बुधवार, ३१ जानेवारी, २०२४

निरोप

निरोप
******
नसूनही इथे माझे 
खरेच असणे होते 
वाचूनी वदल्या काही 
हितगुज होत होते ॥१
तसे मित्र भेटती नि 
दुरावती जगतात 
परि मैत्र सदैव ते 
उरते खोल उरात ॥२
तशीही गरज काही 
नव्हतीच भेटण्याची 
मने उघडीच होती 
सदैव तुझी नि माझी ॥३
भेटू बघ कधीतरी 
माय रेवेच्या किनारी 
मुक्कामी कुठल्या किंवा 
चालताना तीरावरी ॥४
शक्य आहे ओळखू ना 
जरी कधीच आपण 
तार नर्मदेची उरी 
जाईल ती झंकारून ॥५
बस हेच प्रयोजन 
असेल या ही भेटीचे 
ओठावरती सदैव
यावे नाव नर्मदेचे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

विसावणी

विसावणी
********
तुझिया पायीचा लेप चंदनाचा 
माझिया भाळाचा लेख झाला ॥१

सारे मिटू गेले मागे लिहलेले 
पुढे ठरवले स्पर्शे तुझ्या ॥२

उमटला ठसा तुझा अवधूता 
जन्मोजन्मी माथा मिरविला  ॥३ .

ठरविले नाव तूच घर गाव 
तुझ्या पदी जीव रुजू झाला ॥४

विक्रांत वाहणी सरली कहाणी 
होय विसावणी दारी तुझ्या ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

प्रथमेश

प्रथमेश
******
निर्गुणी उदेला देव प्रथमेश 
रुप हे विशेष घेऊनिया ॥ १

पंचतत्व मेळा जाहला रे गोळा 
जणू आले खेळा शून्यातून ॥ २

उमटला शब्द निर्वाती प्रणव 
जाहला प्रसव जगताचा ॥ ३

रूप रस गंध ठाकले सकळ
जाहवे सफळ जन्मा येणे ॥४

महासुखा आले दोंद आनंदाचे 
नाव ते नाहीचे उमटेना ॥५

पाहुनिया मूर्त कल्पना अतित 
विक्रांत चकित वेडावला ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

रविवार, २८ जानेवारी, २०२४

घरकुल

घरकुल
******
एक एक काडी आणूनी मांडला 
संसार रचला त्याने तिने ॥
होता तो करत रात्रंदिन कष्ट 
घरासाठी फक्त प्रिय त्याच्या ॥
आणि ती ठेवत हिशोब खर्चाचा 
एक एक पैशाचा नीटपणे ॥
हट्टा वाचून उडणारी पिले 
पोट जे भरले पुरे तया ॥
भरडे नेसली ठिगळ लावले 
अंग जे झाकले चिंता नाही ॥
चालले जीवन मायेच्या उबेत
सुखाच्या छायेत छान पैकी ॥
छोटेसे असते महा सुख किती 
कळे त्याची मिती आज मना ॥
अहा ते भाग्याचे रानच्या वाटेचे 
बोरी बाभळीचे धन्य झाले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

शनिवार, २७ जानेवारी, २०२४

पालघर

पालघर 
******
तीच पाच बत्ती अन्
तीच मनीषा डेअरी 
परी किती वेगळी रे
दिसे दुनिया ही सारी 

ती घरे चिमुकली 
कुठे कशी हरवली
अन् घनगर्द झाडी ही 
कुणी गिळून टाकली  

तेच वसतिगृह जुने
तेच रुग्णालय पुराणे 
त्याच भिंती तेच जीने
स्नेहाचे परी मधु तराणे 

 रम्य त्या स्मृतीच्या 
खळाळत्या प्रवाहात 
अजूनही मन वाहते
नादवल्या यौवनात 

हळू हळू जग बदलते 
जुने जाते नवे येते 
नव्याखाली जुन्याचे पण
एक जिवंत गाणे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️




शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

तुझा स्वर


तुझा स्वर
*******
पुन्हा पुन्हा कानात मी 
साठवते तुझा स्वर 
भाळते त्या वेळूवर 
वेळू वेड्या ओठावर ॥
पुन्हा पुन्हा ऐकूनही 
अतृप्तीच मनावर 
अविरत झरो गमे 
अमृताची ती धार ॥
काय तुला ठाव असे 
किती बोल ते मधुर 
अनभिज्ञ चंद्र जणू 
चांदणे किती टिपूर ॥
उंचावून मान वर 
जसा नाचतो चकोर 
तशी काही गत माझी 
होते श्रुती अनावर ॥
अन तुझे मौन जेव्हा 
घनावते दुरावून 
शोधते मी पडसाद
त्या स्मृतीच्या दरीतून ॥
तेव्हाही तेच गुंजन 
होते कणाकणातून
 तू तुझ्या वेळूसकट 
जात आहे मी होऊन ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

कारण

कारण
******
पुन्हा जगण्याला 
मिळाले कारण 
उदयाचली त्या
दिसला किरण ॥१
होती घनदाट 
दाटलेली निशा
पुन्हा प्रकाशल्या
आता दाही दिशा ॥२
पुन्हा उमटला 
खग रव कानी 
डोळा तरळले 
हलकेच पाणी ॥३
गंध प्राजक्ताचा 
भिजल्या पानाचा 
जहाला तनुला 
स्पर्श जीवनाचा ॥४
भेटे जिवलग .
सोयरा जीवाचा 
होतो मी एकटा 
जाहलो जगाचा ।५
विक्रांत आता रे.
भय सरू गेले 
आनंदाचे मूळ 
कुळ सापडले ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ ,🕉️

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...