शुक्रवार, ३० जून, २०१७

दत्त आत्मतत्व *




दत्त आत्मतत्व
*************


दत्त आत्मतत्व
असे हृदयस्थ
जरी सदोदित
साक्षी रूप ||

परी आठवण
ठेवू जाता मन
वाहून स्मरण
जाय दुरी ||

अजुनी स्वरूपी
मन चिटकेना
हजार कामना
वाहुटळी  ||

घडे धावाधाव
होई उठाठेव
मायेचे लाघव
संपेचिना ||

परी धरीयाला
तव हात दत्ता
म्हणूनि विक्रांता  
आशा काही   ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, २९ जून, २०१७

सगळ्यांनाच नाही जमत




ती तुझी चौकट
सुरक्षितेची
प्रतिष्ठ्तेची
तेवढीच महत्वाची आहे
ती तुझी गरज
समर्पणाची
उडण्याची
तेवढीच आवश्यक आहे
आणि दोन्ही येतात
समोरासमोर
छेडतात एकमेकां
तेव्हा येणारे द्वंद्व
तेही अनिवार्य आहे
यातून निघणारा
सुटकेचा
धोपट मार्ग
तोही निश्चित आहे
कारण शेवटी
समाजबंधन  
व प्रतिष्ठा
हीच प्राथमिकता आहे
असू देत
सगळ्यांनाच नाही जमत 
चालतांना
भर रस्त्यात
बकुळीची फुले वेचणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


बुधवार, २८ जून, २०१७

एक निरर्थक शून्य !!



आधाराची प्रत्येक काडी
जेव्हा जाते निसटून
जीवन आसक्ती तडफडते
निराशेत श्वास अडकून
जगण्याचा भास घडत असतो
रोज रोज दिस उजाडत असतो
मृत अर्भक बाहेर यावे गर्भातून
तसा जगण्याचा सोपस्कार
उगा काही घडत असतो ..

तशी तर इतुकी मरणे
साहिली आहेत मी आजवर
की जगण्याची इवली शक्यताही
आता हसू आणते अनावर
तरीही या निश्चेष्ट मनाला
अन ताठरलेल्या हाताला
एवढी सवय झाली आहे
की ते पकडतेच आहे
प्रत्येक बुडत्या आधाराला
परिणामाची तमा न बाळगता ..

हुलकावणी देणारी स्वप्ने
आशेत हुरळून टाकणारे शब्द
खरे तर जगू ही देत नाही
अन शांतपणे मारू ही देत नाही
मग जन्म मरणाच्या सीमेवर
घुटमळणारे हे जगणे घेवून
मी चालतो या जीवनातून
माझा मलाच वगळून !
एक निरर्थक शून्य होवून !!


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे





सोमवार, २६ जून, २०१७

धुंद धुंद ही हवा



धुंद धुंद ही हवा
मंद मंद गारवा
तोच रंग हिरवा
मागतो सखी तुवा

तेच शब्द लाघवी
आज आण अधरी
तीच मौन संमती
येवू देत लाजरी

आस तुझी लागता
स्पंद होय कापरा
स्मित तुझे स्मरता
जीव होय बावरा

स्वप्न गीत गावुनी
अर्थ देई जीवनी
जाहलो तुझा ऋणी 
प्रीत रूप पाहुनी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, २५ जून, २०१७

जागवून स्मशान मी




जागवून स्मशान मी
बद्ध माझ्या वर्तुळात
नाचतात भुते भग्न
क्षुद्र चूक शोधण्यात  

अर्धवट वासनांनी
धुम्र देह धरलेले
माझेपण बाहेर ते
माझ्यावीन मांडलेले

अमर आशेच्या ज्वाला
रंग भरत अंधारी      
खुणावती बोलवती
सुखाच्या सरणावरी

इथे राख तिथे राख
जळल्या देहाचा वास
कोण मला खेचतो
कळण्या जीवन भास

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे







शनिवार, २४ जून, २०१७

मन पाखरू




त्या डोळ्याच्या
कोनामधुनी  
मन पाखरू
गेले वाकुनी

जरा थांबले
फांदी झुकवुनी
उंच उडाले
वारा होवुनी

हृदया मधली
स्पंद घेवुनी
स्वप्ने आली
देही उमलुनी

चारच दाने
चोची मधुनी
कुणी सांडले
उगाच हसुनी   

तया झेलता
गेलो वाकुनी
कणाकणाला
त्या मी घेवुनी

शब्द भेटले
नवे होवुनी
गीत सजले
श्वासा मधुनी

येईल पुन्हा
वाट वळवुनी
वदले काही
वदल्या वाचुनी

त्या वाटेला
डोळे बांधुनी
उगा राहिलो
जीव वाहुनी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



पथ (पांथिकाचिया येरझारा | सवें पंथु न वचे धनुर्धरा |)




पांथिकाचिया येरझारा | सवें पंथु न वचे धनुर्धरा |
कां नाहीं जेवीं तरुवरा | येणें जाणें ॥ ४९० ॥

चालतो पथिक परी नच पथ
वाट पावुलात वचेचिना ||

दिसतात वृक्ष चालले मागुती
परी त्या गती नाही जैसी ||

तैसा देवा ठेव मजला तटस्थ
येवोत जावोत सुख दु:खे ||

स्थैर्याची सखोल मुळे खोलवर
जावून जिव्हार स्तब्ध व्हावे ||

ज्ञानदेवी माय आन न मागणे 
शब्दांचे जगणे तुझ्या व्हावे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...