तोंडामध्ये पान चघळत
अजस्त्र देह धडधाकट
पुढे येती सरसावत
याचे त्याचे नाव सांगत
कुणाकुणाच्या नावाचा
टिळा कपाळी लावलेला
डोळ्या मध्ये बेदरकार
सत्तेचा मद भरलेला
तोंडामध्ये उग्र भाषा
उग्र वासात मिसळली
परीटघडीच्या पेहारावी
गुंडगिरी सजलेली
आम्ही झोडू आम्ही मोडू
आडवे याल तर झोडू
भले बुरे कळल्या वाचून
समोरच्याला पार गाडू
होते दानव काय वेगळे
यवनांनीही हेच केले
बाहुच्या मदात मातले
परि शेवटी मातीत गेले
नियती फिरवे गरागरा
तीच वर्तुळे पुनःपुन्हा
सत्ता मद अविचार अंत
कळूनी सारा घडे गुन्हा