सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

दलदल

दलदल 
******
स्वामीला मानतो तोही पैसा खातो 
गुरुचरित्र वाचतो तोही भ्रष्ट असतो

भक्त वर परी लुच्चाच असतो 
गर्दीत मेंढरांच्या लांडगा फिरतो 

असे जीवन हे  द्वीधा विभागले 
दिसे जगण्याचे नाटक चालले 

पण त्यात मन होते छिन्न भिन्न 
कळते ना जीवन घडते ना जीवन 

आक्रोश त्यातून दुःख पाझरते 
सुख खोटे सारे आत्मग्लानी आणते 

असे हे जगणे कशास जगावे 
सुज्ञास काय ते लागते सांगावे 

दत्ताने धरला विक्रांत वाचला 
दलदलीत या तरूनिया गेला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

डायाभाई श्रद्धांजली


डायाभाई 
**********
कळले आजच की  डायाभाई गेला 
सहकारी आणखीन एक हरपला 

गर्द करडे केस  दाढी खुंट वाढलेला
वर्ण सावळा जरा वाकला ढगळ वस्त्रातला 

सदा उपयोगी माणूस तो कॅजुल्टी मधला
जाता जाता पण जरा त्रास देऊन गेला

शॉर्टेज मध्ये माणसे लागायची फिरवायला 
स्वीपरचे वार्डबॉय अन् ड्रेसर करायला

हे ड्रेसरचे काम त्याला भारी आवडायचे 
असतीलही त्यात काही हिशोब जरी त्याचे 

पण चिडला की मग हेका नाहीच सोडायचा
बरीच समजूत घालून मग जरा कुठे ऐकायचा

पण चकरा मारून ऑफिसला कंटाळला 
नव्हते फारसे येणे ते काय माहित त्याला 

शिव्या झाल्या देवून आरडाओरड करून 
क्लार्क लोकांचा गेला साऱ्या उद्धार करून 

हवाहवासा डाया मग नकोसा वाटू लागला 
पैसा ही वस्तूच बनलीय आदर घालवायला 

येणे नाही कळताच तो थोडा थंडावला 
हळू हळू यायचा मग बंद होवून गेला

ती टीम तेव्हाची माझ्या कॅजुल्टीतली 
स्कोअर संपवून आता जावू लागली

डायाची ती साथ आठवत सहकार्य तेव्हाचे  
श्रद्धांजली सोबत मानतो आभार मी त्याचे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

बंद यात्रा

यात्रा
****
तलावाचा मासा टाकीमध्ये आला 
त्याच त्याच पाण्या खूप कंटाळला 

इथे भीती नाही संकटेही नाही 
वेळेवर अन्न छान सारे काही

पण किती दिन तीन बाय दोन 
जगायचे असे मान वळवून 

खोटे बुडबुडे रचले शिंपले 
कण वाळूचे ही ओळखीचे झाले

इथून सुटका कधीच का नाही
फसलो विकलो असे दुःख हे ही 

एक बंद यात्रा चार काचेतली 
वाहतोय काळ परी थिजलेली.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

चारोळ्यांची कविता

चारोळ्यांची कविता 
********
मारुनी लाख चकरा पाय जरी दुखले रे 
लायकी वाचून कुणा काय इथे भेटले रे 

भक्ता वाचून देवालया अर्थ काय उरले रे 
भक्ता वाचून देवाचे अन् काय इथे अडले रे

लाख डोळ्यात कुणा साठवून काय होते रे 
वाहतात अश्रू जेव्हा स्मृतीं खोल खचते रे 

सारीच स्वप्न साऱ्यांची तशीच असतात रे
चाकोरीत व्यवहारी सर्व हरवून जातात रे 

जगणे म्हणजे शाप कुणी ते म्हणतात रे 
जगण्याला घट्ट तेच पकडूनी राहतात रे 

चारोळ्यांची कविता ही कविताही नसू दे रे 
वाचायची कुणालाही बळजबरी नाही रे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

प्रवास

प्रवास
*****
ही वाट तीच आहे मी ही तोच आहे 
चाकावर गतीच्या रस्ता वाहत आहे 

ती स्वप्न हलकीशी मनात जागलेली 
थांब्यावर कुठल्या उगाच तिष्ठत आहे

नकळे कुण्या वळणावर काय गोंदलेले
अजुनी का गंध ते मनी  रेंगाळत आहे

तेव्हा या पथावर खाच खळगे नसावेत 
आता मात्र हादरे हादऱ्यावर बसत आहे 

होतो कधी ब्रेक जाम कधी टायर पंक्चर  
नसणे तुझे जीवनात गतीला सलत आहे 

प्रयोजन प्रवासाचे आता जरी उरले नाही 
रस्त्याचे व्यसन तरीही उगा वाहवत आहे 

कळते हे वाहणे रे आता निरर्थक आहे 
जाणतो अन् प्रवासाला प्रत्येक अंत आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

अटळ

अटळ
****
गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची 
ती कृती भ्याड नामर्द रात्रीची 
अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची 
ती कृती उद्दाम  द्वाड दिवसाची
कसा काय धर्म कळणार तयाला 
दृष्टी जी न पाहते कधी सौंदर्याला 
ती मुद्रा शांत प्रशांत गौतमाची 
नभातील नितळ शुभ्र प्रकाशाची 
ते हास्य कोमल प्रेमळ गोरखाचे 
चांदणे ओघळले जणू पौर्णिमेचे 
कसा द्वेष नांदतो कुठल्या नसात 
काय जन्म वाहतो कुणाचा विषात 
तया सत्य प्रेम काहीच कळेना 
जणू जन्मा आली पुन्हा दानवसेना 
जया हाती शस्त्र येते आततायी 
तया गत रावणाची रे अन्य नाही 
भरले अपराध भरले रे शंभर
अटळ आता अटळ आहे रे संहार

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

अलिबाबाची गुहा

अलिबाबाची गुहा
*************

ती गुहा अलिबाबाची दिसते कधी पुन्हा 
शब्द परवलीचे पण नच बोलतो मी पुन्हा 

तेव्हाही ती परवल चुकलीच होती जरा 
उघडल्या वाचून दार गेलो होतो माघारा 

यदा कदाचित संधी मिळाली ही असती
ठेच अहंकाराला पण फार लागली होती 

विसरले स्वप्न ते आणि मार्ग धोपट धरला 
प्रत्येक डाव हातातला का नकळे मी टाकला 

आता व्यथा न अंतरात पण चुका त्या हसतात 
हरवल्या सिंधुत शिंप्या काय पुन्हा मिळतात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...