सोमवार, १९ जून, २०१७

देवा तुझा खेळ..




तुझा खेळ..
*********

तुझी चाल तुझा डाव
मला कधीच कळत नाही
मी खेळतो आहे अन
तू हरवतो आहेस   
कफल्लक न करता मला
दोन डाव जिंकू देतोस
चार डाव हरवतोस
सुखाची चटक लागलेला मी
पुन:पुन्हा खेळतोय
पुनःपुन्हा हरतोय

माझ्या नकळत
तू लुटत असतोस
माझी सर्वात मूल्यवान वस्तू
माझा वेळ
क्षण क्षणांनी रिकामी होणारी
माझी तिजोरी
पुन्हा कधी न भरणारी
तू पाहत असतोस गालात हसून
कदाचित छदमीपणे
कदाचित कीव करून

तुला कुणी तरी खेळायला
हवाच असते का सदा ?
अन या खेळाचा अंत
नव्या खेळात होतो का ?
माझ्या हरलेल्या क्षणांचे
तू काय करतोस ?
या कोट्यावधी खेळाडूंशी  
तू एकटा कसा खेळतोस ?

या अन अश्या असंख्य प्रश्नांचे
मोहळ उठू लागतच
तू जिंकू देतोस मला
पुन्हा एक मोहक डाव
अन त्या सुखाच्या इवल्या राशीत
रममाण होतो माझा जीव !!

तरीही निद्रेतून जागे होतांना
क्वचित भेटणाऱ्या त्या
अस्पर्श अव्यक्त क्षणाच्या
फटीतून तू दिसतोस मला
अन असे वाटते
हा खेळ तुच आहे
खेळणे तुच आहे
आणि मी ही तूच आहे !
पण दुसऱ्याच क्षणी होतो सुरु
तोच तुझा खेळ आणि माझे हरणे .


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे













                                                                                                                                                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव  साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा  पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात...