गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

दारी आलो

दारी आलो
*******
केली खटपट आणि दारी आलो 
तुजला भेटलो कृपा तुझी 

जरी अट्टाहास देवा माझा वेडा 
अदृश्याचा खोडा होता मागे 

किती अडकलो कितीदा थांबलो 
थकुनिया गेलो तनमने 

काय देवा तुझी असेही परीक्षा 
किंवा काही शिक्षा कळेचिना 

कळेना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण 
कळल्या वाचून रमलो मी 

पास नापासची चिंता नसे मला 
परी तुझी शाळा बुडू नये

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

दत्त पथ दावतो

पथ दावतो 
********
दत्त पथ दावतो 
संकटात धावतो 
आणुनि सुखरूप 
अंगणात सोडतो 

दत्त चित्त चोरतो 
भवताप हारतो
बंधमुक्त जीवनाचे 
स्वप्न मला दावतो 

दत्त मनी नांदतो 
गीती अर्थ होतो 
माझ्यातून तोच तो 
बोध मला सांगतो

दत्त पाश तोडतो 
दत्त मैत्र जोडतो 
माझे पण हरवून 
विश्व सारे होतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

झाडे मरतात .

 

 
झाडे मरतात 
**********
असे कसे हे 
रे असे कसे
जिकडे तिकडे 
भरतात खिसे .
 
तोडता भरती खिसे 
लावता भरती खिसे 
खिशात पैशाचे 
जणू की झाड असे .
 
काल होता तो 
गुटगुटीत कर 
आज आला तो 
नवा टी शर्ट कर .
 
नाव रूप वेगळे 
तंत्र यंत्र आगळे 
तेच परी ते रे
कर्तृत्व असे काळे .
 
कधी हातात हात 
कधी फुल हातात
असो कुणीही पण
बिचारी झाडे मरतात .
 
झाडास नाही पक्ष
झाडास  नाही रक्षक
हिरवे मांस जणू  ते
सारेच इथे भक्षक.
 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

महातेजा

महातेजा
********
माझ्या जीवलगा प्रिय ज्ञानराया 
येऊ दे रे दया तुज माझी ॥१
देई गा भरून फाटकी ही झोळी
प्रकाशाचा भाळी टिळा लावी ॥२
करी कळवळा येई गा अंतरा 
चैतन्य दातारा पूर्ण करी ॥३
जगलो जगणे काळाच्या वाहणी
रितेपणी मनी खंतावलो ॥४
नाम ध्यान जीवी बहुत ठेविले 
परि ना भरले पात्र माझे ॥५
सरले गा यत्न देहाचे मनाचे 
कैसे कैवल्याचे दान पावू ॥६
तुझिया वाचून कुठले चरण 
धरेना हे मन  काही केल्या ॥७
गुरु तूच माझा सद्गुरु जीवाचा 
तुझिया प्रीतीचा लोभ जीवी ॥८
आता महातेजा करी उणे पुरे 
जवळी घे रे लेकरा या ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

आळंदी निवासी



आळंदी निवासी 
************
आळंदी निवासी तुम्ही भक्त थोर
संतांचे माहेर झाला असे ॥१

काय वाणू तुम्हा जन भाग्यशाली 
जणू निवडली रत्ने थोर ॥२

बहु केले असे पुण्य खरोखर
चैतन्य सागर घर तुम्हा ॥३

करावे साधन नच वा करावे 
घेत हेलकावे शुद्ध व्हावे ॥४

जन्मांतरी तुम्ही केली असे सेवा 
म्हणूनिया ठेवा ऐसा मिळे ॥५

जणू चार कोस दिव्य तेज स्तंभ 
जयाचा आरंभ अवकाशी ॥६

तयाच्या लहरी नांदता कौतुके
नच काही तुके भाग्यासी या ॥ ७

विक्रांत सुखाने घेतो तिथे धाव 
चैतन्य हवाव पुरेनाच ॥ ८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

वृक्ष शोक

वृक्ष शोक 
********
प्रत्येक झाड वाचलं पाहिजे .
जंगलापासून गावापर्यंत .
गावापासून गल्लीपर्यंत
गल्लीपासून कुंडीपर्यंत .

प्रत्येकाला कळलं पाहिजे .
शहरासाठी झाड मेली 
बिल्डिंग साठी झाड मेली
धरणा साठी झाड मेली .

चार झाड लावली त्यांनी 
हजार झाडे तोडली ज्यांनी 
झाडांसहित स्वतःचाही 
वंश उच्छेद केला त्यांनी

प्रत्येकाला हे उमजलं पाहिजे
देवासाठी झाड मरू नये 
साधूसाठी झाड मरू नये 
धूर्त मंत्र्यांचं कुणी ऐकू नये

झाडाच्या मरणात जग मरतं
झाडाच्या रडण्यात विश्व रडतं 
एक एक पुत्रासाठी, वृक्षासाठी
या धरित्रीचं काळीज तुटतं

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

निळा

निळा
****
तुम्ही स्वीकारलेला निळा रंग 
खरेच दूरस्थ नाही मला
तो रंग आकाशाचा
कुठलेही बंधन नसलेला 
तेजस्वी सुखद ऊर्जा भरलेला
तो रंग आहे माझाही
माझ्यात खोलवर रुजलेला 
हृदयात मुरलेला 
चिदाकाशात पसरलेला 
गर्द निळूला 
अन् त्याच वेळी 
मी धन्यवाद देतो तुम्हाला 
की तुम्ही नाही स्वीकारला 
तुंबलेल्या शेवाळाचा हिरवा रंग 
अन्यथा या पुण्यभूमीत 
हाहाकार असता माजला

तसे तर तुमच्या कुठल्याही निर्णयाची
चिकित्सा करण्याची 
लायकी नाही माझी 
तुम्ही हिमालय 
मी गावची टेकडी ही नाही 

कधी कधी मला वाटते 
तुम्ही स्थापन केला आहे
एक नवा धर्म 
कुठलाही विधी विधान नसलेला 
कर्मकांड नसलेला
कुठलेही replacement नसलेला 
केवळ माणसाला मानणारा 
ज्ञान तेजात चमकणारा
जो डोकावतो तुमच्या संविधानात 
तुमच्या भाषणात पुस्तकात
खरेच कुठल्याही प्रेषिता पेक्षा तुम्ही 
कणभरही कमी नव्हता .

आजच्या या स्मृती दिनी अन्
तुमच्या प्रत्येक स्मृती दिनी 
माझ्या सर्व संस्काराचे 
आवरण बाजूला ठेवून
मी  वंदन करतो तुम्हाला
पुन्हा पुन्हा 
अन् एक प्रार्थना उमटते मनातून 
त्या नील रंगाचा अर्थ कळू दे सर्वांना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...