बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

मनावरी वळ जरी





काही शब्द फक्त इथे
बाकी सारे जग रिते
नव्हतेच माझे कधी
जपलेले काही कुठे

दिसभर मनामध्ये
रुणझुण वाजणारे
रातभर कानामध्ये
किणकिण करणारे

वाटतात भास होते
उभा जन्म वागवले
शोधुनीही सापडेना
धागे काही जुळलेले

मनावरी वळ जरी
वेदनाही भ्रम वाटे
पोकळीत नसण्याच्या
जाणीवेचा नाद आटे

तरंगतो काळ काही
मिटलेल्या मनावरी
त्याच त्याच प्रेतयात्रा
वाहतो नि खांद्यावरी

काजळल्या वातीसवे
जाणण्याची आस खुंटे
सावलीचे भिंतीवरी
उमटून चित्र मिटे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


  


मंगळवार, २३ डिसेंबर, २०१४

एक चेहरा





एक चेहरा

पुन्हा सामोरा

येवूनी जरा

थबकला

तेच डोळे

गूढ काळे

कधी पहिले

होते मी

किती जुने

परी नव्याने

झाले भेटणे

तसे उगा

कुठले नाते  

नच आठवते

परी गाणे येते

तिज साठी



डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

स्वप्न सारे मिटलेले



घरदार
सुटलेले
स्वप्न सारे
मिटलेले

पण मन
सुखामागे
हावरट  
लागलेले

कुणासाठी
कधीतरी
वेडेपण
पांघरले

अहो जिणे
खोटे नाटे
नाटकच
रंगविले

तिला मुळी
पर्वा नाही
तिचे हात
बांधलेले

जगतोय
पथावरी
पाणी जसे
सांडलेले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, २१ डिसेंबर, २०१४

नायिका






बरीच धूसर अन अजून  
खूप दूरवर आहे ती
माझ्या शब्दात असून  
मलाच अनोळखी आहे ती  

प्रेमात कुणाच्या
चिंब भिजलेली आहे ती
तप्त विरहाच्या आगीत
पोळलेली आहे ती

बोलायला तलवार पण  
वागायला अलवार आहे  
येणे जाणे पाहणे तिचे
अवघेच लयदार  आहे

छोट्या छोट्या स्वप्नांची
दुनिया आहे तिची
चार पाच खूप प्रेमाची
माणसे आहेत तिची

रडण्यासवे तिच्या ‘
माझे शब्द उदास होतात
हसतांना पाहून
तारा फुलात सजतात

कधी डोळे पुसतात
कधी हळुवार समजवतात
चिडवतात तिला कधी
अशीच मस्ती करतात

पोरपण तिच्यातले
कधीच मिटत नाही
नाकावरचा राग
अन हसू हरवत नाही

कुठून कशी कधी ती
माझ्या कवितेत शिरली
सारे शब्द रंग लेवून
राणी इथली झाली 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...