गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

मृत्यू स्वप्न...



जेव्हा मी घेईन
माझा  शेवटचा श्वास
तेव्हा मी नसावा
कुठल्या आय.सी .यु.त
छताकडे बघत
ऑक्सिजनच्या नळ्यामध्ये 
धापा टाकत
थेंब थेंबाने देहात
उतरणाऱ्या सलाईनला
असहायतेने पाहत

मृत्यू असावा स्पष्ट
डोळ्यांना दिसणारा
आणि मी त्याचा
स्वीकार केलेला
तेव्हा माझ्या डोळ्यासमोर
असावे निळे आकाश
सभोवताली पसरलेली
हिरवीगार झाडी
पाखरांचा कलकलाट
अन जवळच वाहणाऱ्या
नर्मेदेचा खळखळाट
तृप्त मनाने तृप्त देहाचा
ऐकत शेवटचा हुंकार
मी विरघळून जावा 
त्या विशाल दृश्यात
तिथलाच एक
अंश होवून
जीवनाकडे माझे हे
शेवटचे मागणे 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

गणवेशात तो.. ती..अन..





तो ..
नजर चोरटी एक बोलकी
वर्दी मधली नवीन खाकी
किंचित काळी अन कोवळी
ओठावरली  मिशी  कोरली 
बूट दांडगे पायी असूनी
मुद्रा परी ती लोभसवाणी
रंग रांगडा उन्ही तापला
बोल गावाच्या माती मधला
ती...
सख्या सवे ती पुढे चालली
खूप शहरी जग पाहिली
वक्र भुवया केस कापली
उन्हात आली ताम्र झळाळी
गणवेशात हि रूप गर्विता
नजर बंदी  कुणी पाहता
नाकासमोर पाहत गेली
साऱ्या दृष्या सरावलेली
मी..
काय तयात प्रेम फुलेल ?
ठरले तिचे  लग्न असेल ?
कुणा ठाऊक काय घडेल ?
किंवा माझा हा भ्रम असेल !
पण  त्याचे चोरून  पाहणे
उगा उगाच  अवघडणे
सारे  जणू की  ओळखीचे ते 
कि माझे  मला  पाहणे होते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

अॅबोरशन नंतर....




ते लुकलुकणारे हृद्य
सोनोग्राफीच्या पडद्यावर
हीच तुझी माझी
पहिली अन शेवटची भेट

त्यानंतर ,
प्रश्नांची मालिका
प्रचंड दडपण
मानसिक ताण ..
करावे न करावे
उठलेले वावटळ

आणि शेवटी
घेतलेला निर्णय
नाही ! नकोच !!

अॅडमिशन मग
डॉक्टरांनी उरकलेला
सोपस्कर
देहाचे यंत्र
ताब्यात देवून त्यांच्या
खरडून टाकला
नको असलेला अंकुर

एवढ अपराधी
आयुष्यात कधीही
वाटल नव्हत मला 
तू मुलगा आहेस कि मुलगी
माहित नव्हत ! खरच !
ते कारण हि नव्हत
तुला त्यागण्याच
अनेक परिणाम टाळणारा
तो एक कटू निर्णय होता
असहायपणे घेतलेला
खरच सांगते
प्रथमच देहाची
देहातील कामोर्मीची
लाज वाटू लागली
त्याचा स्पर्श हि
नको वाटू लागला
तेव्हा पासून

उलटणारे महिने
कॅलेन्डेर वरील खुणा
तू नसूनही तुझी वाढ
मला सांगत होते 
आणि माझ्या
रित्या ओटी पोटीत
मीच रोज मरत होते 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



 

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

सोडुनिया घर जावू पाहता



अक्कलकोटचा
घेवून वारा
गेलो पंढरपुरा
तिथे बसता लाथा
आलो पुन्हा घरा
आता जाऊ वर
चढू गिरनार
सोडुनिया घर
व्हावे दिगंबर
म्हणून पक्के
केले प्रस्थान
काढले शोधून
पोलीसान
फासायला तोंडा
मिळेना राख
नग्न होता बळे
मारितात जन
टाकती समोर
शिजलेले अन्न
म्हणती राहा
आता गुमान
पळणे कठीण
जगणे कठीण
उरलो विनोदी
पात्र होवून

विक्रांत प्रभाकर
kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

गाभारा


घेवूनी जीव धगधगणारा
पिसाट उरी धुमसणारा
येवूनी बसलो क्लांत अंतरा
वेशीजवळील पुरान मंदिरा
खोलगट अंधारा निस्तब्ध गाभारा
धुळीच्या भस्माचा विरक्त पसारा
सुकलेली फुले कोरडला दिवा
किंचित ओलसर दगडी गारवा
मनात भरला सुखद शहारा
अंतरा मिळाला शांत निवारा
घुमटात निळा पारवा घुमला
क्षोभाचा सारा मेघ निवळला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

साधन




करावे साधन |  काय मी ते आता |
तोच करविता | मायबाप ||१
माझे हाती फक्त | बैसने आसनी
कृपा सौदामिनी | करे  सारे ||२
केली धावाधाव | अनंत उपाय |
नच झाली सोय  |कधी कुठे ||३
तया त्या कष्टाचे | होऊनिया  चीज |
पावली ती मज | जगदंबा ||४
असे गुरुराव | कृपा शक्ती दाता |
सनाथ अनाथा | केले झणी||५
जन्मो जन्मी पुण्य | केले संपादन |
त्याचे वरदान | लाभियाले ||६

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


नव्वद टक्के जळलेली


नव्वद टक्के जळलेली
तरीही ती जिवंत होती
जळलेल्या नसा सोबत
वेदनाही जळली होती
पूर्ण शुद्धीत सारे ओळखीत
करीत होती विनंती
डॉक्टर मी वाचेल ना  हो ?
घरी पुन्हा जाईल ना  हो ?
जीव नसलेला एक होकार
डॉक्टर देत होते
व्हेने  सेक्शन  केथेटर
यांत्रिकपणे होत होते
जीवघेणे आर्जव तिच्या प्रश्नातले
सारी यांत्रिकता खरवडत होते

विक्रांत प्रभाकर
kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...