शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

अध्यात्म संसार आणि विकार

अध्यात्म संसार आणि विकार
*****

प्रत्येक जीवन हे वरवर पाहता सरळ साधे शांतपणे वाहणारे पाणी वाटते . परंतु त्या पाण्याच्या पृष्ठभागाखाली खूप प्रवाह, वेगवेगळ्या गतीने वेगवेगळ्या रीतीने वाहत असतात. त्यांचे रंग वेगळे , त्यांची गती वेगळी , वळण ही वेगळी असतात आणि हे फक्त त्या पाण्याच्या प्रवाहालाच माहीत असते.

त्याप्रमाणे आपल्या  प्रत्येकाच्या जीवनात जीवनाचे वेगवेगळे प्रवाह असतात . वैवाहिक जीवन ,कौटुंबिक जीवन , अध्यात्मिक जीवन , व्यवहारी जीवन, तसेच वैचारिक , आकांक्षाचे , स्वप्न सृष्टीचे जीवन ही सारी  एकमेकांत गुंतलेली असतात. कधी त्यांच्याशी संघर्ष करत तर कधी समझोता करत आपण जगत असतो .

मुख्य म्हणजे हा संघर्ष टाळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सतत ध्यानात ठेवावी लागते, ती म्हणजे आपले जीवनाचे ध्येय काय आहे. आपल्याला जीवनात काय हवे आहे आणि त्यानुसार पुढील जीवनाची आपणच आपल्या आखणी करावी लागते .ज्याप्रमाणे दोन हलणाऱ्या दगडावर पाय ठेवून उभे राहता येत नाही त्याप्रमाणे आपल्याला दोन वेगवेगळे ध्येय ठेवता येत नाहीत . ध्येय ही मुख्यतः दोन प्रकारची असतात अध्यात्मिक आणि भौतिक .  कुठले  ध्येय असावे  हे त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असते .जसे जीवाचे संस्कार असतात त्याप्रमाणे जीव वागत असतो .

अध्यात्मिक जीवन जगायचे आहे संसार ही थाटला आहे विकारांपासून अजून सुटका झालेली नाही तर मग काय करायचे ?
 हा प्रश्न पुष्कळदा पडतो विकार हे वाईट नसतात विकार हे जीवनाचा एक भाग आहेत व तो भागसुद्धा सुंदर आहे, त्यामुळे ते नाकारून ,ते लाथडून जीवन सुंदर होऊ शकत नाही , ते विकार समजून घ्यावेत आणि त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवत जगावे . विकारांना किती मोकळे सोडायचे आणि किती आवर घालून ठेवायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे . ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ज्ञानेश्वर महाराज  मितले हा शब्द वापरतात म्हणजे सारे काही मोजून , योग्य प्रमाणात  करणें ,भोगणे , अनुभवणे हा सुवर्ण मध्य ते सांगतात . तर तो सुवर्ण मध्य आपल्याला साधतो का ते पाहावे ते झाले की आपल्या अध्यात्मच्या मार्गावर चालणे सोपे जाते .

जीवनाचा आणखी एक प्रवाह आहे कर्तव्यपूर्तीचा जर आपण संसारात पडलो आहोत मुलं झाली आहे तर  ती मार्गाला लागेपर्यंत त्यांचे पालन पोषण करून त्यांचे शिक्षण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे हे आपले कर्तव्य आहे , ते पार न पडता तर आपण फक्त आपला स्वतःचा किंवा अध्यात्माचा विचार करत राहिलो तर ते पाप कर्म ठरेल .

