शुक्रवार, १५ जुलै, २०१६

दत्ता तुझी आस






दत्ता तुझी आस
लागली प्राणास
जाळतात श्वास
रात्रंदिन ||१

दत्ता तुझा भास
होतसे मनास
जीव हा उदास
तळमळे ||२

जावे गिरणारी
धावुनी माहुरी
वा गाणगापूरी
वाटे सदा ||३          

बघ इथे आता
जीव न रमतो
कासावीस होतो
तुजविन ||४

संसाराचे ओझे
वाही कसेबसे
पांघरून पिसे
लौकीकाचे ||५

काय तुज देणे
भक्ती अवघड
विक्रांत हा जड
आवडेना || ६

माऊलीच्या पोटी
राग बरा नाही
द्वाड लेकराही
पोटा धरी  ||७

आणि काय तुज
मागू सांग आई  
चरणासी घेई  
विक्रांता या ||८

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  

                  






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...