शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

शांतता



शांतता
*****

मी शोधू लागतो शांतता
गूढ गहन एकांतात
कुठल्याशा निर्जन देवालयात
कुठल्याशा शुभ्र हिम गिरीवर
अथवा पुरातन नदीच्या तीरावर
पण ती सापडत नाही
म्हणून जातो भटकत भटकत
कुठल्या साधूंच्या आश्रमात
वा समाधी स्थानात
पण तो कोलहल मिटत नाही
म्हणून मग शिरतो अंतरात
अगदी पेशींच्या केंद्रापर्यंत
जनुकांच्या तटबंदी मोडत
पण तिथेही असतोच
तो आवाज
स्पंदनांचे प्रतिध्वनी कंपनात झेलत
शेवटी मान्य करतो मी
त्या कोलाहलाचे सनातन अस्तित्व शांततेच्या प्राप्तीचा भ्रम दूर सारत
स्थिरावतो त्या कोलाहलात
फक्त त्यांचे स्वर ऐकत
त्याक्षणी जाणवते
तो कोलाहलाचा पडदा जातोय फाटत
अन् शांतता अवतरते
त्या कोलाहला सकट
कारण शांतता
कोलाहलाच्या नकारात नाही
तर सर्व समावेशक स्वीकारात आहे
हा अर्थ जातो मनात उमलत .


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठेवा

ठेवा ***" पुन्हा पुन्हा किती मागु तुला देवा  देई माझा ठेवा  मजलागी ॥१ देई रे भाकर एक चतकोर  तुझ्या दारावर  याचक मी ॥२  देई ...