मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

तो क्षण

 तो क्षण
*******

कधीकधी निसटतो
तो क्षण हातातून 
ज्याची वाट आपण 
पाहत असतो 
डोळ्यात प्राण आणून 

आणि मग पुन्हा येते 
दीर्घ प्रतिक्षा 
खुणेचा दगड बसतो 
दूरवर जाऊन 

तो क्षण 
हातातून निसटणं 
मग पुन्हा पुन्हा 
आपलं वाट पाहणं 
असे घडतं 
कितीतरी वेळा 
अगदी तो क्षण 
स्पर्शून जाऊन

हे रिक्त हाताचे प्राक्तन
तसे असतेच ठरलेले 
तरीही जीवन 
त्या क्षणाच्या वाटेवर 
थांबलेले असते 
तो क्षण होण्यासाठी
हट्ट धरून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

कोरडा

कोरडा
*****

जरी एकतर्फी
प्रेम दत्तावर 
जरी अगोचर
भक्ती तयावर 

जरी लोटतसे
दुःख सागरात 
उभा करीतसे
व्यथेच्या उन्हात

तयाविना आणि 
आळवू कुणाला
अन्य कोणता ना 
आधार जीवाला .

दत्त शब्दांनी या
कान सुखावती
दत्त रूपाने या
डोळे निवताती

दत्त स्पर्शाने रे
क्लेश शमतात .
दत्त चिंतनात
चिंता हरतात

दत्ता विना मन
न लागे कश्यात
कोरडा भिजून
अजून जगात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .




शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

संतोष रासम

संतोष रासम (निरोप समारंभ )
*******
एका नजरेने बघितलं तर आगरवाल हॉस्पिटलमध्ये 
संतोष सारखा संतोषी मनुष्य कोणी नव्हता 
दुसऱ्या नजरेने बघितलं तर संतोष सारखा 
असंतोषी माणुसही कोणी नव्हता .

संतोष स्वतःबद्दल स्वतःच्या कामाबद्दल 
कर्तव्याबद्दल संतुष्ट होता संतोषी होता .
पण जे काम करत नाहीत अंग चोरतात 
त्यांच्याबद्दल अन  सेवाभावी वृत्ती नसलेल्या 
लोकांबद्दल त्याच्यातअसंतोष होता .

त्यामुळे संतोषला बघितलं की मला 
अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है हे कळायचं .
म्हणून मग संतोष कळायचा आणि आवडायचा
.
संतोष रासम  म्हणजे एक विलक्षण
खूप स्पेशल सर्वांपेक्षा वेगळा रसायन आहे 
कुठलही केमिकल लोच्या नसलेलं रसायन आहे 
स्पष्ट वक्तेपणा निर्भीडपणा मनमोकळा स्वभाव 
हे त्यांचं वैशिष्ट .
आत एक आणि बाहेर एक असं नसणारा 
हा माणूस 
कामात माघार न घेणारा कर्तव्याला वाघ असणारा 
हा माणूस 
जेवढी ऊर्जा त्यांच्या कामात 
तेवढीच ऊर्जा त्यांच्या बोलण्यात 
ना कामाचा कंटाळा न बोलण्याचा कंटाळा 

पण तो असाच साधा भोळा नाही बर का !
त्याला सगळं कळतं सगळं वळत 
कुठे काय चालतं ते सगळं दिसतं 
पण तो सहसा बोलत नाही 
कुठे उगाच टांग घालत नाही

सगळी वळण माहीत असूनही 
आडवाटा दिसत असूनही 
तो मात्र धोपट मार्गावरूनच चालतो
कोकणातील माणसाचे 
त्याच्या बोलीचे प्रामाणिकपणाचे
रासम म्हणजे प्रतीक आहे 
नारळासारखा करून कठीण पण 
आतून मावळ आणि प्रेमळ 
त्याचे व्यक्तिमत्त्व आहे 

नाही  म्हणजे त्याला चाललेल्या 
गैरकारभाराचा गैरव्यवहाराचा 
बेजबाबदारपणाचा कामचोरपणाचा 
विलक्षण राग येतो .
त्यासाठी तो कधीकधी वाक्ताडण ही करतो 
 परंतु परंतु परंतु . .. . 

तो  कॅज्युल्टीमध्ये काम करताना 
बाजीप्रभू देशपांडे 
सारखा एकटाच मैदान गाजवायचा 
ऑफिसमध्ये काम करताना 
तो तानाजी मालुसरे सारखा 
कामावरती चढाई करायचा 
आरमॉल मध्ये असताना 
बहरजी नाईका सारखा 
सर्वत्र नजर ठेवायचा 
एक्स-रे मध्ये असताना 
त्याची नजरही X ray होती
अन ओपीडी मध्ये तर तो 
दोन्ही हातामध्ये पट्टे घेतलेल्या
येसाजी कंक सारखा  
गर्दीला मार्गी लावायचा

कॅज्युल्टी मध्ये सोबत काम केलेल्या 
लोकांमधील 
शेवटच्या लोकामधील रासम एक आहेत
मारुती मामा धुरी मामा आणि घुले मामा 
अन हे   रासम मामा
असे एकाहून एक जबरदस्त लढवय्ये 
कामगार मी बघितले
 काम करताना आम्ही त्यांच्या सोबत होतो
हि आमच्यासाठीच आनंदाची आणि 
अभिमानाची गोष्ट होती
त्यातील एक जण जरी कामावरती असेल 
तर तो इतर दोघांची उणीव भासू द्यायचा नाही 
असे कामाला तत्पर हे लोक होते

खरंच ही सोन्यासारखे माणसं आहेत .
त्याचे मूल्य आजच्या पिढीला कळायचे नाही 
पण त्यांची आठवण आम्ही आयुष्यभर ठेवू
नव्हे ती राहीलच .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 

