शनिवार, २० जुलै, २०१९

तृषार्थ पथिक




अवधुता विना
काहीच सुचेना
मन हे रमेना
अन्य कुठे ॥
चातकाची चोच
जाहले जगण
भेटावे जीवन
तया कैसे ॥
कासावीस जीव
लागली तहान
थिल्लर सेवन
घडेचिना ॥
कोसळ बा दत्ता
होय दयाघन
मज तुजविण
अन्य नाही ॥
विक्रांत युगाचा
तृषार्थ पथिक
आसरा क्षणिक
हृदयी दे ॥



शुक्रवार, १९ जुलै, २०१९

चिंचा

चिंचा
*****
चिंचा चावता चावता
जीभ वेडावली काही
दात आंबले तरीही
नाही म्हणवत नाही

काही मधुर गोडस
कण रेंगाळती कुठे
असे विचित्र मिश्रण
जीव तयावरी जडे

लाल तपकिरी रंग
एक वेगळा सुगंध
तया स्मरता मनात
जीभ टाळूत हो बंद

वृक्ष थोराड प्रचंड
कोटी पानांचे जगत
तिथे असतात भूत
कधी खरं न वाटतं

फळ आम्र चिकू केळी
जरी मधुर चविष्ट
चिंच सम्राज्ञी रसांची
करी स्मरणे प्रकट
**
दत्त तसाच तो माझा
साथी सदैव सुखाचा
बाळ तारुण्य वार्धक्यी
असे रसनेचा राजा

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १८ जुलै, २०१९

जीवन पाहावे दत्त रुपे




मरणा आधीचे मरण

****************





मरणाचे वाटे

जगणे चालते

कधी ना थांबते

चक्र तिथे ॥



राजाही धावतो

त्याच त्या पथाने

साधूंचे चालणे

घडे तैसे  



रंकही संपतो

धनिक मरतो

वाट्याचा सरतो

काल तेव्हा ॥



मरण थोरले

भरून राहिले

जगाने पाहिले

जरी इथे ॥



मरण शब्दही

ओठां न आणती

कैफात जगती

लोक इथे



मरणा आधीचे

मरण कळावे

जीवन पाहावे

दत्त रुपे ॥



म्हणूनी विक्रांत

अवघे सोडतो

पावुला धावतो

दत्ताचिया ॥



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍



००००००






बुधवार, १७ जुलै, २०१९

खुंटली रे धाव




आता या मनाची

खुंटली रे धाव

मिळवण्याची हाव

धन मान ॥



हौस भोगण्याची

देवे पुरवली

जपून वाढली

सुखे सारी ॥



दिले ना तुपाशी

अथवा देहासी

ठेविले उपाशी

कधी काळी ॥



अनित्य ती नीट

दावियेले दिठी

वळवली दृष्टी

अंतर्यामी ॥



आता त्या दारात

विक्रांत हा शांत

मिळे जे हातात

घेतो सुखे ॥

०००



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

ऋणानुबंध



ऋणानुबंध
*********
एका झुडपाच्या पानी
दुज्या वृक्षांची ती फुले
परि सांभाळी प्रेमाने
देठ नसून जुळले ॥
साथ तयाची तशी ही
नसे जरी जीवनाची
दिसे तरीही देखणी
गाठ अमूल्य क्षणांची ॥
जाणे आहेच तयाला
येता झुळुक कोवळी
सांज नेईल अथवा
नच ओघळता खाली ॥
गंध दाटला मोहक
तया थोराड पानात
स्वप्न उमलले वेडे
फुल रुसल्या कुशीत॥
भाग्य कुणाचे हे किती
काही कुणास कळेना
बघ ऋणानुबंध हे
पाना फुलांस  सुटेना ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

सोमवार, १५ जुलै, २०१९

तुजविण दत्ता





तुजविण दत्ता
**************
नको मज जीणे
तुजविण दत्ता
जगणेही आता
शिण वाटे ॥
वाहतो देहाला
व्याधींच्या संघाती
होण्या तुझी भेटी
म्हणूनिया॥
मनाची बोलट
नकोशी संगत
धरून राहत
तुझ्यासाठी ॥
धरिला संसार
जरी का खवट
घडण्या शेवट
प्रारब्धाचा॥
येई मायबापा
घेई गा कुशीत
श्वासाचे संगीत
मग सरो ॥
विक्रांत जगात
कुण्या कोपऱ्यात
जाईल विरत
थेंबागत ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००















रविवार, १४ जुलै, २०१९

दानपेटी


देवापुढे नसो
कधी दानपेटी
रित ही ओखटी
वाटे मज ॥
असतो का कधी
देवाचा तो धाक
म्हणे पैसा टाक
कधी का तो ॥
असो धर्म पेटी
स्थळ चालविण्या
सोय ही करण्या
येणा-याची ॥
परंतु तयात
गोवू नये देवा
ऑफरिंग नावा
ठेवूनिया ॥
बाह्य मार्गावरी
पेटी ती ठेवावी
पावती फाडावी
हवी तर ॥
नको त्या धनिका
व्हीआयपी सेवा
जणू काही देवा
लाडका तो 
सुटो वहिवाट
ऐसी जनरीत
एकाच रांगेत
सारे राहू ॥
विक्रांता दिसतो
पैशांचा बाजार
जणू तो संसार
इथे दुजा ॥
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...