ती वाट
*****
ती वाट एकवार दाखव मला अवधुता
ज्या वाटेची महती संत गातात
अन् बोलतांना योगी सद्गतीत होतात
असे म्हणतात ती वाट खूप खोल खोलवर जाते
पण किती कुठवर जायचेते कुणा न कळते
कारण तिथे पाट्या नसतात दिवे सद्धा नसतात
ठरलेले रेखीव आखीव नकाशे ही नसतात
डोळे मिटून बसताच कुणासाठी कधी
दार उघडतात पण
बहुदा जागेवरच साऱ्यांचे पाय घुटमळतात
कारण तिथे सोबत काही घेऊन जाता येत नाही
अन् इथले तर कुणाला मुळी काहीच सुटत नाही
त्या वाटेची एक गंमत असते
जाणाऱ्याला जाणू इच्छणाऱ्याला
जाणण्याच्या इच्छेसकट ती हरवून टाकते
ती वाट तू सहजासहजी दाखवत नाहीस कुणाला
त्या वाटेच्या अटी शर्ती पचत नाही जगाला
त्या वाटेची पात्रता येण्यास अजमावत असशील
अन् फिरवत असशील पुन्हा पुन्हा माघारी मला
तर माझे एवढेच सांगणे आहे तुला
रे काहीच वाव नाही उरला माझ्या प्रयत्नांना
आणि मी शरणागत झालो आहे तुला
त्यावरही तुला जर न्यायचे नसेल
मला त्या वाटेला तुझी मर्जी मान्य आहे मला
पण त्यामुळे डाग लागेल तुझ्या प्रतिष्ठेला
तेवढे तू जप तुझ्या पदवीला लपवून ठेव मला
या माझ्या मागणीला ते तर सहजच जमेल तुला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
कवितेसाठी कविता
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .