मौन
मी तुझ्या दारात मौन
तू माझ्या मनात मौन
जगण्याच्या नाटकात
विखुरल्या प्राक्तनात
मी तुझ्या सुखात मौन
तू माझ्या दुःखात मौन
अवकाळी पावसात
चिंब भिजल्या क्षणात
तुझिया डोळ्यात मौन
माझ्याही ओठात मौन
दुरावता वेड गेले
पापण्यात स्वप्न ओले
उमलते गीत मौन
उरीचे संगीत मौन
आता कुणा काय मागू
गुज अंतरीचे सांगू
दाटले नभात मौन
गोठले शब्दात मौन
मोकळेच हात होते
घेणे देणे सारे रिते
विरही स्पर्शात मौन
उरले मौनात मौन
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा