बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

आभाळ भरू येतांना


आभाळ भरू येतांना
************

आभाळ भरू येतांना
मन ओले चिंब होते
मृदू थेंब झेलतांना
स्पर्शात कुणी झरते

ती गंधित ओली माती
श्वासांत आभाळ होते
नि थेंब टपोरे भाली
जगण्याचे गाणे गाते

ती आली तशी तेव्हा
विजेचे पैंजन लेऊन
मी स्तिमित वृक्ष झालो
डोळ्यात तिला झेलून

तो आर्द्र शीतल वारा
प्राणात पाखरू झाला
श्वासात वादळ माझ्या
आजन्म देऊनही गेला

ती गाता गीत झऱ्याचे
जीवन कोंडे सुटले
तीरावर सुमनांचे
दोन्ही मळे बहरले


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...