बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

आई जाते तेव्हा

आई जाते तेव्हा
***********

एक आई जाते तेव्हा 
जगच अनाथ होते 
मनोमनी तीच गाय 
पुन्हा पुन्हा हंबरते 

उमाळ्यात काळजाच्या 
दुःख घनदाट होते 
कोसळते अंर्त-बाह्य
मन आषाढाचे होते 

अनमोल त्या क्षणांचे 
आकाशात चित्र येते 
दिसतात तारे नभी 
हात सदा रिते रिते

फळ तुटे बीज रूजे 
सारे मातीचेच नाते 
होती परी ओरखाडे 
अन सल खोल रूते

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

भक्तीच्या पावुटी

भक्तीच्या पावुटी 
************

भक्तीच्या पावुटी 
चालो माझे मन 
प्रेमात न्हावून 
ज्ञानदेवा ॥

नको ऋद्धी-सिद्धी 
नको मानपान 
विषयांचे रान 
बोकाळले ॥

वाहता प्रेमात 
मज भेटू देत 
भक्तांची ती बेट 
जीवलग ॥

तया प्रेमळांची 
संत सज्जनांची 
घडो पाऊलांची 
सेवा मज ॥

तयांचे ते बोल 
ह्रदयाची ओल 
उतरून खोल 
प्रिय व्हावे॥ 

राम कृष्ण हरी 
वैखरी अंतरी 
अणुरेणू वरी 
गुंजो माझ्या ॥

येणे हा विक्रांत 
देवा सुखावेल 
देह सांभाळेल 
तुजलागी ॥
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

तप


तप
*******

देह तापून तापून 
होई पाप विमोचन 
घेई विक्रांता भोगून 
याने  प्रारब्ध सरेन 

किती कळत घडले  
काही नकळत  झाले 
चित्रगुप्ताने परि ते 
सारे लिहून ठेवले 

कर्ज घेतलेले सारे 
जाई ऋणको भुलून 
कर्म सावकार थोर 
घेई एकेक मोजून

बरे भोगतो भोगणे 
मनी दत्ताला स्मरून 
येणे येई मज बळ 
बाप करतो सांत्वन 

सुख तनाचे मनाचे 
इथे भोगून जायचे 
दु:ख वाट्यास आलेले 
भाग त्याच त्या नाण्याचे 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१

आळंदी

आळंदी
******
माझ्या आळंदीची 
काय सांगू ख्याती 
सिद्धांची वसती
तेथे नित्य॥

येतात तापसी 
कोठ कोठून ती
आणिक राहती 
लगटून ॥

जिथे उमापती
होय सिद्धेश्वर 
तेथिचा जागर 
सांगावा का ?॥

आणि ज्ञानदेव 
विष्णु भगवान 
रूप संजीवन 
घेऊनिया ॥

असे कणोकणी 
नामाचे स्फुरण
जया असे कान 
तया कळे ॥

माऊली कृपेने 
घडे येणे-जाणे 
चित्त धुवाळणे 
विक्रांत या ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

खेळ सावल्यांचा


खेळ सावल्यांचा
**********
सुख साठवणे
दुःख आटवणे
देवा हे मागणे 
नाही माझे ॥१

जोवरी हा देह 
तोवरी सोसणे
पडणे धडणे 
घडेची गा ॥२

जोवरी हे मन 
रिपुंचा तो मारा 
साहणे जीवाला 
घडेची रे ॥३

चालता या रानी
व्यथा वेटाळूनी 
दत्त हा सोडूनी 
जाऊ नाही ॥४

ह्रदी प्रकाशात 
राहावा तेवत 
दीप तो सतत 
मांगल्याचा ॥५

चालो चाललेला 
खेळ सावल्यांचा 
विक्रांता तयाचा 
लाग नको॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

या दुनियेत


या दुनियेत
***:***

आता मन सुखाने उगाच हरखत नाही 
आता मन दुःखाने स्वतःत हरवत नाही 

आता मनास कळते होरपळते ऊन जरी सावलीसाठी तरीही ते  धाव घेत नाही 

आता मन भिजते पौर्णिमेच्या चांदण्यात
पण तो आल्हाद अणुरेणूत उतरत नाही 

सुख आहे दुःख आहे जगणे वाहत आहे 
तेल आहे वात आहे पण जळणे होत नाही 

आता माझे मन मलाच सदैव पाहत आहे 
बघणारा अन खाणारा अन एक होत नाही

चिडण्यात चिडणे नसते हसण्यात हसणेही 
दुनिया अशीच असते पण मी दुनियेत नाही

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

ज्ञानियाचा राजा


ज्ञानियाचा राजा 
************

ज्ञानियाचा राजा 
वसे माझ्या मनी 
जीवाच्या कोंदणी 
शब्दा सवे ॥१

मिरवीते वाणी 
शब्द मंत्र त्यांचे 
रोमांच सुखाचे 
मिरवित ॥२

मागील जन्मासी 
बहु पुण्य केले 
म्हणून लाभले 
निधान हे ॥३

मिरवितो पथी
नाथांच्या अनंत 
गुरु आदिनाथ 
दत्तात्रेय ॥४

जेथे जातो तेथे 
येती ओघळून 
मनास कळून 
कृपा त्यांची ॥५

कृपा केली देवे
पायाशी ठेविले 
बांधून घेतले 
मूढास या ॥६

देवा हा विक्रांत 
तुझिया दारात 
राहू दे प्रेमात
रंगलेला ॥७

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...