शनिवार, १३ डिसेंबर, २०१४

माझे आकाश





माझे आकाश
मोकळे सारे
कधीचेच
तुझ्यासाठी

अरुण कोवळे
पावूल तुझे
उतरावेत
माझ्या दारी

ये लेवुनी
साऱ्या तारका
नुरू देत
कुठेही जागा

मंत्र मुग्ध मी
तुझ्या स्वरूपी
विसरून जग
माझे मलाही

गडगडणारी
वर्षा होत ये
लखलखणाऱ्या
वीजेगत वा  

मी इवलासा
अतृप्त चातक
उभा सदैव
चोच उघडून 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
 

गुरुवार, ११ डिसेंबर, २०१४

व्यर्थ प्रयत्न







तुला मनातून पसून टाकायचा
प्रत्येक प्रयत्न माझा
असफल होत आहे
कदाचित तो प्रयत्नच
मला तुझ्या स्मृतीत
अधिकाधिक गुरफटवत आहे .
आणाभाका नाहीत कसल्या
वा नाही देणे घेणे
हातात हात गुंफणे
वा डोळ्यात डोळे मिसळणे
कधी नाही कुजबुज केली
प्रेमपत्र वा कधी लिहिली
तरीही तुला माझ्या मनाची
जाणीव नसेल असे नाही
पण तू असतेस अशी
अलिप्त शांत दुरस्थ
जणू की काही घडलेच नाही
अन मी
सुखद तुझ्या आसक्तीत
कासावीस झालेला 
गुदमरून  गेलेला
धरतो रोखून श्वास
त्या गुदमरण्यातच  
मरण यावे म्हणून


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


बुधवार, १० डिसेंबर, २०१४

वठूनही झाड






किती नाती शोधायची
किती नाती जोडायची
वठलेल्या झाडाखाली
छाया कुणा मिळायची

ऋतू बहराचा जाता
कोण थांबणार इथे
साद घालू नको कुणा
सुखे जावू दे रे त्याते

वठूनही झाड मन
अजून वठत नाही
पाखराचे स्वप्न त्याचे
अजून तुटत नाही 

कुठल्याश्या वादळात
तगमग विरणार
दामिनीच्या मिठीमध्ये
देह सारा मिटणार

येणे जाणे तिचे परी
ते ही त्याच्या हाती नसे
अंतरात जळण्याचे
भोग भाळावरी असे

जळूनिया देह असा   
होय पेटवण त्याचा  
आता पडेल कुऱ्हाड
खेळ संपेन जन्माचा
  
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




मंगळवार, ९ डिसेंबर, २०१४

माझे प्रेम रावणाचे ..


माझे प्रेम रावणाचे ..

रावणा पासून दूर
जशी की राहावी सीता
मजला टाळते ती ही
तशीच काहीशी आता

तिचा राम असे नसे
नच मजला ठावुकी  
माझी रावण भूमिका
ठरलेली पण नक्की  

माझे प्रेम रावणाचे
परंतु सक्तीवाचूनी
सर्वस्वाच्या होळीसाठी
सदैव सज्ज होवूनी

तिच्यासमोर जीवन
उभे याचक होवूनी  
म्हणते दे भिक्षा काही
त्या रेषेच्याच आतुनी

विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, ८ डिसेंबर, २०१४

गाणे लिहिता






कुणी स्वत:साठी.
कुणी लोकांसाठी
कुणी पोटासाठी
गाणे लिहीतो ||


परी लिहितांना
आनंद स्फुरणा
जागतसे मना
हेची सत्य ||


पुढे काही होते
पुस्तक छापते
नावही मिळते
कुण्या एका ||

कुणी नामवंत
कुणी कोपऱ्यात
कुणी वा रद्दीत
गप्प जातो ||
इवल्या देशात
इवल्या भाषेत
इवल्या शब्दात
लाख कवी ||

मिळो जया तया
हवी जी ती माया
मज देवराया
त्या भेटतो  ||

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...