पतीधर्म म्हणजे काय तर पत्नीला सुखी समाधानी ठेवणे अर्थात ती एक स्वतंत्र व्यक्ती व प्रवृत्ती असल्यामुळे असे प्रत्येक वेळेला जमेलच असे नाही , कधी कुणाला आपल्या विचाराची, प्रकृतीची, वृत्तीची , आवड निवड सारखी असलेली पत्नी मिळतेही, आणि जीवन सहज सुंदर होते , पण  कधी कधी तसे होत नाही पण म्हणून तिच्यापासून काडीमोड करण्यात काहीच अर्थ नसतो . कारण अजून ती आपली  तरी संस्कृती झालेली नाही, त्या ठिकाणी एक भूमिका घ्यावी लागते आणि ती म्हणजे सामंजस्याची .आपली आर्थिक कुवत, आपल्या सवयी, आपला कल , आपल्या पत्नीशी मोकळेपणाने बोलून गैरसमजाचे फाटे न फोडता जगता येऊ शकते .दुर्दैवाने जर आपली पत्नी त्या ऐकायच्या पलीकडची असेल तर मौन राहावे आणि केवळ शांतपणे उपचारा पुरतेच संसारात उरावे , हे इतिकर्तव्य ठरते .
लग्नाच्या वेळी आवडणारी पत्नी हळूहळू नावडती झाली तरी तिच्याशी संसार करणे हा ठरवून दिलेला नियम आहेत . .
आणि समजा एखाद्याची पती किंवा पत्नी  दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषाकडे आकर्षित झाली तर मग काय करायचे ?
सहसा या समाजात एका विशिष्ट मर्यादा पलीकडे ही मैत्री पुढे जात नाही शारीरिक संबंध पर्यंत उतरत नाही हे ध्यानात ठेवावे . 
आणि समजा ती व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीकडे वहावत गेली आणि ते आपल्याला समजले तर आपण उद्वेग करून घेऊ नये द्वेषाने जळू नये  संतापून जाऊ नये किंवा घाबरून आपला हातून काहीतरी जाते आहे या भयाने बावचळून जाऊ नये . आपल्याला जे समजले आहे त्याची त्या व्यक्तीला स्पष्ट शब्दात जाणीव करून द्यावी आणि जर त्या व्यक्तीला पुन्हा चूक सुधारून जीवन  मार्गावर यायचे असेल तर येऊ द्यावे कारण संसार चालवायचा असतो .
जे जाणार असते त्याला आपण पकडून ठेवू शकत नाही आणि ठेवू ही नये . ,ती स्त्री किंवा पुरुष ही आपल्या मालकीची गोष्ट आहे ही भावना मनामध्ये रूजू देऊ नये तर मग जसे भेटणे सोपे असतं तसं विलग होणेही सोपे होऊन जाते .

प्रत्येक जोडपे हे एक स्वतंत्र जग असते त्यांचे मानसिक जग ,भाव संबंध वेगळे असतान , ताणतणाव, आवडी, भांडण तंटे वेगळे असतात तसेच त्यांचे लैंगिक जीवनही वेगळे असते. अन हे असेच असायला हवे किंवा तसे नसायला हवे हे कुठल्याही पुस्तकावरून किंवा दुसऱ्याच्या अनुभवावरून त्यांनी ठरवू नये . आहे त्या संबंधात ते संबंध अधिका सुंदर कसे होता येईल ते पहावे .काही जोडप्यांच्या जीवना मध्ये शारीरिक संबंध फार लवकर संपतात म्हणजे ते दुःखी आहेत असे नव्हे . कारण ती फक्त एक शारीरिक गरज असते  या पलीकडे त्याला फारसे महत्त्व देऊ नये .कदाचित ते एकतर्फी सुद्धा असू शकते .
खरंतर जे देवाच्या मार्गावर चालू लागतात त्यांच्या जीवनात अधिक संकट येतात त्यांचे संसार फारसे सुखाचे होत नाही हे सत्य आहे कारण देव त्यांना त्या प्रलोभनातून मोह वनातून बाहेर काढत असतो त्यासाठी हे चटके बसतात , हे काटे टोचतात आणि वैराग्य अंगी बाणते .
त्यामुळे देवाच्या मार्गावर चालायचे असेल तर सारे काही देवावर सोपवावे आणि एक प्रामाणिक आयुष्य जगावे जे काही होते ते त्याच्या कृपेने होते त्याच्या इच्छेन होते . हे एकदा मनी ठसले मनी बांधले की मग , यश अपयशाची, सुखदुःखाची चिंता फारशी राहत नाही जे मिळते ते त्यांनीच दिलेले असते आणि जे न मिळते तेही त्यांनीच नेलेले असते, हे नक्की मनात असते  ,ही शरणागती  अध्यात्माचे बीज असते . जीवनाला दिशा दाखवते . हे ज्यांनी साधले त्यांनी अर्धे अध्यात्म जिंकले असे मला वाटते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, ३० मार्च, २०२३

राम हवा काय कुणा

राम हवा काय कुणा 
****************

राम हवा काय कुणा 
इथे आपल्या जीवनी 
एक बाणी एक पत्नी 
सदैव एक वचनी ॥१

विचारता कौतुकाने 
सारेच गडबडती 
अरे बापरे म्हणूनी 
मग दूर ते पळती ॥२

राम कुणा न झेपतो 
इथे राम कोण होतो 
तो गुण सागर काय 
थिल्लरास आवडतो ॥३

राम बरा त्या देवुळी 
सवेत सीता माऊली 
भजू तया पुजू आम्ही 
करू नवमी साजरी ॥४

धैर्य नसे पण कुणा 
होण्यास सत्य वचनी 
अहो इथे सदा चाले 
कली युगाचीच नाणी ॥५

बरी असो संसारात 
तीच सदा जरी पत्नी 
चित्त धावे रूपा मागे 
वाहवा उठते मनी ॥६

आणिक पैसा येणारा 
कधी न टाळती कुणी 
पापाचा वा तो पुण्याचा 
कानाडोळा ते करती ॥७

राम होणे नसे कुणा 
राम जगणे नसते 
पोथीमध्ये तुलसीच्या 
मनोरंजन घडते ॥८

रामा शोधे विक्रांतही 
व्यर्थ रित्या जीवनात 
मी माझे पण् जडले 
पदी बंध दिसतात ॥ ९

मनी जरी उमटोत 
वाटे रामाची पाऊले 
काय करू पिकली ना 
अजून रानची बोरे ॥ १०

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, २८ मार्च, २०२३

कृष्णराया .