दादासाहेब भवार


दादासाहेब भवार
*************

माझ्या स्मृतीतील
म .तु अगरवाल रुग्णालयामधील 
इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट 
हे भवार त्याच्या नावाशिवाय 
पूर्णच होऊ शकत नाही 
किंवा त्या विभागाच्या चित्रांमध्ये भवर असणे 
हे वर्ल्डकप मध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकर किंवा कपिल देव असल्यासारखेच होते

भवार चा सर्वात मोठा गुण म्हणजे
त्याची नम्रता साधेपणा 
आणि कुठलेही काम करताना 
नकार न देण्याची वृत्ती 
काम करताना त्यांनी कधीही 
वयाचा भाऊ केला नाही 
किंवा आजारपणाचे कारण सांगून 
काम टाळले नाही 
किंबहुना नाही हा शब्द त्यांच्याकडून 
मी तरी कधी ऐकला नाही
कामाची वस्तू मिळाली की काम होऊन जाईल 
हे त्यांचे म्हणणे असायचे 
आणि ती वस्तू उपलब्ध केली 
कि खरच ते काम होऊन जायचे 

खरंतर आपल्याला 
तीन निघाडा काम बिघाडा 
अशा तीन बिल्डिंग मिळालेले आहेत 
आणि तीन बिल्डिंगमध्ये काम करताना इलेक्ट्रिशन लोकांना सुद्धा कामाचा 
खूप ताण पडतो पडला आहे .
तरीसुद्धा त्यांचे मी खूप कौतुक करतो .
की त्यांनी आपलं काम तरी खूप चांगलं निभावलेले आहे 
आपल्या कुणाला वा रुग्णांना 
पाणी मिळाले नाही असे  झाले नाही .
त्यासाठी त्यांनी स्वतःच्या काही आयडिया लढवल्या काही माणस 1 मदतीला घेतली 
आणि ते काम पूर्ण केले आहे 

तळेगावकर भवर बोरकर  भोळें 
 या सगळ्यांच्या  आडनावाच्या पाठीमागे र च यमक आहे . 
आणि हे सगळ्या इलेक्ट्रिशन चे काम वायर अन वाटर बरोबरच असते 
या योगायोगाची मला नेहमीच मोठी गंमत वाटते .

 खरंतर नवीन इमारतीमध्ये भवार तळेगावकर सारख्या माणसांची आपल्याला खूप गरज होती 
तिथे त्यांचे कौशल्य खूप खूप उपयोगी पडली असते 
पण सारेच काही मनासारखे होत नसते 
जीवन असेच असते 
थोडे सुख देते थोडे दुःख देते 
कधी जवळ घेते कधी दूर ढकलते 
कधी लवकर रिटायर करते 
तर कधी रिटायर होण्याची वाट पाहाया लावते

पण हरकत नाही 
भवर अजूनही तब्येतीने खणखणीत आहेत 
कामाची इच्छा करणारे आणि काम करणारी आहेत 
आणि त्यांचे काम हे इलेक्ट्रिशनचं काम 
अतिशय सुंदर काम आहे 
हे मला माहित आहे 
कारण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला ही  कळतात आवडतात 
त्यामुळे या आवडत्या कामामध्ये 
ते मग्न राहावेत आणि सुखी समाधानी राहावे हीच इच्छा .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

द त्त

दत्त
****
गुंतला 
देहात 
अडकला 
मनात
धरसोडीच्या 
तिढ्यात
मायेच्या 
वेढ्यात 
जीव हा 
सतत 

तया फक्त 
एक वाट
दत्त दत्त
तया फक्त 
एक गीत 
दत्त दत्त
तुटण्या बंध
दत्त दत्त
होण्या मुक्त 
दत्त दत्त

धनुष्य हे दत्त
बाणही दत्त
लक्ष ही दत्त
लक्षणारा दत्त

देह मनाची
करून प्रत्यंचा
लक्षून आत
जाता अलक्षात
भेटतो दत्त
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .






गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

ओळखीची

न ओळखीची
***********

तू न ओळखीची सखये आताही 
नव्हतीस बघ अन कधी तेव्हाही

तुला जाणण्याचे यत्न हे फुकाचे
केले बहुत मी व्यर्थ जरी साचे

तू सावली चंद्राची कुठेतरी हरवली
तू  प्रतिमा जलाची कुणी न पाहिली

तू गंध प्राजक्ताचा रंध्रात भरला
तू रंग मोगऱ्याचा दृष्टीत दाटला 

तू प्राण माझ्या व्याकुळ प्राणाचा
तु साज  माझ्या आतुर स्वप्नांचा 

जरी न जाणतो मी तुला पाहतो मी
स्पर्शाविन चंद्र  हा दिठीत माळतो मी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .





मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

दिवा लावायचा आहे!


दिवा लावायचा आहे
***************
संध्याकाळ झाली आहे 
दिवा लावायचा आहे ॥

स्वच्छ पितळेचा चकचकीत घासलेला 
तेलही अगदी काठोकाठ भरलेला 
ताटात ठेवला आहे ॥

हळदी कुंकुम चंदन अक्षतांनी सजला 
तर मग आता रे उशीर कशाला
 बघ अंधारून आले आहे ॥

येई जरा त्वरा कर हाताचा आडोसा धर 
जरासा श्वास सांभाळ ज्योत पेटव ज्योतीवर 
तू कुठे अडकला आहेस ॥

माझ्या मनी काहूर माझा जीव आतूर
सारे काही तयार परी ना तुझी चाहूल 
संध्याकाळ झाली आहे ॥

दिवा लावायचा आहे 
ये ना लवकर !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...