रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

ट्राफिक कंट्रोल (एक दृष्य)






कुठला मंत्री जाणार इथून
हायवे पोलीस बसले सजून
फ्लायओव्हरच्या दो बाजूस 
हातामध्ये काठ्या परजून

उगा वाढले पोट आपले
पट्ट्यामध्ये घट्ट बांधून
लाल मोठ्या नजरेनी नि
देती सिग्नल शब्दांवाचून

ओहोहो मोठा साहेब तो
कधी काळी आला दिसून
काळा गॉगल डोळ्यावरती  
इस्त्री मारली चेहऱ्यावरून

साळसूद गाड्या लाईनीत
उगाच आवाज केल्यावाचून
गुमानपणे नि जात होत्या   
उगा नको कटकट म्हणून

आणि कुणी सिग्नल अडले
चरफडलेले मनात दाटून
मुकाट बसले तोंड दाबून
आत कुणावर काही खेकसून  

मग रस्त्याचे मालक ते
गेले मिरवत रस्त्यावरून
लाल पिवळे लाईट फेकत  
सगळ्यांचीच सुटका करून   

अन त्या गाड्या गेल्यावर
क्षणात हॉर्न गेले दणाणून
पुन्हा पथावर त्या वर्दळली
गर्दी रोजची शिस्तीवाचून 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...