कृष्णराया .
********

हे शब्द तुझे धुवती
मन माझे कृष्णराया .
कळते मला न जरी 
होते सुगंधित काया 

हे तम किती दिसांचे 
होतेच चित्ती जडले 
वर्षाव तुझ्या प्रेमाचा 
होता आज उजळले 

येऊनही भाग्य दारी
होतो कधी निदसुरा 
गुंजुन गीत या कानी 
रमतो स्वप्न संसारा 

मी जाणतो जरी मज 
आहे स्वतःच उठणे 
घेण्यास प्रकाश आत 
आहे दार उघडणे 

ती शुद्ध बुद्धी तुजला
मी मागतो रे कृपाळा 
दे प्रेम तुझे मजला
वस सदा हृदयाला 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

सोमवार, २७ मार्च, २०२३

नावीन्य


नावीन्य 
********
नको वाटते काहीच पुन्हा नव्याने करणे 
वाळूचे बांधून किल्ले पुन्हा एकदा मोडणे ॥

तोच तोच खेळ असा पुन्हा पुन्हा खेळणे 
या मनाच्या हुकूमात तीच परेड चालणे 

करण्यात या नवीन, असते जुने मोडणे 
आणि तुटले फुटले बळे विसरून जाणे 

आशेचे हाड माणसा सदोदित पळवते 
मरतानाही स्वर्गामध्ये जागा स्वतःस करते 

नवे असे खरे इथे तर काहीच नसते 
जुन्यालाच पांघरून नवेपण मिरवते 

आहे त्यात तसेच रे स्थिरपणाने राहणे 
येते जाते हरक्षणी जे ते जगणे पाहणे 

यातून जे उलगडते तेच नवीन असते
बाकी जळमट सारी विचारांचीच असते

नावीण्याचा भ्रम असा मनी जयास कळतो
नावीण्याचा जन्म मग सहज तयात होतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

तुटले पोळे



तुटले पोळे 
********

मधमाशांचे तुटले पोळे 
तथाकथित संकट टळले 
एक अनार्जित ठेव्याचे 
सुख इथे कुणा मिळाले 

पृथ्वी काय असते रे
इथे फक्त माणसांची 
नच का पशु पक्षी
अन् ती कीटकांची  

कुठला पक्षी कुठला पशु
घर  कुणाचे काय मोडतो 
सौख्यासाठी अन् आपल्या
कुणी कमावले काही लुटतो 

हिंसेची तर ही परमावधी !
ज्ञानी अहिंसक म्हणून मिरवती
तीच  मिटक्या मारत खाती 
सत्व संपन्न त्यास म्हणती
प्रमत्त हुकूमशहागत अन्
रसने ला सादर होती

पोळ्यात मेली पिले हजार 
नाही त्यांचा मनी विचार 
अन् ती राणी माशी बिचारी
पुनः नव्याने मांडे संसार 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

रविवार, २६ मार्च, २०२३

शब्द तुझा


शब्द तुझा
********
सहजच शब्द तुझा 
मजला स्पर्शून जातो 
अचानक वळवाचा 
पाऊस पडून जातो 

होते मृदू मुलायम 
तापलेले पान पान 
कणा कणावर येते 
एक विमुक्त उधान 

मी माझा राहतो ना 
कृष्ण मेघ पांघरतो 
अन् तुझ्या स्मरणात 
मयूर साद घालतो 

थिजलेल्या जगण्याला 
पुन्हा नवी जाग येते 
हरवते दीर्घ रात्र 
पुन्हा प्रभा प्रकाशते 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ .

वदती अधर

वदती अधर 
*********

ताम्र करडे
रेखीव डोळे
सूर्य किरण
जणू सांडले

आणि तरीही
मवाळ ओले
जणू आताच
व्याकूळ झाले

काही भुरके
तसेच पिंगट
केस कपाळी
होते लहरत

सुरेख तरीही
उदास हसणे
दु:ख थिजले
होते पाहणे

स्वर्गीचीच ती
जणू अप्सरा
प्रिया हरवली
दूर सागरा

त्या विरहाचे
दु:ख शापित
वदती अधर
काही नकळत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com/

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...