सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

मी सुद्धा me too



मी सुद्धा (me too )

का होतो साधू ही
तुझ्या सारखा सैताना ?
का तू दडून असतोस
प्रत्येक मनात सैताना ?

त्या तुझ्या वासनेच्या रूपापुढे
ढासळून पडते
मूल्यांचे शिक्षण
विझून जातात
संस्कारांचे निरांजन
कलेचे पुजारी
प्रतिभेचे कलाकार
का होतात विवश अन् नाचतात
तुझा भृकुटीच्या तालावर 

देहात दडलेले वासनांचे
अमोघ अस्त्र वापरणारा 
कुणी वेगळाच असतो का ?
त्रयस्थ असा ?
रे सैताना !

का ती कुबुद्धी
का ती कुघटिका
पिशाच बनून स्वार होते
हिंस्त्र श्वापद गत
अन् जाळून टाकते
विवेकाचे इवलेसे कवाड 
सैताना !

माणूस शेवटी पशूच असतो
नाही का रे सैताना ?
पशूत्त्वाची भूमिका सांडून
वर उठायला
नेमके काय लागते सैताना ?

तू नकोच सांगूस
सांगणारही नाही म्हणा !

अन्यथा बापू बाबा मुनी 
प्रत्येक धर्मातले
नसते असे बदनाम झाले
नाही का रे सैताना !

तू जिंकले आहेत करोडोंना
धुळीस मिळवले आहेस लाखोंना
तसा तू अजिंक्यच आहे म्हणा 

पण काय रे तू असतोस का
फक्त पुरुषांच्याच देहात
टेस्टेस्टेरॉनच्या पाझरात
बेमालून मिसळत ?

माद्यांच्या कळपात
मृग नर होण्यासाठी
त्याला उसकावत
सत्ता मालकी अन् उपभोग
घेण्यासाठी प्रवृत्त करत 
आपली संतान वाढवण्याची
अभिलाषा वाढवत
का हे फक़्त तिथेच असते
सहजपणे उपलब्ध
म्हणूनच
नाही का  रे सैताना ?

अन मला तर भीती वाटते की
कदाचित मीसुद्धा असेन
तुझ्या यादीत
कुठे तरी पडलेला कोपऱ्यात
अन् तुला कधीच दिसू नये
माझा नंबर कधीच लागू नये
म्हणून असतो
स्वतःला लपवत प्रार्थना करत
पण उरी धपापत
हेही तेवढेच खरं आहे सैताना  !!


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव  साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा  पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात...