शुक्रवार, २४ मे, २०१९

नावडो कुटाळ





नावडो कुटाळ
*********  

भोगाची आवड
न लागो मजला
पुजो न धनाला
मन माझे

इंद्रिया सवडी
जावू नये भान
आनंद निधान
प्रिय वाटो

नावडो कुटाळ
हीनाचा तो संग
करून निसंग
ठेवी मज


दत्ता मज देई
रुचि स्वसुखाची  
तुझिया प्रेमाची
सर्वकाळ

विक्रांत करुणा
भाकतो प्रभूची
माव स्वहिताची
जाणूनिया

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, २२ मे, २०१९

हेच तप


हेच तप
************
टोचतात काटे
पायास म्हणून 
पायच तोडून
घेतो कुणी ?

उंबर्‍यास ठेच
लागली म्हणून   
घर पेटवून
देतो कुणी ?

ऐसे काही घडे
बुद्धिचिये डोळे
होवूनी आंधळे
जाय जरी

काय म्हणु तया
दुर्दैवी जीवाला
विवेक सोडला
ज्याने ऐसा

घडते जगती
सारे प्रारब्धाने
म्हणूनि साहणे
हेच तप

भोगतो मी दत्ता
सारे तुझे देणे
वेदनेचे गाणे
मान्य मला

विक्रांत शरण
जाय दिगंबरा
मेघुटास वारा
नेई तैसा

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २१ मे, २०१९

दत्ता दत्ता मीत हो रे




दत्ता दत्ता मीत हो रे
तुझी फक्त प्रीत दे रे
तव गुण गाण्यासाठी
तूच तुझे गीत दे रे 

दत्ता दत्ता थेट ये रे
कडकडून भेट दे रे
तन मन हरो माझे 
असे काही वेड दे रे 

दत्ता दत्ता माझा हो रे
देह तुझ्या काजा घे रे 
मी पणे जडावला हा 
असह्यसा बोजा ने रे

भजतांना तुज दत्ता 
भजणेही सरू दे रे 
सारे जीवन तूझिया 
पदी लीन होवू दे रे


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


सोमवार, २० मे, २०१९

आलो गिरनारी





आलो गिरनारी देवा
हाक ऐकून आतली
धाव धावून प्रेमाने
जिवलग म्यां पाहिली 

आधी भेटलो शिवाला
भवनाथांच्या रूपाला
धूळ संतांच्या वाटेची
मग लावली भाळाला 

असे पायथ्याला बळी
बाहू उभारून प्रेमे  
भ्या उभ्याने हसत
भेटे मारुती सुखाने 

गात अलख अलख
गेलो गुहेमध्ये खोल
गोपीचंद भृतहरी
देती जीवास या ओल

आई नमिली अंबाजी
शक्ति पीठ ते थोरले
तिचे शक्ती कृपेमुळे
पावुलात आले 

जैन सिद्धनाथ थो
भेटे अरिष्टनेमी ही
तया संनिधी लागली
ज्योत शांतीची ह्रदयी

उंच शिखरी गोरक्ष
प्रिय सखा तो दिसला
त्याच्या मिठीत नयनी
पूर आनंदाचा आला 

मग दिसले शिखर
भाव झाले अनावर
देव दत्तात्रेय माझा
माझ्या जीवाचे जिव्हार

झाले चरण दर्शन
गेलो सुखे वेटाळून
गुरू सानिध्य क्षणाचे
यात्रा विक्रांत संपूर्ण 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, १६ मे, २०१९

येई रे बाहेर






येई रे बाहेर
********

जुनाट घरांचे
जाहले इमले
देवांनी दाविले
दिना बरें ॥
बहु मिरवितो
सुवर्ण गळ्यात
बोटात कानात
कमविले॥
मागणी तसाच
असे पुरवठा
जगाचा रोकडा
व्यवहार ॥
चालू दे रे जग
बरे गांजलेले
भक्तीचे सोहळे
मतलबी ॥
अन्यथा होतील
हजारो बेकार
मध्यस्थ दलाल
दारातले ॥
विक्रांत बोलावी
येई रे बाहेर
आतला अंधार 
टाकुनिया॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


डिंगा

डिंगा
***
 कालपर्यंत कंपाऊंड साफ करणारा
अन् आवर्जून दाखवणारा डिंगा
आज आपल्यात नाही
खरंच वाटत नाही ।
जरुरीपेक्षा जास्त पगार
अन त्यातून येणारी नशा वृती
अन् त्यामुळे होणारी
 खाण्यापिण्यातील आबाळ
 व त्यामुळे उद्भवणारा टीबी
 हा महानगरपालिकेतील
सफाई कामगारांच्या
नशिबात असलेला
एक अटळ शापच आहे

तसेच अनुवंशिक पणे आलेला डायबेटिस
त्याला सोबत करीत होता
पण त्या साऱ्यांशी लढून
डिंगा त्यातून बाहेर पडला होता

आणि मनापासून काम करीत होता
म्हणायचा," साब मैं और चार साल तो जी लुंगा ना ?"
मी हसून विचारायचो " क्यों"?
 म्हणायचा "घर की सब व्यवस्था लगाने की है"
 मला सारे रिपोर्ट आणून दाखवायचा
मी ते पाहायचो
बहुदा ते नॉर्मल असायचे
आणि मी त्याला म्हणायचो "नहीं कुछ नहीं होगा और दस साल!
खरच असे काय कारण नव्हते
तरीही तो अचानक गेला
लागता लागता नाव किनाऱ्याला
 तिला बसावा पुन्हा वादळाचा तडाखा
अन  ती व्हावी क्षतीग्रस्त जावी तळाला
मावुलींची हि उपमा मनात तरळून गेली
खरेच तसेच काही झाले होते येथे
 असे का व्हावे ?
याला तर तशी बरीच उत्तरं होती
अन् खरं म्हटले तर काहीच उत्तर नव्हते

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, १५ मे, २०१९

खगराज दत्त




जैसा गरुड तो नेतो उचलून
मासा अलगत पायी पकडून
तैसे मजला घेई ओढून
दत्तराज खग बलिष्ठ होऊन

सुखासीन मी या जगतात
हरवून गेलो माझ्या खेळात
किती काळ ते माहित नाही
पाणी इथले संपत नाही

कधी तरी पण जावे उजळून
तम गोठले हे प्रकाश होऊन
जल पृष्ठावर येतो उसळून
लक्ष पुन:पुन्हा घेतो वेधवून

जगतो विक्रांत भिजल्यावाचून
तव स्वरूपात जाण्या हरवून
त्या मत्स्याचे भाग्ये इछून
जे सुटले या जन्म मरणातून


©
डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...