले वाहू नका

शब्द तयांचे प्रचंड
देवा लावती कामाला
न्याय मिळतो कधी का
कुणा विना रे वकीला

आधी नमन तयाला
मग भेटा रे देवाला
पैका आहे ना गाठीला
ना तो लागा रे वाटेला

भय आहे ना तुम्हाला
स्थैर्य हवे ना उद्याला
तर मग चला चला
देवा लावाया वशिला
----
देवा मागता तयाला
खुळा विक्रांत फसला
तया टाळून बैसता
देव आत सापडला 

कर्मकांडाचा पसारा
धैर्ये चुकवला सारा
खोटा तुटता पिंजरा
आले आकाश आकारा

आत पाहिले पाहिले
डोळे अंधारा फुटले
ज्योत जाणिवेची स्थिर 
स्वर्ग बाजार मिटले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

तुला पाहताच



तुला पाहताच

तुला पाहताच सखी
माझे मी पण सरते
व्यापून माझे अस्तित्व
फक्त तूच ती उरते

तुला डोळ्यात साठवू
जरी म्हणतो कितीदा 
परी माझे पाहणे तू
होऊन जातेस सदा

तुझे हसणे बोलणे
मोहफुली मोहरणे
देहातल्या कणाेकणी
उमलतात सुमने

तू हसता खेळाळून
ये चांदणे ओघळून
स्वर कंपणी देहाची
जाते सतार होऊन

धवल शुभ्र पौर्णिमा
तुझे  भोवतीअसणे
स्पर्श देही रुजणारे
कोजागिरीचे चांदणे



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

चकरा



चकरा

मार मारून चकरा 
गीत पायात सजेना
तुझे प्रकाशाचे दान
माझ्या प्राणांत गुंजेना 

काया पडू दे तुटून 
मन जाऊ दे भंगून 
उगा वाहिलेले ओझे  
क्षणी जाऊ दे संपून

उगा चालला आक्रोश 
पडे काळजात शोष 
नको होऊ रे पाषाण
घडो संजीवन स्पर्श 

तुझी ऐकयली कीर्ती 
आशा धरियेली मोठी 
परी निघालो माघारी 
बहू होऊनी हिंपुटी 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

आभाळ भरू येतांना


आभाळ भरू येतांना
************

आभाळ भरू येतांना
मन ओले चिंब होते
मृदू थेंब झेलतांना
स्पर्शात कुणी झरते

ती गंधित ओली माती
श्वासांत आभाळ होते
नि थेंब टपोरे भाली
जगण्याचे गाणे गाते

ती आली तशी तेव्हा
विजेचे पैंजन लेऊन
मी स्तिमित वृक्ष झालो
डोळ्यात तिला झेलून

तो आर्द्र शीतल वारा
प्राणात पाखरू झाला
श्वासात वादळ माझ्या
आजन्म देऊनही गेला

ती गाता गीत झऱ्याचे
जीवन कोंडे सुटले
तीरावर सुमनांचे
दोन्ही मळे बहरले


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१८

निरर्थक चर्चा


निरर्थक चर्चा

मुंगीला डोंगर ।मातीचा ढेकूळ।
अवघे ठिसूळ ।मोजमाप||१ ||
ओहळा सागर ।नदीचा आकार ।
ज्ञानाचा वावर ।बोटे तीन ||२||
शहाणे ठेवती ।तोंडावर बोट ।
वेड्यांच्या बोभाट ।मैल भर ||3 ||
महेश कापडी ।जया पथावर ।
तेथला व्यापार ।पुसु नको ||४||
विक्रांते सोडला ।दत्तावर भार।
ओठी आले चार ।खुळे बोल ||५||


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in




मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

मैत्री



मैत्री
****
निखळ निरपेक्ष मैत्री
सहज फुललेले कुसुम असते
त्यांचे उमलणे जेवढे अपेक्षित असते
तेवढेच अनपेक्षितही असते
ते कुठल्या फांदीवर केव्हा उमलावे
कुठल्या वेलीवर कधी लहरावे
याचे काहीच बंधन नसते
त्याला झाड वेल झुडूपाशी कर्तव्य नसते
त्याचे ते फुलणे हीच  त्यांची
समग्रता असते
ते फूल किती काळ टिकावे
ते गंधहीन असावे
की सुगंधीत असावे
मोहक रंगाने नटलेले असावे
की साधे शुभ्रधवल असावे
याही गोष्टी निरर्थक असतात
अशा मैत्रीचे अवतरण मनात होणे
हे मुदितेचे पायाभरण असते
किंबहुना जीवनाचे श्रेष्ठ वरदान असते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...