शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

तिचे त्याचे प्रेम....


 

तिचे त्याचे प्रेम म्हणजे
उधान वारे वाहने असते
नदी ओढा कालवा ओहळ
पाण्यास नाव देणे असते

गडद काळोखी जगात भरता
साथीस सदैव चांदणे असते
निबिड निर्जन गूढ वनात
पायी गुणगुण गाणे असते

तिची साथ असो नसो वा
तिच्याच साठी जगणे असते
कधीतरी नक्की भेटेन ती
म्हणून स्वप्न पाहणे असते

 
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०१४

वेदनांनी झोळी माझी---क़तील शिफ़ाई



वेदनांनी झोळी माझी सारी भरू दे रे अल्लाह
मग हवे तर मज पूर्ण वेडा होवू दे रे अल्लाह


चंद्र कधी तारे तुज मी सांग मागितले होते
स्वच्छ हृदय सचेत नजर तू दे रे अल्लाह 

 
सूर्या सारखी वस्तू तर कधीच आम्ही पाहिली
आता खरोखरची एक प्रभात पाहू दे रे अल्लाह


या धरतीच्या जखमा वर लाव दवा काही
वा माझे हृद्य हे पत्थर होवू दे रे अल्लाह

क़तील शिफ़ाई 


अनुवाद विक्रांत प्रभाकर

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०१४

हुजुरेगिरीत


 




हुजुरेगिरीत जर
वर्ष व्यतली असती
आमचीही इथे राज्यं
बहुत झाली असती
वदले ते निष्ठा इथे
संपूर्ण द्यावी लागते
सांगितले भले बुरे
सारे करावे लागते
मग्रुरी रक्तात परि
काही वेगळीच होती
अभिमानी मान कधी 
कुठे झुकली न होती
ती वाट पुन्हा कधीही
मग धरलीच नाही
कष्टण्यात वर्षं गेली 
खंत वाटलीच नाही
आता तर सुखाचीही
मज याद येत नाही
फकिरास कफनीचा
या मोहही इथे नाही
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

एसएससी, एसएससी....



वही पुस्तक हाती धर
पाठ कर पाठ कर
लिंग वचन मुहावरे
सब कुछ याद कर

चीन फ्रांस इंग्लंड
ध्यान दे साऱ्यावर
डोंट फरगेट एनेथिंग
फ्रॉम द ग्रामर

टीवीकडे पाहू नको
पीसीकडे जावू नको
एसएससी एसएससी
घोष असू दे कानावर

फार काही अवघड नाही
वेळा पत्रक तयार कर
क्लास लाव गाईड घे
झोपेला घाल आवर

मुसोलिनी हिटलर
यांच्याशी दोस्ती कर
भूमितीच्या वर्तुळात
रोज गर गर फिर

रोज स्पेलिंग घोकायची
सूत्र लिहून काढायची
स्कोर साठी फ्रेंचचा
पार चट्टामट्टा कर

आवडत नसले तरीही
सायन्सवर दे भर
मार्कस पुरत्या कविता
म्हणू नको दिवसभर

मुळी सुद्धा भांडू नको
चिडू नको रडू नको
एवढा पैसा खर्च केला
पाडू नको तोंडावर

सदा टक्केस अंशी पडले
तू जा नव्वद टक्क्यावर
आईबापाची कीर्ती वाढव  
नाव कोर ग्रीनकार्डवर

एका मागे एक विषय
कदम ताल आगे बढ
तास जाती तासावर
घाई कर वाच भरभर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

माऊलीची कृपा...







पांडुरंग पांडुरंग

स्वत:शी म्हणत

पोर गोलगोल

होती नाचत

माऊलीची कृपा

माझ्या मनात

माझ्या घरात

होती वर्षत

अंगण अवघे

राऊळ झाले

अबीर गंधात

कोंदाटले

कृतज्ञ अंतर

दाटून आले

भरले डोळे

शब्द उमटले

तुझीच देवा

मी सांभाळली

करितो पुन्हा

तुझ्या हवाली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

 

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०१४

तमातून तमाकडे



 

तमातून निघे
तमाकडे गाडे
प्रकाश तुकडे
पांघरुनी ||

जगण्याचा भार
शीर्ण मनावर
सर्वांगी नकार
दाटलेला ||

होते अगोदर
काय ते नंतर
भयाने अंतर
काजळले ||

फुटक्या प्रार्थना
अतृप्त याचना
सजवुनी मना
निरर्थक ||

असेल देहांत
जगताचा अंत
अजीर्ण वेदांत
होत असे ||

विक्रांत प्रभाकर http://kavitesathikavita.blogspot.in/




 
 

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

मंगळसूत्र तुटता

सगळीच सूत्रे होती तुटली
नाती विटून विरून गेली
मंगळसूत्र पण तुटता अचानक
कावरीबावरी ती होती झाली
क्वचित हाती तिने घेतला
नोझल स्पँनर शोधून काढला
खटपट करून कडी निसटली
जोडण्याचा अन यत्न केला
अश्या कामात धावणारा तो
लांबून फक्त पाहत होता
आता जोडाजोडी करण्यात
त्याला मुळी इंटरेस्ट नव्हता
प्रयत्नांती ते नच जुळले
वैतागून मग वदली ती
सोंगढोंग या जगासाठी
उगा करावी लागती ही
 
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
 

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...