बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

स्वीकार

स्वीकार
*******
जीवनाचा हट्ट कळे आभाळाला 
सूर्य ओघळला फांदीवर ॥

एक एक पान जळले प्रेमाने 
वसंताचे गाणे फुलावर ॥

आयुष्य टांगले होते खुंटीवर 
झटकून धूळ नेसू केले ॥

गेले मिरवीत असण्याचे भान 
उमटली तान कोकिळेची ॥

जरी अहंकार उभा पायावर 
कुबड्याचा भार भूमीवर ॥

अडकला जीव प्राणात बासुरी 
स्वीकार अंतरी सर्वव्यापी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

ऋणाईत

 ऋणाईत
*********
मज ज्ञानदेवे पदी दिला ठाव 
दावियला गाव आनंदाचा ॥

होतो अडकलो गहन काननी
कळल्यावाचूनी सोडविले ॥

सांगितली रीत संसार धर्माची 
मोक्ष पाटणाची खूण दिली ॥

काम क्रोध मोहे होतो लिबडलो 
शब्दात न्हाईलो दैवी तया ॥

जहाले उजळ मनाचे पदर 
प्रकाश पाझर ओघळला ॥

तयाच्या प्रेमाला नाही अंतपार   
ओघळे अपार कृपा मेघ ॥

जन्म जन्मांचा मी झालो ऋणाईत
दारीचा आश्रीत  सुखनैव॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

नरसोबाची वाडी


नरसोबाची वाडी
*************
होय मी तुला मिस करतोय 
माझ्या प्रिय नरसोबाची वाडी 
आणि गुरुद्वादशीला तर 
प्रदक्षिणाच पायात घोटाळती  
यायचो तेव्हा सोबत्यां सोबत 
किती हात असायचे हाती
विखुरले साथी आता 
आणि गेल्या विरून गोष्टी 
ते भल्या सकाळी धावत धावत
जाऊन गाठायचा काठ 
आणि स्नान कृष्णामाय मध्ये
व्हायचे मंगल घोषात गजरात
त्या प्रदक्षिणा दत्ता भोवती 
मारल्या होत्या किती 
पाय थकायचे ना मन हटायचे
प्रेम काठोकाठ भरून चित्ती
ती पालखीची तर  गंमत न्यारी
ते भक्त अधाशी ती दर्शन बारी
डोळ्याभरून न्याहाळाने किती
श्री मूर्तीची ती सुंदर स्वारी 
हा आता , चमत्कार वगैरे काही
तसा मुळी घडला नाही कधीही 
पेढे बासुंदी वांगी इत्यादींनी 
भरल्या पिशव्या आल्या घरीही . . .
पण प्रियतमांच्या झाल्या गाठी
देणे घेणे झाले सुखाचे 
गंभीर संवाद ज्ञान भक्तीचे 
बोलत घोट घेतले चहाचे 
मैत्र काही जोडले सख्य काही घडले 
जन्मोजन्मीचे कधी वाटले
जिवलग येथे भेटले 
होते ते सारे स्वप्नवत
कुठल्या जन्माच्या पुण्याईने 
गेले होते सारे घडत 
दत्तकृपाच त्यातून होती ओघळत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

Behind the veil

Behind the veil
*************
Oh, my sisters behind the veil,
please come out, out of the jail.
There is no light, no sun rays,
I'm losing you in dark caves. 
How many "yous", there's no count,
do mercy on you and come out.
You are always used like a doll,
you are used and pushed in walls.
The world of the men use tricks,
region, religions are the gimics.
You are a person, complete human.
don't be a slave, in the chain.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


 

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

आले बोलावणे

आले बोलावणे
************
आले बोलावणे आले गिरनारी
अधीरता उरी अनावर ॥

घडेन दर्शन घडेन परत
दिव्य स्पंदनात भिजेन मी॥

पाहीन पावुले दत्त या डोळी
लाविन रे भाळी धुनीभस्म ॥

भोगीन रे सुख परिक्रमे आत 
प्रभुच्या कुशीत पहुडेन ॥

देईन रे मीठी पुन्हा गोरक्षला
मुर्त अमुर्ताला सनातन ॥

गर्जेन अलख रानावनातून
गिरी दऱ्यातून पुन्हा पुन्हा ॥

उभारीन गुढी अनादी धर्माची 
दत्त गोरक्षाची प्रिय माझ्या ॥

विक्रांत देवाचा देशाचा धर्माचा 
अवधू पथाचा वारकरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५

तत त्वम असी !

तत त्वम असी !
**********
ती नव्हती तेव्हाही जीवन होते 
ती आली तेव्हाही जीवन होते 
ती गेली तेव्हाही जीवन होते
तिचे येणे असणे जाणे 
जीवनाच्या परिघात घडत होते
 
आणि जीवनाचा केंद्रबिंदू
 कुठलाही  केंद्रबिंदू . .
त्याला तर अस्तित्वच नसते 
लांबी रुंदी उंची या गणनेत 

तो मुक्त असतो, म्हटले तर शून्य असतो
तरीही तो तिथे असतो,दिसतो
आणि जो असतो जो जाणवतो . 
तो आहे असेच म्हटले जाते 

 कदाचित ती त्याच्यातून आली 
त्याच्यात रमली आणि 
त्याच्यातच विलीन झाली 
पण ही तर सांख्ययोगातील 
प्रकृती पुरुषाची सोपी व्याख्या झाली 

व्याख्या सोप्या असतात 
जरा घोकल्या की पाठ होतात 
शेवटी तो आणि ती ची 
काना मात्रा वेलांटी वगळली 
तर  उरते एकच त त ,
तत त्वम असी !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

मी चे कोडे

मी चे कोडे
******"
मी मीच का आहे? मी असाच का आहे ?
मी नक्की मीच आहे का ?
का मी हे एक सॉफ्टवेअर आहे फक्त !
पण सॉफ्टवेअर म्हटले की इंजिनियर आलाच
 त्याला कुठे शोधायचे? तो शोधून सापडेल का ?
तसा तर ए आय हा सुद्धा एक मीच आहे
त्याच्या जागेवर, सिद्धी हाताशी असलेला 
या मी चे मूळ खणू जावे तर खणणे संपतच नाही 
यदाकदाचित काही लोकांना ते जमले असावे 
या मॅट्रिक्स मधून बाहेर पडणे
पण ते स्वतःला शक्य आहे का स्वबळावर 
कदाचित प्रत्येक न्यूओला लागत असतो 
एक मोर्फिअस आणि एक ट्रिनिटी.
जे असतात बाहेर या मॅट्रिक्सच्या 
ते तिथे कसे पोहोचले ते वेगळेच कोडे आहे.
पण माझ्या या मी चे कोडे हेच मुख्य कोडे आहे  
जे पहिले आणि शेवटचे कोडे आहे.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...