गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३

म्हसूबाबाच गाणं २





म्हसूबाबा म्हसुबाबा लवकर उठून जा हो
गावाचा रस्ता जरा खाली करून द्या हो ||
किती वर्ष झाली तुम्ही आडवे इथे पडला
आजी आत्ती पणजीचा बोकड तुम्ही खाल्ला
पुरे झाले सारे आता बस्तान गुंडाळा
प्रकाशाच्या किरणांना वाट करून द्या हो ||१ ||
सरली तुमची भिती सारी पोरं झाली शहाणी
पटकी देवी महामारी गेली बाद होवूनी
कुणी नाही पुसत त्यानं जावं गुमान निघुनी  
दुनियाची रीत तुम्हा ठावूक नाही का हो  ||२||

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/

 




म्हसूबाबाच गाणं १







म्हसूबाबाजींचे घर
असे उंच ओट्यावर
त्याला हवेच्याच भिंती
वर आकाश छप्पर

लाल शेंदरी पोशाख
मस्त बसतो ऐटीत
भय जनाच्या मनात
राज्य करतो झोकात

त्याला ठेवियले कुणी
खोट्या आशेने मांडून
किती दिलेत भयाने
नजराणेही आणून

कुणा मागत तो नाही
कुणा देत किंवा काही
घडो घटना काहिही
श्रेय त्यालाच ते जाई

मना मनामध्ये आहे
म्हसू बाबाचा दरारा
अर्धा गाव अवसेला  
करी तयाला मुजरा

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१३

माझ्या मना






या जगावर रुसलेल्या
आणि स्वत:वर चिडलेल्या
माझ्या मना
या जडशील वैफल्यातून
आणि अस्वस्थ कबरीतून
आशेच एक छोटस
रानफुल होवून वर ये
कुणी जल न सिंचता
कुणी लक्ष न देता
स्वत:च्या ताकदीने
बेदरकार हिंमतीने
स्वत:त भरून उरणारे
मीपण घेवून वर ये
पत्थराला  चिरत
मातीतून उसळत
हरित अंकुराने
लसलसत्या नव्हाळीने
रसरसत्या जीवनाचे
सार घेवून वर ये
चैतन्यान फुलून ये
बेफान उधाणून ये
आवेगाने उसळून ये
जीवनाचा प्रसाद वाहू दे
तुझ्या अणुरेणुतून
आणि पसरू दे
गंधलहरीतून   
सारे विश्व त्यानं
जावू दे भरून

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...