रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

कारण

कारण
******
तुझ्या पंखाखाली प्रीतीचा उबारा 
मिळतो आम्हाला दत्तात्रेया ॥१

वादळाची भीती मुळी ना वाटते 
टोचती ना काटे कोटराची ॥२

हालतात फांद्या वृक्ष गदगदा 
सांभाळाती सदा पंख तुझे ॥३

पाहतो आकाश तुवा पेललेले 
देही झेललेले ऊन पाणी ॥४

पाहतो कौतुक आमुच्या भाग्याचे
तुझिया प्रेमाचे अहेतूक ॥५

भरवसी दाना लागताच भूक 
सावलीचे सुख देसी सदा ॥६

दावसी आकाश आम्हा वेळोवेळी 
मारण्या भरारी बळ देसी ॥७

धन्य आम्हा देवे आपुलेसे केले 
कारण मिळाले जगण्याला ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

करता करता पुण्य

करता करता पुण्य ( विंडो पिरियड)
(आज OPD मध्ये एक बच्चू आले होते त्याला रक्त दिल्यामुळे HIV झाला होता.)
†*************

भले केले रक्त दिले कोणाचे ते प्राण वाचले 
भले केले रक्त दिले काही पुण्य गाठी आले 

वाटले काही चुकांचे रे परिमार्जन झाले 
एक दिसी अचानक पण कळूनिया आले 

रक्तात एचआयव्हीचे विषाणू सापडले 
आधी नव्हते मग आले अरे ऐसे कैसे झाले 

वदले डॉक्टर त्यास विंडो पिरियड म्हणती 
पहिले तीन महिणे कुणा नच ते कळती

तर मग मी उगाच रक्त दिले पाप केले 
करता करता पुण्य पाप कसे गाठी आले

ते रक्त गेले असेल कुण्या देही बालकाच्या
खुडून पडतील गा पाकळ्या त्या जीवनाच्या

ते रक्त गेले असेल कुण्या देही तरुणाच्या 
झाल्या असतील चिंध्या तया भाव विश्वाच्या

ते रक्त गेले असेल कुण्या देही त्या प्रौढांच्या 
कोसळल्या असतील विटा साऱ्याच घराच्या

तर मग मी उगाच रक्त दिले पाप केले 
करता करता पुण्य पाप कसे गाठी आले

ठेवले असेल असुरक्षित शरीर संबंध 
घेतले असेल नशेचे कुठले तरी औषध

तर रक्तदाते मित्रांनो ही काळजी घ्या हो
विंडो पिरियड मध्ये रक्तदान ते टाळा हो .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

कथा विजयाची .


कथा विजयाची .
************
जीवन कधी असते उभे
हातात घेऊन शस्त्र धारदार
एक घाव भरण्याआधीच 
होतो दुसरा तीव्र वार ॥

शत्रु समोर नसतो कधी 
नीट कळत नाही हत्यार 
कारण कळत नाही कधी 
तरी करावा लागतो स्वीकार ॥

धन जाते आणिक पतही
आपलेही मग परके होतात 
कधी मानले होते जीवलग 
मित्र तेही पाठ फिरवतात ॥

मन होऊन जाते विदीर्ण 
आक्रोश उमटतो अस्तित्वावर
पण ती उर्मी जगण्याची
साहते सारे होत झुंजार ॥

अर्धी नीज अर्धी भाकर 
कष्टाला नुरतो सुमार 
यत्नदेव तो देहामधला 
प्राक्तनाच्या नेतो पार ॥

थकतो शत्रू अनामिक तो
सोडून देतो मग सारे घात 
विद्ध तरीही विजयी जीवन 
ध्वजा उभारते उंच नभात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

Reel, रिल

Reel/रिल
*********
एका मागे एक रील धावतात 
मना धरतात आवळून ॥१
कळण्याआधीच थांबण्याआधीच 
नेती ओढतच लागोलाग ॥२
यात गुंतूनिया काही नच मिळे
अपव्यय वेळे घडतसे ॥३
काही घडताच मन जाणू पाही 
गर्दी त्यात होई आपणही ॥४
असे कुतूहल जरी याचे मूळ 
रक्षणा केवळ अंगभूत ॥५
अथवा स्त्रवते मेंदू इंडोफिन 
थोडे एड्रलीन हवे देहा ॥६
अवघा यांत्रिक चाले रसायनिक 
खेळ भावनिक बाजाराचा ॥७
यातून सुटका करूनिया घेणे 
म्हणजे जगणे स्वातंत्र्यात ॥८
तर मग यंत्र हाती जे मायिक 
झाले जे कायिक अंग एक ॥९
कामाव्यतिरिक्त दूर त्या सारावे 
पहाणे टाळावे डोकावून ॥१०
बंधन आखून घेई रे बांधून 
तरीच होईन कार्य काही ॥११
अन्यथा फेकून देई तू रे याला 
वन्ही लाकडाला एक सवे ॥१२
विक्रांत व्यसन जहाले करून 
सोडले पाहून त्याची  ॥१३
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

