शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

नाथांचा तो नाथ





नाथांचा तो नाथ माझा दत्तनाथ
अवघा सनाथ पंथ केला ||१||
मच्छिंद्र गोरक्ष जालिंदर अन
कानिफ रेवण नागनाथ ||२||
भर्तरी चर्पटी चौरंगी प्रसिद्ध  
श्रेष्ठ नवनाथ शिकविले  ||३||
एकेका सूर्यास नभी मांडियले
विश्व पुंजाळले भक्तीयोगे ||४||
योगिया जीवांच्या सेवेसी लाविले
पथ सजविले मोक्षाचिये  ||५||
जात भेद पंथा चूड लावियले
विश्व ओवियले एका धागी ||६||
फकीर मलंग बटू अन पिसा
एक तत्व ठसा दावियला ||७||
होवुनी दयाळ दावली पावुले
जीवन जाहले धन्य माझे ||८||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

जन्म सरत नाही साला





जन्म सरत नाही साला
निरुद्देश चाललेला
पोटासाठी  बांधलेला
खुंट्यास कुण्या  ||

जीव कळत नाही साला
कुठे कुठे सांडलेला
कुणासाठी थांबलेला  
वेड्यागत खुळा ||

जगायचं कशाला
प्रश्न खाज सुटला
साल सोलटून गेला
अनुत्तरीत  ||

भोगातल्या क्षणांचा
हा डंख अतृप्तीचा
किती जन्म वाहायचा
नामर्दपणे ||

जगणाऱ्यांनो जगा रे
खिसे पोट भरा रे 
एक दिशी मरा रे
तोंड वासून ||
तिरडी आपुली बांधून
चाललो खांदी घेवून
अवघा जाणून सोडून
पसारा मी ||



विक्रांत प्रभाकर तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in/










पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...