श्रावणाची गाणी

श्रावणाची गाणी 
***************"
तू श्रावणाची होत गाणी 
येतोस माझ्या मनी 
ही रात्र अष्टमीची 
भरलेल्या काळ्या ढगांची 
नेहमीच घालते मला भूल 
लाखो मनात दाटणारी 
तुझ्या स्मृतीची सघन ऊर्जा 
पोहोचते खोलवर माझ्या अणूरेणुत 
अणूरेणूत असलेल्या अनंत पोकळीत
 मग ती पोकळी जाते भरून 
तुझ्या ऊर्जेनी 
चैतन्याचे एक निळे निळे गगन 
अवतरत असते त्यातून 
ज्यात तूच असतोस अंतर्बाह्य भरून 
हे कृष्ण हे गोपाळ हे नंदनंदन 
हळूहळू ही नामावली ही 
होत जाते क्षीण क्षीण
उरते फक्त एक गुंजन 
कुणी तिला म्हणते बासुरीची धून 
कुणी म्हणते प्राणाचे होणारे स्पंदन 
तर कोणी म्हणते अनाहत श्रवण 
कुठलीही मीमांसा न करता 
त्या धूनी मध्ये मी जातो हरवून 
अवघे देहभान हरपून 
अन तू प्रगट होत असतोस 
श्रावणाचे गाणे होऊन
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

अजूनही

अजूनही
*******
मी जातो अजून त्या तुझ्या वस्ती जवळून 
ते घर ती झाडी वृक्ष बोलावतात मला खुणावून 
मीही दाखवतो ओळख त्यांना कधी थोडेसे हसून 
तर कधी गर्दीत मिसळून जातो हळूच टाळून 
पण या साऱ्या बाहेरच्या हुलकावण्या
त्याला काहीच अर्थ नसतो हे असतो मी जाणून
कारण मला तू दिसत असतेस अगदी वेशीपासून
तिथे उभी असलेली सजून धजून 
कदाचित तुला माहीत नसेल तुझे हे मला दिसणे 
अन अगदी चार पावलावरून निघून जाणे 
या महानगरात कुणाचे भेटणे आणि दुरावणे 
किती साहजिक असते नाही 
खरंतर या महासागरात आपल्याला इथे
आपल्या खेरीज कोणीच ओळखतही नसते 
तरीही तुझी ओळख अजून का पुसत नाही
ते मला अजूनही कळत नाही 
पुसल्यावर गडद होणाऱ्या अदृश्य अक्षरासारखी
 उमटत असतेस तू माझ्या अस्तित्वावर पुन:पुन्हा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

कृष्ण कळणे


कृष्ण कळणे
**********
कृष्ण कुणालाच कळला नाही 
कधीच कळला नाही 
कृष्ण कळला म्हणायची 
कुणाची हिंमतच होत नाही .
जस जसे कृष्णाला कळू पाहते मन 
जस जसे कृष्णाला न्याहाळू लागते मन 
स्तिमित स्तब्ध होते अन 
मौनात जावू लागते मन 
अथांग सागराच्या मध्यावर जाणे 
अन् त्या सागराला पाहणे असते ते
कणभर अस्तित्वाला घेवून 
अथांग शून्यात  हरवणे असते ते
तिथे दडपून जाते छाती  
कंप सुटतो सर्वांगाला
ही भीती केवळ अर्जुनाची नसते 
कृष्ण जाणवू लागल्यावर 
वाटणारी प्रत्येकाचीच भीती असते ती
ती भीती असते अज्ञाताची 
ती भीती असते अज्ञानाची 
ती भीती असते संपण्याची  
मग मागे उरते ते फक्त मौन. 
आणि त्या मौनात दाटलेली शरणागती 
तरीही कृष्ण कळत नाही 
कारण कृष्ण कळणे शक्यच नसते. 
पण मग या जाणीवेचा उद्गम 
घेऊन जातो अहंकाराला शून्यात
तेव्हा क्षणभर भास होतो
मनाला कृष्ण रुपाचा  
कणभर गंध येतो 
अस्तित्वाला कृष्ण रुपाचा
तेवढेही खूप असते या देहाला मनाला
आणि या जन्माला !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...